आज रविवार, माझा हक्काचा सुट्टीचा दिवस. मी ह्या दिवशी पोटभर मराठी वर्तमानपत्र वाचते. अनेक बातम्या अत्यानंद देऊन जातात, काही नवीन भर घालतात ज्ञानात, आणि काही माझ्या हातून काही नवीन लिहून घेतात. तर आजच्या वर्तमानपत्रात एक बातमी आहे. एका पुण्यातल्या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन होते, त्यात प्रमुख पाहुणे म्हणून एक दिग्गज अभिनेते बोलावले होते, बाकी मान्यवरांसोबत. ह्या प्रमुख पाहुण्याने त्यांच्या भाषणात जे सांगितलं ते बातमी म्हणून छापून आलंय. वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे मुलांसोबत पालक देखील आलेच प्रेक्षक म्हणून. मान्यवर म्हणतात कि सध्याची मुलं हुशार आहेत, वयापेक्षा जास्त समज आहे, खूप पराकोटीचं ज्ञान आणि माहिती गुगल विद्यापीठामुळे उपलब्ध आहे त्यामुळे त्यांना हवं ते क्षेत्र निवडू द्या.
माझ्यामते एक तर सध्याचे आधुनिक जाणकार पालक कुठलाही अडथळा आणणार नाहीत किंवा जोर जबरदस्ती करणार नाहीत हे निश्चित, मुलांची अभ्यासाची दिशा ठरवतांना. दुसरं म्हणजे मुलं देखील ऐकणार नाहीतच. तिसरं म्हणजे इतकी जास्त, नको तितकी माहिती उपलब्ध असल्यामुळे उलटं मुलं सैरभैर होतात कधी कधी. कितीही हि पिढी वयापेक्षा निर्णय घेतांना दिसली तरी बरीच जणं गोंधळलेली देखील असतात. इतके जास्त प्रकार अभ्यासाचे उपलब्ध आहेत त्यामुळे देखील असेल.
सर्वात महत्वाचं म्हणजे त्या दिग्गजाने / मान्यवराने माझ्या दृष्टीने अजून एक वाक्य नक्की बोलावे त्यांच्या भाषणात कि "प्रत्येक अभ्यासक्रम महत्वाचा आहे, सर्व पद्धतीचे व्यावसायिक हवेच आहेत जगात. खूप जास्त विचार करू नका. कितीही विचारपूर्वक सगळं निवडलं आणि प्रत्यक्ष अभ्यासक्रम सुरु झाल्यावर असं वाटलं नाही आवडत आहे तर?, असं होऊ शकतं. तेव्हा दोन पर्याय असतात, एक तर तो अभ्यासक्रम सोडता आला तर सोडा आणि दुसरा सुरु करा. पण मग हे कितीदा करणार? काही अभ्यासक्रम सोडता येत नाही, एकदा जीवशात्र, वैद्यकीय अभ्यास प्रवेश घेतला कि पूर्णत्वाला न्यावाच लागतो. त्या पेक्षा गोडी निर्माण करा. पुन्हा एकदा आवर्जून सांगते प्रत्येक व्यावसायिक महत्वाचा आहे. पुढे काय मांडलय हे कोणीच सांगू शकत नाही. त्यामुळे पुढे व्हा, मित्र तय्यार करा, आनंदाने अभ्यास करा, एकत्र गृहपाठ करा, प्रोजेक्ट्स करा, करत राहा, खेळा ई. म्हणजे आवड निर्माण होईल आणि टिकून राहिल. जे आपल्याला आवडतं सध्या ते देखील आपण कधीतरी पहिल्यांदाच केलं असतं, चाखलं असतं नाही का? मग?"
बरं असं गृहीत धरा काही क्षण कि तुम्हाला तुमच्या आवडीनुसार अभ्यासक्रम मिळाला, कोण खात्री देऊ शकेल का कि आयुष्यभर तेच तुम्हाला करायला मिळेल? तुम्हाला आवडणारी लोकंच तुमच्या अवतीभोवती सातत्याने वावरतील, काम करतील? नाही ना? मग? खरं तर त्या मान्यवराने ह्या अश्या संदर्भात त्यांचे भाषण खरं तर सुरु करायला हवे, किंबहुना त्याच नाही प्रत्येक मान्यवराने देखील. माणसांशी, कामाशी, आजूबाजूच्यांशी, घटनांशी, आव्हानांशी जुळवून घेत पुढे जायचं. बास, प्रत्येकजण हेच करतो, करावंच लागतं, पर्याय नाही, मग हे हसत-खेळत स्वीकारा, मान्य करा आणि प्रत्येक कामाची सुरवात करा. कित्ती सोप्पं आहे ना.
प्रत्येकाला हो म्हणा, हा कानमंत्र, रामबाण इलाज आहे हा हे लक्षात तर ठेवाच पण उपयोग करा, कृतीत आणा आणि बघा कशी जादू घडते ते. जवळपासचा अभ्यासक्रम आहे तर तो निवडा, पैशाची सोय बघा आणि होऊन जाऊ ह्या. एकदा पदवी प्राप्त झाली, नोकरी छानशी सुरु झाली कि हळूहळू करा कि तुम्हाला आवडेल ते, चाचपडून बघत राहा काय काय आवडतंय ते आणि सातत्याने कार्यरत राहा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा