शुक्रवार, २ डिसेंबर, २०२२

पंचाहत्तरीची तरुणी

२३ वर्षांपूर्वी आमची पहिली गाठ-भेट झाली होती. त्यावेळी त्या विद्यावाचस्पती होत्या. मराठी वाङ्मयात त्यांनी संशोधन केले होते, पुर्णवेळ शैक्षणिक कार्याला वाहून घेतलेलं व्यक्तिमत्व जे शाळेच्या प्राचार्या म्हणून सेवा निवृत्त झालं. हे सगळं करतांना, बाहेरच्या / शाळेतल्या शेकडो मुलांना सांभाळतांना स्वतःची तीन आणि नातेवाईकांची अनेक अशी पण अगदी मनापासून जपली, आणि अविरत चालू आहेच ते कार्य, आता ते नातवंडांपर्यंत पोचाल आहे इतकचं. इतका मोठा घरचा, माहेरचा, सासरचा, बाहेरचा आणि आता मुलामुलींच्या सासरचा डोलारा हसत-खेळत सांभाळायचं म्हणजे "त्याची" कृपादृष्टी तर हवीच पण त्यांना एक वेगळी शक्तीच प्राप्त झाली आहे हे निश्चित. शब्दात न सामावणारं असं व्यक्तिमत्व आज फक्त अमृत महोत्सव साजरा करतंय. खूप म्हणजे खूप, प्रत्येक टप्प्यावर त्यांच्याकडून शिकण्यासारखं होतं आणि आहे. त्याचं राहणीमान जे माझ्या समोर २३ वर्ष तसूभरही नाही बदललं. त्यांचं बोलणं, स्वभाव, अजूनही मोठ्या प्रमाणावर सर्वांसाठी सर्वकाही करण्याची तय्यारी, इच्छा, धडपड आणि प्रत्येकाकडे वैयक्तिक लक्ष, काय हवं काय नको ते बारीकीने बघणं, लक्षात ठेवून प्रयोजन करणं, ते अमलात आणणं, वेगळंच रसायन आहे हे,  ह्यात शंकाच नाही. अनेक देश पादाक्रांत करून झाले, वास्तव्य झालं, त्याच सळसळत्या उत्साहाने. हाताला चव तर इतकी उत्कृष्ट कि अन्नपूर्णा प्रसन्नच आहे, प्रत्येक वेळी त्यांच्या घरी गेलं कि वैविध्य पदार्थांची रेलचेल असते  नुसती. प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार सगळे पदार्थ केलेले. सातत्याने नातेवाईक, लोक, आणि इतरांचे जाणे-येणे, पण सर्वांसाठी सर्वोतोपरी नेहेमी हिरीरीने भरभरून करणारी अशी सर्वांची प्रिय माऊ आजी, गीता काकू, आज फक्त ७५ च्या झाल्या आहेत. हा त्यांच्या साठी फक्त एक आकडा आहे, बाकी काहीच नाही. त्यांच्यातला ०.००१ टक्का जरी शिकता आला, अमलात आणता आला, जगता आला तरी खूप समाधान मिळेल माझ्यासारखीला. शेवटी मूळ तर विदर्भातलंच आहे ना? मग असं असणारच. माझ्या, माझ्या मुलांच्या आणि इतर शेकडो लोकांच्या आदर्श डॉ. गीता ह्यांना वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा. ।। जीवेत शरदः शतम... ।। प्रत्येक तरुणीला लाजवेल असा फक्त उत्साह नाही, तर कामं करण्याची लकब, माणसं जोडण्याची कला, प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपण्याचे कौशल्य, प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तींशी मिसळायची हातोटी, तल्लख बुद्धिमत्ता, जगाची माहिती, प्रत्येकाचा आदर, मानसन्मान राखण्याची पद्धत ई. तसूभरही फरक नाही इतक्या वर्षात आणि तो कधीही नसणार हे नक्की. अश्या ह्या पंचाहत्तरीच्या तरुणीला माझा साष्टांग दंडवत. 


 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...