शनिवार, १९ नोव्हेंबर, २०२२

समुद्र येती / येई घरा

अगदी लहानपणा पासून असंख्य वेळा मी समुद्रा काठी, समुद्रसपाटीवर गेले आहे, ते अगदी मागल्या वर्षी पर्यंत. शहरात राहणाऱ्यांना ओढा असतोच समुद्राचा माझ्या मते आणि तो एक फारच वेगळा अनुभव असतो. प्रत्येक वयाच्या टप्प्यावर काही तरी नवीन शिकवून जातो तो समुद्र, वेगळा आनंद आणि बरेच काही. शाळेत विज्ञान शिकायला सुरवात झाली कि मग लाटांमागचं, फेसामागचं, अथांग पणाचं मार्म्य पिटुकल्या प्रमाणात उमगायला लागतं आणि मग मज्जा द्विगुणीत होते. त्या नंतर मग फक्त समुद्र नाही तर नारळाची झाडं, वाळू, निळा रंग, बोटी, घोडागाडी, सूर्यदर्शन, शांतता आणि बरेच काही भावून जाते आणि प्रत्येकवेळी नवीन अनुभव देऊन जाते, जो शब्दांच्या पलिकडला असा असतो. इतकी वर्ष सलग इतक्यांदा समुद्रसफर घडून देखील, इतक्या अनुभवांची शिदोरी असून देखील मला आज नव्याने एका रहस्याचा उलगडा झाला. माणसं समुद्र दर्शन करायला, त्या पाण्यात डुंबायला का जातात? ते पाणी नैसर्गिकरीत्या खारट असतं, फक्त पाय ओले केले किंवा संपूर्ण भिजलात कि एक वेगळी तारारी येते, खूप उत्साही वाटतं, ऊर्जा मिळते आणि असेल नसेल तेवढा थकवा दूर पळून जातो. हे मी कधी लक्ष देऊन अनुभवलं नव्हतंच. आज आपणहून ते नजरेपुढे उभं ठाकलं माझ्या.

थोडसं विषयांतर पण ते गरजेचं आहे, "साधु-संत येती घरा, तोचि दिवाळी दसरा", "पाहुणे येती घरा, तोचि दिवाळी दसरा" अश्या म्हणी म्हणजे माझ्या शिक्षकांचा, तदनंतर माझा जीव कि प्राण. बऱ्याच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, तेव्हा बैठी घरं असायची फक्त, गगनचुंबी इमारती नाहीत. आणि हो अर्थात हे मोबाईल नामक यंत्र पण नव्हते कि विचारून कोणाच्याही घरी ये-जा करायला. दारात भिक्षा / माधुकरी मागायला भिक्षेकरी येत असतं, किंवा साधू संतांचा सहवास पण लाभत असे असंख्य वेळा. त्यामुळे अचानक जर साधुसंतांच्या दर्शनाचा लाभ झाला किंवा त्याची पाऊले घरी पडली कि धन्यता मानली जात असे. पाहुणे म्हणजे अतिथी, देवासमान, त्यामुळे ते येणं, पोटभर जेवून जाणं हे भाग्याचं लक्षण जणू. ज्या दिवशी साधुसंत आले, पाहुणे आले त्याच दिवशी दिवाळी / दसरा, नसतांना देखील. पाहुणे म्हणजे आनंद, हास्य, अनुभव, ऊर्जेचा समुद्र आणि बरेच काही.

सद्यस्थिती ज्या दिवशी माझे पाय अबोल, म्हणजे पेन-फ्री त्या दिवशी जणूकाही माझी दिवाळी / दसराच जणू. आज सकाळी गरम / कडत्त पाण्यात भरपूर मीठ घालून पाय शेकत होते तेव्हा मला खरं गमक समजलं कि समुद्राच्या पाण्यात पाय बुडवले कि भन्नाट का वाटतं ते. आहे कि नाही मज्जा. चला तर मंडळी गाडी काढा, निघा आणि धमाल करा, असतीलच काही वेदना तर त्या कधी सहज विरून जातील हे समजणार देखील नाही समुद्राच्या पाण्याचा स्पर्श झाला कि.

प्रत्येक वेळी समुद्र गाठायची गरज नाही हे देखील मला उमगलं, घरीच "दुधाची तहान ताकावर". अर्थात तो समुद्राचा मंद धुंद सुगंध नसतो पण त्याचा स्प्रे मारू शकतो आणि वातावरण निर्मिती होऊ शकते.   सरते शेवटी माझ्या पायांना धन्यवाद देऊ तेवढे कमीच आहेत कारण आज मला एक नवीन म्हण सुचली त्या बद्दल  "समुद्र येई घरा, तोचि दिवाळी दसरा".

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...