सायीला मायेची उपमा देतात हे शाळेत एका धड्यात / कवितेत शिकवलं होतं, ते का? हे मात्र एवढ्यात समजलं / उमगलं. प्रथमतः तर फक्त उकळल्या नंतर दुधाला साय येते एवढंच काय ते मला ठाऊक होतं पण मग हळू हळू बाकी घटकांबद्दल देखील लक्षात आलं जसे कि भगरीवर, खिरीवर (गाजराची खीर), मऊसर खिचडीवर, लापशीवर ई. साय येते, काही जण त्याला साय धरते असं म्हणतात, थोडक्यात काय तर एक थर वरती तय्यार होतो त्या पदार्थाच्या.
दुधावरची साय किंवा कुठलीही त्या खालचा पदार्थ गरम राखण्याकरता, किंवा त्या पदार्थाचं तापमान काही अंशी, काही वेळ जपण्याकरता असते, निर्माण होते आणि हि एक नैसर्गिक प्रक्रिया आहे असं माझं ठाम मत आहे. थोड्या जास्त वेळ उब राखण्यासाठी केलेली सोय, त्यामुळे गरज असेल तर पदार्थ थोडासा अजून शिजतो, टिकतो, चव राखता येते असे काहीसे. काही दिवसांपूर्वी मला भगर हवी होती डब्यात म्हणून मी ती थोडीशी पातळ केली नेहेमी पेक्षा, म्हणजे पट्टाकिनी खाता येईल, थंड झाल्यावर नाहीतर फार कोरडी होते ती. भगरी सोबत मी अजून काही नेणार नव्हते कारण ती फोडणीची भगर होती आणि त्यामुळे काही नसलं वेगळं तरी चालणार होतं. थोडीशी गरम असतांनाच भरली डब्ब्यात. नेहेमीच्या जेवणाच्या वेळी ऑफिस मधे डब्बा उघडून चविष्ट झाल्यामुळे फस्त झाला क्षणात आणि मग लक्षात आलं कि १. कित्ती मस्त कोमट राहिली होती भगर आणि २. एक वेगळा थर निर्माण झाला होता त्यावर ज्यामुळे ती उब टिकली होती. पहिल्यांदाच मी पातळसर भगर केली होती, आणि ती इतक्या वेळाने सेवन केली होती. त्यामुळे ह्या सायीचा आलेला पहिलाच अनुभव. त्या नंतर मला माझी आई जी गाजराची खीर करायची ती आठवली, पातळसर केलेली खिचडी ध्यानात आली, ज्वारीच्या कण्या झर्रकन डोळ्यासमोर उभ्या ठाकल्या आणि बरेच असे पदार्थ. बघा म्हणजे त्या पदार्थाला पण कित्ती काळजी असते सेवन करणाऱ्याची, चविष्ट खाऊ घालण्याची, नाही का? अगदी आईसारखी, आत्ता उमगलं सायीला आईची माया का देतात कवी मंडळी ते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा