मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०२३

सही

मी एक साधी मास्तरीण असल्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवणे, समजावून सांगणे, परीक्षा घेणे आणि त्यानंतर गूण किती मिळाले हे दाखवणे ई. गोष्टी असतात करण्यासारख्या. मिळवलेले गूण दाखवले हे निश्चित करण्याकरता विद्यार्थ्याने त्याची सही करणे आवश्यक असते. 

शिक्षकाचा अजून एक भाग म्हणजे विद्यार्थ्यांची वर्गात उपस्थिती घेणे. प्रत्येक वेळी एक एक विद्यार्थ्याला बोलावून, किंवा त्यांचे नाव उच्चारुनच उपस्थिती घेतली जाते असे नाही तर  काही वेळा उपस्थितीचा कागद देऊन, समोर उभे राहून सही घेतली जाते. 

शिक्षणाचा अजून एक महत्वाचा भाग म्हणजे वैविध्य दिग्गजांना आमंत्रण देणे. त्या निमित्याने एकाच कीर्तनकाराकडून रोज एकाच पद्धतीचे विचार, अनुभव ऐकण्याशिवाय एक वेगळी छटा  अनुभवता येते. त्यावेळी देखील विद्यार्थी आले होते खास कार्यक्रमासाठी ह्याचा पुरावा म्हणून सही घेतली जाते. 

प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षा हि द्यावीच लागते, मग ती लेखी असो, तोंडी असो किंवा प्रयोग स्वरूपातली असो, त्यावेळी देखील  उपस्थितीची नोंद म्हणून सही घेतली जाते. 

एका शिक्षिकेला विद्यार्थ्यांच्या असंख्य वेळा सह्या घ्याव्या लागतात. आता हि सही काही मूळ सही नसते जी बँकेचे व्यवहार करण्यासाठी वापरतात, नाही का? प्रत्येक माणूस बँकेचीच सही सगळीकडे  करत राहिला तर झालंच मग, संपलं सगळं. अग्राक्षर, आद्याक्षर, इनिशिअल्स असा एक सर्वश्रुत प्रकार आहेच. आपल्या नावाचे आणि आडनावाचे  काही अक्षरं वापरून लिहिणे म्हणजे साधी सही, ज्याला कायद्याची जोड नसते आणि तुमची असते, तुमची उपस्थिती सांगण्याकरता वगैरे कामात येते.  

आपल्या देशात अनेक भागांमधे, अनेक राज्यात वर्णमालेत असलेली सगळी अक्षरे मिळून एखाद्या मुलाचे नाव तय्यार होते आणि हे खूपदा घडते, बघायला मिळते. छोटीशी पिटुकली नावं फार कमी असतात. ज्यांची नाव आणि आडनावं भली मोठी आहेत त्यांनी आणि बाकी सर्वांनीच जर फक्त आद्याक्षर लिहून आपली उपस्थिती दर्शवली तरी चालण्यासारखं आहे नाही का? अगदी थोडी मुलं हे असं हुशारीने वागतात, बाकी निबंध लिहिल्यासारखं लिहीत बसतात. इतका वेळ जातो म्हणून सांगते, माझा, लिहिणाऱ्याचा आणि बाकी सही साठी वाट बघणाऱ्या विद्यार्थांचा. सही हा शब्द पिटुकला आहे हे तरी ध्यानात ठेवून पट्टाकिनी उपस्थिती नोंदवून मोकळं व्हावं ना, कित्ती साधी सोप्पी गोष्ट आहे. काय मिळतं आणि का आवडतं प्रत्येक वेळी इतकं मोठं नाव लिहीत बसायला कोणास ठाऊक? इतर बाबतीत सगळं पट्टदिशी व्हायला हवं असतं, मग तसाच चपळपणा सही साठी का नाही दाखवत कोणास ठाऊक? असो, पालकांनो अगदी छोटीशी नावं ठेवा बरं इथून पुढे, आणि इनिशिअल्स च करायला शिकवा सर्वांना त्यांच्या खास स्टाईलने म्हणजे सर्वांचेच भले होईल. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...