आपण मनुष्य जात अगदी लहानपणीपासून कित्ती सतत धावत पळत असतो नाही. आधी विनाकारण, उगाचच, साध्या एखाद्या चेंडू पाठी, खेळासाठी, शर्यत म्हणून, सायकलीच्या पाठीमागे, गुरुजींनी / शारीरिक शिक्षणाच्या शिक्षकाने म्हटलं म्हणून ई. आणि बरेच काही. मिश्या फुटण्याच्या वयातलं पळणं ह्याला देखील एक सुगंधी नशा असतेच आणि तो एक वेगळाच अनुभव, "दिवस तुझे हे झुलायचे, झोपल्या वाचून झुलायचे" असं काहीसं. मग व्यायाम शाळेचा रस्ता कधी धरला जातो ते समजायच्या आत आपल्या मार्गात काही खास लोक, स्वप्नं, लक्ष्य, उद्दिष्ट्य, नेम खुणावत असतात. ते बऱ्याच अंशी साध्य झाले कि किंवा करतांना देखील प्रचंड पद्धतीचे धावणं-पळणं सुरूच राहते, बुद्धी पळवावी लागते, मन तर वायू वेगाने धावत असते, इच्छा आकांक्षाच्या वेगाला आणि पळण्याला तर सुमाराच नसतो काहींच्या बाबतीत, शारीरिक पळापळ तर विचारूच नका. पण हे शारीरिक पळणं एगझर्शन जास्त आणि एक्झरसाईझ कमी होते, किंबहुना घर-दार, उंची गाठण्याची धडपड, सिद्ध करायची इच्छा, ते वय, अनोखी शर्यत ई. मुळे जास्त परिश्रम होतात आणि ते कुठल्याही सजीव व्यक्तीला सुटले नाहीतच. म्ह्णून मग बाकी बरेच काही सुटायला लागते ज्यात प्रकर्षाने शारीरिक शक्तीचा किंचित ऱ्हास, लवचिकता, बळ आणि इतर. मग पुन्हा एकदा भरगच्च रोजनिशीत शास्त्रोक्त व्यायामाची भर घालावी लागते. ती घातली कि मग आवड निर्माण होते. मग फक्त व्यायामाशिवाय उंच सखल रस्ता जाणूनबुजून शोधला जातो, नवीकोरी सायकल विकत घेतली जाते, इतर व्यायाम प्रकाराला लागणारी सामग्री घेतली जाते आणि दरदिवशी सगळं उत्कृष्टपणे निभावण्याची छोटीशी धावपळ सुरु होते. लहानपणी नकळत किंवा विनाकारण अनेकदा धावलेले आपण आता एका उद्देशाने धावतो आणि काही दिवसात / महिन्यात ते उद्धिष्ट सफल करतोच. वेळ काढून धावणे, पळणे आव्हानात्मक आहे आणि ते जेव्हा मी अनेक जणांना प्रकर्षाने करतांना बघते तेव्हा एक वेगळी ऊर्जा नक्की मिळते.
भल्या सकाळी कचेरीत जायला निघण्याचे हे असे अनेक फायदे आहेत माझ्यासाठी. त्यातलाच एक म्हणजे अनेक जणांना मस्त हवेशी, वाऱ्याशी, पाखरांशी, फुलांशी, सुगंधांशी संवाद साधतांना बघणे आणि भरपूर आनंद उपभोगणे अश्या पिटुकल्या अनुकथा मांडून.
"प्रत्येकाच्या डोक्यावरचे आभाळ वेगळे" त्या प्रमाणे प्रत्येकाचे उद्धिष्ट वेगळे, सरते शेवटी अगदी जन्माला यायच्या आधी पासून जे पळणं सुरु होतं ते वैविध्य प्रकारे सुरूच राहतं आणि राहावं. प्रत्येकाला वायुवेगाने धावण्यासाठी लागणारी शारीरिक, मानसिक, अध्यात्मिक, सामाजिक, आर्थिक ताकद मिळो आणि टिको हिच अपेक्षा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा