शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०२२

पाय मोकळे करणे

आधीच्या पिढीला अत्त्योत्तम सवयी होत्या, त्यांना शारीरिक कष्ट, काम, अंगमेहेनत असायची, त्यात भरपूर चालणं होत असे. शेतात, बस थांब्या पर्यंत पोचण्यासाठी, परत घरी, जीने चढ-उतार आणि बरेच असे. त्या वेळी तंत्रज्ञानाची प्रगती झाली नव्हती, सर्वत्र अगदी सारखं वातावरण त्यामुळे लिफ्ट माहिती नाही, सायकल म्हणजे श्रीमंती होती जणू, अकरा नंबरची बस किंवा सार्वजनिक परिवहन व्यवस्था एवढंच. अर्थात काही जण अगदी थोडक्या प्रमाणात आवर्जून व्यायाम म्हणून चालायला जात असतं. रात्री यथेच्छ जेवण करून तृप्त झाल्यावर शतपाउली आवर्जून घडत असे. भारत-अमेरिका हा प्रवास लांबचा आहे. विमान जरी आंतरराष्ट्रीय दर्जाचं असेल तरी देखील इतके तास सलग बसणं आव्हानात्मकच आहे. टीव्ही असतो, चित्रपट बघता  वाचता येत, भरपूर खायला-प्यायला देखील मिळतं पण तरी देखील भरपूर वेळ शिल्लक असतो, ताणून देऊन सुद्धा. त्यात काय करायचं? तर चालायचं. कोणी चित्र रेखाटत असतं, लहान बाळं असतात त्यांच्याशी खेळायचं, गप्पा मारायच्या जमल्यास, फळं ठेवली असतात ती चाखायची ई. भलं मोठं विमान असतं त्यामुळे चकरा मारायला जागा देखील असते आणि ते आवश्यक असतं. गेले ५-७ दिवस मी आणि माझे सहपाठी मिळून विद्यार्थ्यांच्या तोंडी परिक्षा घेतो आहोत आणि आकडा मोठा आहे, त्यामुळे दिवसभर चालू होत्या परीक्षा. जरी आम्ही मनाने आणि शारीरिक क्षमतेनुसार तरुण असलो तरी देखील आता कुठलेही भलेमोठे ध्येय गाठायचे राहिले नाही, बाकड्यावर दिवसभर बसण्याची सवय नाही आणि कोणाला सांगू नका पण ऐकण्याची सवय पण मोडली आहे हो. ह्या सगळ्याची गोळाबेरीज म्हणजे.....

मग त्यावर आम्ही एक तरणोपाय शोधून काढला. अधेमधे दोन विराम / विश्राम / ब्रेक घेतले आणि त्यानंतर काही प्रेसेंटेशन्स / सादरीकरणे उभे राहून ऐकले. जो वर विद्यार्थी त्यांचा संगणक भल्यामोठ्या पडद्याला जोडत नाहीत तोवर बेंचच्या ओळींमधून चकरा मारल्या आणि मग खूप बरं वाटलं आणि मला माझ्या अमेरिकेच्या केलेल्या प्रवासांची, त्या सीट्स च्या ओळींमधून चालण्याची प्रकर्षाने आठवण झाल्याशिवाय राहिली नाही म्हणून हा पंक्ती प्रपंच.

तंत्रज्ञानामुळे, बदललेल्या जीवनशैलीमुळे, कामाच्या व्यापांमुळे किंवा अजून इतर काही कारणांमुळे सध्या बैठक जास्त होते आहे, बहुतांशी सर्वांचीच. उठा, उभे राहा, चालते व्हा, पाय मोकळे करा, जेवणा नंतर, अधेमधे, प्रत्येक तासाला किंवा जसं जमेल तसं. पण त्या पायांना देखील बदल हवा तो पुरवा मंडळी. बदल हा सर्वांनाच भावतो, मग पायांना का द्यायचा नाही? जेव्हा जमेल तेव्हा सोशल मिडिया चा वापर करून वाढदिवस किंवा अजून काही प्रसंगांना शुभेच्छा देण्या ऐवजी प्रत्यक्ष त्या व्यक्ती कडे जा, हस्तांदोलन करा, गळाभेट घ्या, तुम्ही जाऊन शुभेच्छा देण्यासारखी दुसरी भेटवस्तू नाहीच, नाही का? आणि पाय देखील खुश. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...