मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०२३

बहुमूल्य मदत

हि आहे माझ्या एका सख्या मैत्रिणीची पिटुकली एक कहाणी. अर्थात तिच्या परवानगीनेच मी हि अनुकथा लिहिते आहे तिचे नाव जाहीर न करता. "नावात काय आहे?", हा अनुभव कोणाला आला आहे ह्या पेक्षा तो काय आहे, किती महत्वाचा आहे आणि त्यातून काय बोध घ्यायचा हे जास्त महत्वाचं. 

माझी हि जी मैत्रीण आहे, तिचा एक वर्ग मित्र, अगदी लहानपणीचा. त्यावेळी कुठल्याही प्रकारची संवाद साधण्याची साधनं नव्हती आज सारखी त्यामुळे एकदा त्यांचं कॉलेज संपलं आणि संपर्क देखील, कायमचा. त्याचं लग्न फार लवकर झालं काही कारणांस्तव आणि हि खूप शिकली, नोकरी केली ई. त्याच्याकडे एका पाठोपाठ एक दोन कन्यारत्न जन्माला आले आणि हिने पहिल्यांदा नोकरी, स्थिरावणे, मग संसार असा मार्ग पत्करला. गेले काही २-३ वर्षांपासून त्यांच्या वर्गातले सगळेच सोशल मेडिया मार्फत जोडले गेले अचानक आणि संवाद पुन्हा सुरु झाला. त्याच्या मोठ्या मुलीचं लग्न ठरलं आहे, इतक्यातचं साक्षगंधाचा कार्यक्रम पार पडला, होणारा जावई भारतीय असला तरी परदेशात स्थायिक आहे. लग्नाची तारीख इतक्यातच ठरली आणि त्याने हिला आमंत्रण पाठवले, अर्थात आग्रहाचे. हिने जेव्हा ते आमंत्रण नीट बघितले / वाचले तेव्हा हिला महद आश्चर्य वाटले. काहीतरी फार मोठ्या प्रमाणात अशक्य असे घडले होते. दाही बोटं तोंडात, अशी काहीशी तिची अवस्था झाल्याशिवाय राहिली नाही, डोळ्याच्या कडा पाणावल्या आणि अगदी मनापासून "त्याचे" पुन्हा एकदा हात जोडले गेले. 

ह्या माझ्या मैत्रिणीने सातत्याने लहान मोठी नोकरी केली. मुलांना पाळणाघरात ठेऊन वगैरे, सतत पळत राहिली आणि तिच्या क्षेत्रात प्रचंड उंची गाठली, नाव कमावले. पण आता तिला अनेक कारणांसाठी थांबावंसं वाटतंय. तिने राजीनामा देण्याचा महाकठिण निर्णय घेतला आहे. तिला खूप महिने आधी आंतरराष्ट्रीय कंपनीच्या नियमाप्रमाणे, तिच्या हुद्याप्रमाणे कळवावे लागते तिच्या निर्णयाबद्दल आणि तारखे बद्दल. आपण सर्वांनीच हे खूपदा ऐकलं असेल, वाचलं असेल, अनुभवलं असेल कि इतक्या वर्षाची सुंदर चाललेली नोकरी थांबवणं खूप अवघड आहे, मानसिक, आर्थिक, सामाजिक आणि अश्या असंख्य पातळीवर. 

योगायोगाने तिचा ठरलेला शेवटचा कामाचा कंपनीतला दिवस आणि मित्राच्या मुलीच्या लग्नाचा मुहूर्त अगदी लागोपाठ आहे. हि १ तारखेला मोकळी होणार आणि लग्न त्याच महिन्यात ३ तारखेला आहे. त्यामुळे १ तारखेला संध्याकाळी / रात्री किंवा जास्तीत जास्त २ तारखेला पहाटे तिला प्रवास करायला निघावं लागणार कारण लग्न दुसऱ्या शहरात आहे. तिने त्या राज्यातलं लग्न ह्या आधी कधीही बघितलं / अनुभवलं नाही आहे. लग्नाच्या दिवशी रविवार सुट्टीचा वार आहे त्यामुळे सगळे वर्गमित्र, जुन्या मैत्रिणी येण्याचा प्रयत्न करणार आहेत. 

ह्याला योगायोग म्हणावा का "त्याचं" भन्नाट, उत्कृष्ट प्लँनिंग? "त्याने" परदेशातील त्या मुलाला, त्याच्या कुटुंबीयाला सुबुद्धी दिली, सर्वांची ओळख करून दिली, सगळं बिनभोबाट जुळवलं, अगदी जवळची तारीख निश्चित केली, इतक्या वर्षांनी सर्वांना एकत्र आणलं, आणि हि यादी फार मोठी आहे. काय म्हणावं ह्या सगळ्या घडामोडींना? कोण म्हणतो कि "त्याचं" लक्ष नसतं? बघा म्हणजे माझ्या मैत्रिणीला कित्ती साथ देतो आहे तो अप्रत्यक्ष, कित्ती ते कष्ट. ती निवृत्त झाल्याचं होणारा किंचित क्लेश, यातना, अस्वस्थता आहे त्या पासून थोडीशी दूर राहिलं, कदाचित नवीन संधी मिळतील किंवा नवीन खाद्य. "त्याच्या" मनात काय आहे, त्याचा प्लॅन काय आहे हे माहित नाही, पण खूप भन्नाट असणार ह्याची कल्पना येते आहे ह्या सगळ्या मांडणीतून नक्कीच. मी हा अनुभव ऐकून निःशब्द झाले, "त्याच्या" पुढे पुन्हा एकदा नतमस्तक झाले. "श्रद्धा आणि सबुरी" ह्यावरचा विश्वास पुन्हा दृढ झाला.   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...