शुक्रवार, ९ डिसेंबर, २०२२

चक्कर

मला मनापासून भावणारी एक गोष्ट गाडीतून चक्कर, खास करून नवीन गाडीतून. माझ्या ह्या सवयीमागे, किंवा सवयीचे निमित्य म्हणजे माझे बाबा आणि त्यांचे वाहन चालक. त्यांचा हुद्दा मोठा असल्यामुळे आणि फिरतीची कामे सतत असल्यामुळे त्यांना गाड्या आणि गाडीवान दिमतीला दिलेले असायचेच. भलामोठा प्रवास करून येवो नाहीतर दररोजचा ऑफिस ते घर पण न थकता मला चक्कर मिळायचीच, बहुतांशी दरदिवशी, नाही तर अधेमधे नक्कीच. मग ती सवय मोठी झाले तरी सुरूच राहिली आज तागायत. अगदी लहान मुलासारखी मला अजुनही पराकोटीची इच्छा होतेच नवीन गाडीची चक्कर मागण्याची. माझी हि वेडपट सवय ज्यांना ज्यांना माहिती आहे ते ते न मागता, न मला विचारता चक्कर मारायला हक्काने घेऊन जातातच. आज देखील अगदी काहीसे अनोखे घडले. मी माझ्या एका खास मैत्रिणीला धावती भेट द्यायला गेले होते. माझ्या गाडीवानाला त्याच्या पुढच्या कामावर जायचे वेध लागले होते. आम्ही जर शहरांतल्या ठराविक रस्त्यांवरून गेलो असतो तर ठिकठिकाणी वाहतूक थांबे पार करत हळुवार पणे जावं लागलं असतं आणि शिवाय मेट्रो च्या कामामुळे संथगती देखील अनुभवावी लागली असती. हा सारासार विचार करून माझा गाडीवान म्हणतो कसा, "आज मी तुम्हाला मात्र हायवे वरूनच घेऊन जाणार आहे, नेहेमीच्या रस्त्यावरून नाहीच, वाहतूक थांबे नकोतच" ई. मी फक्त मान हलवली, ती त्याने बघितली पण नाही आणि काढली गाडी. हायवे वरून प्रवास करतांना अचानक मला इतकी मज्जा यायला लागली, नेहेमीचा ओळखीचा तो रस्ता, आजुबाजुच्या इमारती, उद्योग-वास्तू मला देखील आतापर्यंत ओळखायला लागल्या असतील इतकेंदा गेले असेल मी त्या रस्त्यावरून. पण आज काही तरी विशेष घडलं हे मात्र नक्की. बरं माझी राणी (कार) पण जुनी आणि ओळखीची हो (ती मला, मी तिला). मला काय वाटलं माहिती आहे कि ह्या राणीला फक्त मी दररोज न चुकता घरून ते कचेरी आणि परत एवढाच काय तो उपयोग करते. त्या राणीत बसून उगाचच हवेशी गप्पा मारायला गेलेच नाही कधी आणि तिला पण नेलं नाही. दररोज एकाच रस्त्यावर जाऊन जाऊन ती पण कंटाळली होती त्यामुळे आज तिला उच्च कोटींचा आनंद झाला तो माझ्यापर्यंत झिरपला आणि आम्ही दोघीनी तो छोटासा नवीन मार्ग / पट्टा मस्त भन्नाट पद्धतीने एन्जॉय केला, काय अनोखी जगावेगळी चक्कर होती ती म्हणून सांगते, अहाहा च. दिवस सध्या छोटे असल्यामुळे दिवस जणू काही संपत आला होता, अंधार पडला नव्हता, पराकोटीचं उत्साही वातावरण होतं, हवा देखील आल्हाददायक होती, आणि "चेरी ऑन केक" म्हणजे हि माझी चक्कर. 

तुम्ही अशी चक्कर एवढ्यात एन्जॉय केली आहे का? असेल तर निश्चित सांगा, नसेल तर नक्की जा, चक्कर माराच, एकटे किंवा कोण्या आपल्या सोबत, हक्काने घेऊन जाच, तीच गाडी, तेच रस्ते पण कुठलेही वेळेचे बंधन नाही, घड्याळ्याच्या काट्यानुसार जायचे-यायचे नाही, त्यामुळे खूप मस्त अनुभव मिळतो ह्याची पक्की खात्री पटली आज मला. आता मी तरी अधेमधे अशी चक्कर एन्जॉय करणार, प्रत्येकाला आमंत्रण (ओपन इन्व्हिटेशन हो).  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...