व्हाट्सअप युनिव्हर्सिटी च्या दालनातील काही ओळी, ज्या आज माझ्या मोबाईल वर विराजमान झाल्या त्या अश्या:
गुलाब आणुन देणारा फक्त फेब्रुवारी पुरताच.
कोथिंबीर आणुन देणारा खरा गं बाई !!!
हे वाचल्यावर माझे विचार:
एकदा ठरवलं ना, आलात ना ह्या भल्यामोठ्या जगात, मग आता पुढे जायचं, मागे नाहीच, थांबायचं नाहीच, कर्तव्य आणि कार्य करत राहायचं सातत्याने. दर आठवड्यात स्वतःलाच आणि कुटुंबाला खायला लागते म्हणून कोथिंबीर आणता ना, हिरव्या कंच रंगाची, अप्रतिम सुगंधाची, मग रंग बदल, दुकान बदल, सुगंध-बदल म्हणून आज कोशिंबिरी सोबत गुलाब आणा. अर्थात आज मिळणाऱ्या गुलाबाचा इच्छा असली तरी गुलकंद करू शकत नाही. त्यामुळे एक तर एखादे गुलाबाचे फुल आणा, नाहीतर देशी गुलाबी गुलाबाचा पुष्पगुच्छ आणाच. म्हणजे नागपुरी स्पेशल कोथिंबीर वडी सोबत गुलकंद चाखता येईल संपूर्ण उन्हाळ्यात. बघा कित्ती फायदे आहेत गुलाब आणण्याचे. प्रेमाचा दिवस खास आहे, भरभरून प्रेम पसरवा, म्हणजे प्रेम भरपूर प्रमाणात परत मिळेल न मागता, नकळत सतत. आणि मग फक्त आजचाच दिवस नाही तर बहुतांशी सगळेच दिवस प्रेम दिवस म्हणून साजरे करता येतील. कोथिंबीर किंवा गुलाब आणला म्हणजेच प्रेम असतं असं नाही बरं का मंडळी, तरी देखील प्रेम व्यक्त करणं तितकंच अत्यावश्यक, कृती केली नाही तर समजणार कसे ना? कोथिंबीरीसोबत अजून काहीही चालेल बरं का, पण आणा नक्की. आज प्रेम दिवस आहे म्हणून नाही, वाढदिवस, हा दिवस-तो दिवस ह्या दिवशी तर जमवा नक्की पण इतर दिवशी त्या छोट्या मुलाला / सिग्नल वरच्या फूल विक्रेत्याला मदत म्हणून तरी आणा. कुठलाही दृष्टिकोन ठेवा, स्वतःला समाधान म्हणून आणा, पेरा तर उगवेल, पेराल तेच उगवेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा