मी इतकी वर्ष महाराष्ट्रात राहिले, शिवबांबद्दल इतिहासात वाचलं, त्यांच्या काही गड / किल्ल्यांवर गेले देखील पण त्यांची जयंती कशी साजरी होते हे कधीच प्रत्यक्ष अनुभवलं नव्हतं. त्यांच्या जयंतीच्या वैविध्य कार्यक्रमांबद्दल ऐकलं होतं खरं, फोटो बघितले होते, रस्त्यांवर फलक देखील बघितले होते पण मी त्या समारंभाचा भाग कधीच झाले नव्हते. कदाचित ते माझं क्षेत्र नव्हतं आणि नाही पण आज एका वेगळ्या ढंगात साजरी झालेली त्यांची जयंती प्रत्यक्ष अनुभवता आली, चार डोळ्यांनी बघता आले सगळे आणि ती कंपने, तो माहोल प्रत्यक्ष अनुभवता आला. आमच्या महाविद्यालयात सध्या वार्षिक सांस्कृतिक महोत्सव सुरु आहे. त्यातला एक महत्वाचा भाग म्हणजे आजची जयंती. ह्या उत्सवाची तय्यारी अगदी जोरदार झाली / केली होती. फेटे वाला बोलावला होता. तो वायुवेगाने एका मिनिटाच्या आत एक असे फेटे बांधून देत होता सर्वांना. शेकडो फेटे असे सहजी, भल्यामोठ्या शिताफीने बांधले त्याने, मी बघतच राहिले, डोळ्याचे पारणे फिटते म्हणजे काय ह्याचा प्रत्यक्ष अनुभव आला आज मला.
महाराजांच्या दोन मूर्ती, एक छोटी आणि दुसरी भली मोठी आणली होती. सगळे विद्यार्थी अगदी मराठमोळ्या वेशात होते. ढोल ताशे ह्यांचं विध्यार्थी आणि काही खानावळीच्या लोकांनी वादन केले तब्बल एक ते दीड तास. मग गुरुजींनी यथासांग पूजा-अर्चा केली, आरती झाली, थोडक्यात एका प्राध्यापकांचे भाषण झाले, त्यानंतर शिवबांच्या कार्याची महती सांगणारी गाणी ऐकवण्यात आली, प्रसाद वाटून कार्यक्रमाची यथासांग सांगता झाली.
ज्या विद्यार्थ्यांनी महाराजांची पालखी धरली होती ते अनवाणी होते, इतकी मनापासून भक्ती आणि आदर बघून खरोखर मन भरून आलं. आज ऊन होतं, पायात चप्पल आणि झाडाच्या सावलीत बसून देखील मला उन्हाचे चटके जाणवत होते, मग ह्या भक्तांना खरंच त्रास झाला असेल.
छोटी मूर्ती हि पालखीत होती आणि त्यावर यथासांग अभिषेक केला गेला आणि मोठी मूर्ती व्यासपीठावर सर्वांसाठी दर्शनासाठी विराजमान झाली होती.
शिवबांवर आरती लिहिली गेली आहे हे मला आज समजलं. गुरुजींनी थोडक्यात-गोडी अशी छोटेखानी पूजा केली आणि त्यानंतर गणपतीची आणि शिवरायांची आरती केली.
असंख्य विद्यार्थी अमराठी देखील होते, छान वाटलं त्यांना ह्या सगळ्यात हिरीरीने भाग घेतांना बघून. भाग घेतला म्हणजे शिवबांबद्दल नक्कीच वाचलं असणार, मनन-चिंतन केलं असणार, बरं वाटलं बघून.
विद्यार्थ्यांच्या हिशोबाप्रमाणे साधा, सोप्पा, सरळ जयंतीचा कार्यक्रम साजरा झाला, खूप वर्षांनी महाविद्यालयाच्या पटांगणावर. वेगळं काही तरी, भक्तिपूर्ण आणि नादपूर्ण असं काहीसं. नवीन जमान्याचे मावळे बघितले आज, नवीन कोऱ्या कुर्त्यामधे, भन्नाट अत्याधुनिक केशरचनेत, सुशोभित फेटा घातलेले (घालून घेतलेले), नाविन्यपूर्ण गॉगल्स परिधान केलेले, ढोल वाजवणारे, शिवबांचा जल्लोष / जयघोष करणारे, पूजेत / आरतीत भाग घेणारे, केशरी झेंडे घेऊन मिरवणुकीत भाग घेतलेलं असे काहीसे. आज उपयोगी ठरतील असे शिवबांचे गूण काही अंशी अंगीकारता आले तर बघायला हवं. शिवकार्याचा आढावा घेतला जातो ह्या निमित्याने दरवर्षी हे फार महत्वाचे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा