स्नातक आणि स्नातकोत्तर विद्यार्थ्यांना मी शिकवत असल्यामुळे तांत्रिक घडामोडी आणि त्यामुळे होणारा बदल, विद्यार्थांमधले घडलेले लक्षणीय परिवर्तन ई. सहज बघायला आणि अनुभवायला मिळतात. गेल्या दोन वर्षांपासून मला तरी जाणवलेला बदल म्हणजे काळोख. एक तर ह्या संपूर्ण पिढीलाच काळोख आवडतो? का एक करतो म्हणून दुसरा तसेच करतो, कोणास ठाऊक.
काळोख म्हणजे
१. त्यांच्या सगळ्या स्क्रीन्स किंवा बॅकग्राऊंड किंवा विविध तांत्रिक उपकरणे ह्यांचे पडदे काळे ठेवले असतात मुद्दाम, का?
२. दिवसा ढवळ्या उजेड असतांना देखील खोलीतले पडदे सारून अंधारात बसलेले, काम करतांना दिसतात. नाहीतर खोलीतले दिवे लावायचे पडदे सारून, हे काय खूळ आहे कुणास ठाऊक.
मला स्वतःला चार डोळ्यांनी त्या काळ्या स्क्रीन वर पांढऱ्या पिटुकल्या अक्षरांनी काय लिहिलं / टाईप केलं असतं ते दिसत देखील नाही हो. मग ह्यांना कसं दिसत असेल तासंतास काम करतांना?
मी मागे एकदा लिहिल्याप्रमाणे जेव्हा ह्या मागील २-३ वर्षांपासून ऑनलाईन माध्यमातून जर कोणी काही त्यांच्या स्क्रीन वर मांडत असेल तर आज तागायत एक प्रश्न नक्की विचारतात "माझी स्क्रीन दिसते आहे का?". माझ्या दृष्टीने ह्या ऐवजी असे विचारायला पाहिजे "माझ्या स्क्रीनवरचं दिसतंय का?" "इज माय स्क्रीन रिडेबल?" हे जास्त योग्य आहे "इज माय स्क्रीन व्हिसिबल?" पेक्षा, नाही का?
दिवसा उजेड असतांना अंधार करायचा पडदे लावून, खिडक्या उघडून ताजी हवा उपभोगायच्या ऐवजी वातानुकुलीत यंत्र गरज नसतांना, सतत आणि प्रचंड मोठ्या प्रमाणात, हे सगळं माझ्या समजण्या पल्याड आहे. असो. ह्या पिढीला लागलेली सवय असेल. पण ह्यातूनच सगळेच विद्यार्थी मोठी उंची गाठतात देखील हे खूप महत्वाचं आहेच, पण त्यांनी त्यांचे डोळे आणि तब्बेती सांभाळाव्यात, उजेडाशी पण मैत्री असावी एवढीच माफक अपेक्षा आणि विनंती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा