माझी एक खासमखास मैत्रीण, अनेक वर्षांची ओळख, इतकी दाट मैत्री कि ज्याचं नाव ते. आम्ही दोघी एकमेकींना कदाचित कणभर जास्त ओळखतो त्यांच्या स्वतः पेक्षा. खूप बोलका, मोकळा स्वभाव, प्रत्येकाला जमेल तशी मदत करण्याची धडपड, कामाला वाघ आणि सर्वगुणसंपन्न अशी ती. वायुवेगाने सर्व आटोपशीर व्यवहार, मग ते घरचे असोत नाहीतर दारचे. विविध ठिकाणं बघितली, ह्या-त्या देशाची सहल घडली, कचेरीत खूप जबाबदाऱ्या निभावल्या / निभावता आल्या, घरच्यांचं जमेल तसं सांभाळून, मुलांना वेळ देऊन. तर थोडक्यात "ती" अशी होती. तिच्या घरचे सगळेच फारच मोठ्या उंचीचे विद्याविभूषित, उच्चपदस्थ आणि असे बरेच काही.
"सध्या ती काय करते?" तर स्वतःच्या तब्बेतीला जपते, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण तब्बेत सांभाळणं हे अत्यावश्यक झालंय तिला. एवढ्यातलाच तिच्या घरी घडलेला प्रसंग. तिच्या अहोंना येणाऱ्या नाताळाच्या सुट्टीत ह्या-त्या ठिकाणी जायचे आहे. त्या नंतर म्हणे काही वर्षांनी अत्यंत विश्वविख्यात स्थळांना भेटी द्यायच्या आहेत, एकामागोमाग एक. तेव्हा आहोंनी विचारणा केली आणि ह्या सर्वांचा प्रस्ताव मांडला तिच्या समोर. अर्थात सद्यपरिस्थितीत ती नाही म्हणाली, कारण प्रवास नाही सोसणार हे एक कारण, आणि अहोंना त्रास नको तिच्या तब्बेतीच्या कुरबुरींमुळे हे महत्वाचं कारण, तिसरे कारण म्हणजे तिने बहुतांशी हि स्थळं बघितली आहेत त्यामुळे ओढाताण करून जाण्याची काहीच गरज नाही ई. त्यावर अहोंची प्रतिक्रिया अशी "म्हणजे ह्या पुढे आयुष्यभर मला एकट्यालाच सर्व प्रवास करावा लागणार तर?".
थोडक्यात ह्या प्रसंगाचं तात्पर्य: आंतरदेशीय शाळेत शिक्षण, बहुराष्ट्रीय कंपनीत अनेक दशकं नोकरी, कामामुळे एकही देश शिल्लक राहिला नसेल एवढी झालेली भ्रमंती आणि सरते शेवटी माणुसकी, ई. सर्व गेलं कुठे? "जिभेला हाड नाही" हे जरी खरं असलं तरी मग लहापणापासून काय शिकले अहो, आई-वडिलांनी, शिक्षकांनी, समाजाने एक तर शिकवलं नाही आणि त्यांनी स्वतः काहीच शिकलं नाही हे त्रिवार सत्य. "ऍक्टिव्ह प्यासिव्ह व्हॉइस = कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग" हे शाळेत शिकवले होते सर्वांना, मग त्याचा साधा प्रयोग करणं जमत नाही तर अती उच्च विद्या आणि उच्च पदस्थ असण्याचा काय उपयोग? सर्व व्यर्थच. खालील वाक्य उच्चारणं अवघड होतं का स्वतःच्या बायकोसाठी कि "नाताळच्या सुट्टीला दोघे जाऊयात, तुला जेथे सोयीचं असेल तिथे. आणि बाकी ज्या स्वप्नवत जागा आहेत जेथे मला जायचे आहे तेथे देखील तू येणार, तू लवकरच बरी होणार आणि आधीपेक्षा जास्त ठणठणीत ह्याची मला खात्री आहे... ". म्हणायला काय जातंय हो? पैसे पडत नाहीत किंवा अजून काही दमडी खिशातून खर्च होत नाही, शिवाय रस्त्यावरच्या माणसाला नाही बोलायचं आहे, अनेक वर्षांचा सहवास असलेल्या व्यक्तीबद्दल आहे हे. आणि अजून एक मला ज्वलंत प्रश्न पडला आहे तो असा हे त्यांच्या ऑफिस मधे, त्यांच्या हाताखाली किंवा बरोबर काम करणाऱ्यांशी पण असेच वागत असतील का? निश्चितच नाही ना, मग घरीच का?
"ऍक्टिव्ह प्यासिव्ह व्हॉइस = कर्तरी प्रयोग आणि कर्मणी प्रयोग" सातत्याने वापरण्यासाठी शिकवला गेला आहे हे ध्यानात ठेवा, स्वतःच्या समाधानासाठी तरी वापरा, समोरच्याला बरं वाटेल म्हणून उपयोग करा, सकारात्मकता पसरवण्याची संधी म्हणून वापरा हो मंडळी म्हणजे असे अनेकजण पट्टाकिनी बरे होतील. नाही का?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा