बुधवार, १४ डिसेंबर, २०२२

अनोखी मदत

न मागता मिळालेले बक्षीस, भेट वस्तू, सरप्राईज ई. आश्चर्यचकित करून जातातच आणि शिवाय परमानंद देऊन जातात ते वेगळंच. बहुतांशी प्रत्येकजण एकतर विचारमग्न किंवा दुखी असतो, किंवा तो प्रसन्नचित्त अथवा नेहेमीच्या सामान्य स्थितीत असतो. कुठलीही स्थिती असो, न मागता मिळालेली वस्तू, भेट, किंवा असामान्य अनुभव प्रत्येकाला अत्यानंद देऊन जातो. बरेचजणं एका वेगळ्या दुनियेत पोचतात आणि राहतात बरेच काळ. ती भेट वस्तू लहान का मोठी, महाग का स्वस्त, कुठल्या स्वरूपातली ई. महत्वाचं नाही. विचारपूर्वक दिलं आहे, वेळेला न मागता उभं ठाकलं आहे, हवं ते, हवं त्याहून खूप वेगळं, असं ते आहे म्हटल्यावर खास वाटतं ते साहजिकच, कारण कोणीतरी तुमच्या साठी खास खूप विचार करून कृती देखील केली आहे हे महत्वाचं. हे खूप शिकण्यासारखं आहेच आणि ते वेळोवेळी दुसऱ्यांसाठी वापरावं देखील प्रत्येकाने. 

मला काल अचानक काहीही कारण नसतांना खूप वेगळं असं वाटत होतं, किंचित अस्वस्थ असं किंवा न सांगता येणारं असं. तरी वेळेवर मी सकाळी ऑफीला निघाले तय्यार होऊन. गाडी सुरु झाली आणि नेहेमी प्रमाणे रेडिओवर गाणी सुरु झाली. बऱ्याच रेडिओ वाहिन्या आहेत आणि प्रत्येकाची खासियत म्हणजे नुसत्या जाहिराती. पण काल मला एक सुखद धक्का बसला आणि तो म्हणजे एका मागोमाग एक गाणीच लागली, दुसरा हादरा म्हणजे अक्षरशः सगळीच्या सगळी माझ्या प्रचंड आवडीची अशी. मला काही क्षण एक तर विश्वास बसलाच नाही किंवा मला असं देखील वाटलं कि मी माझी आवडत्या गाण्यांची यादी प्ले केली आहेत. पण तसं नव्हतंच मुळी. बिनतारी संदेश दिल्यासारखं त्यांना कसं काय समजलं कि मला थोडसं वेगळं वाटतंय कोणास ठाऊक आणि कधी मी मला परत गवसले माझं मला समजलं नाही. कधी, कोण, कुठे, केव्हा, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत करेल काहीही सांगता येत नाही. तेव्हा प्रत्येक वेळी आवर्जून नतमस्तक व्हा, धन्यवाद माना त्या प्रत्येकाचे ज्याने तुम्हाला हवी तेव्हा मदत केली. आणि जमेल तेव्हा, जमेल तशी, जमेल तेवढी मदत करा, उभे राहा म्हणजे थोडीशी उतराई होईल. 

त्या रेडिओ स्टेशन वर काम करणाऱ्या संपूर्ण चमूचे धन्यवाद, माझ्यासाठी माझ्या आवडीची गाणी निवडल्याबद्ल आभार, ती एकापाठोपाठ एक ऐकवल्याबद्दल शुक्रिया, माझा मूडपालट केल्याबद्दल मी ऋणी आहे. मला न मागता मिळालेली हि खूप अनमोल भेट आहे. त्या रेडिओच्या चमूने मला विचारण्यात वेळ नाही घालवला, कृती करण्यावर भर दिला. अगदी तस्सेच आपण सर्वांनी पण नेहेमी करत राहिले तर? उगाचच प्रश्न विचारून भंडावून सोडण्यापेक्षा जमेल तशी कृती केली तर ती नेहेमीकरता लक्षात राहणारी, स्मृती देऊन जाणारी, खूप काही शिकवून जाणारी घटना ठरेल ह्यात शंकाच नाही. चला तर मग, खोचा पदर आणि लागा कामाला.   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...