"विक्रम वेताळ" नावाची मालिका दूरध्वनी वर मला बघायला जाम आवडायची, लहानपणी. त्या वेताळाची उत्सुकता जास्त वाटायची, भीती नाही, त्याचे हावभाव, हाताचे चाळे ई. खूप आकर्षित करायचे मला. उत्कृष्ट भुमिका केली होती कलाकारांनी त्या वेळी. अमेरिकेत देखील कित्येक वर्षांनी मग पुन्हा एकदा त्या सर्व भागांच्या व्हिडिओ कॅसेट बघायला मिळाल्या आणि तो अनुभव तर शब्दांच्या पल्याड होता.
जेव्हा माझी लेकरं मोठी व्हायला लागली त्या वेळी त्यांना त्यांच्याच अवयवांकडे लक्ष जायचं आणि खूप भरमसाठ कुतूहल वाटायचं. ते भाव, तो उत्साह आणि ते नावीन्य मी खूपदा मनापासून अनुभवलं आणि टिपलं देखील माझ्या मुलांना त्यांची खास अशी खुर्ची होती, त्यात वैविध्य रंगछटा होत्या, सुमधुर त्यांच्या व्हायला लागेल / भावेल आणि रुचेल असं संगीत होतं, खेळणी होती आणि बरेच काही. त्या खुर्चीवर बसवलं कि माझ्या मुलाचा फक्त एक पाय चालायचा, हलायचा, मस्त ठेक्यात, जुन्या पद्धतीच्या स्कूटर ला किक मारल्यासारखा. आणि त्याचं त्यालाच महद आश्चर्य वाटायचं कि हे काय हलतंय, काय होतंय नक्की? मज्जा यायची. त्यानंतर साहेब पोटावर पालथे पहुडले कि दोन्ही हात पाण्यात पोहताना हलवावे लागतात तसे हालायचे, अगदी वेताळ हालचाल करायचा तसे.
त्यावेळी जशी माझ्या मुलांना त्यांच्या स्वतःच्या एक एक बाह्य अवयवांची ओळख झाली, पटली, हळूहळू, ठराविक वेळा / कालांतराने आणि त्याचं कौतुक वाटलं, त्याचा उपयोग समजला, त्याचं अस्तित्व उमगलं आताशा मला अगदी तसेच व्हायला होतंय. मी लहान असतांना असंच काहीस केलं असणार, अवयवांची मला देखील ओळख झाली असणार, पण आता ते मला आठवत नाहीच. पण त्याची भरपाई मात्र नक्की एकदा झाली माझ्या मुलांना मोठं होतांना बघून आणि आता अजून एका पद्धतीने देखील होते आहे. सध्या माझा प्रत्येक दिवस बहुतांशी एक नवीन अंतर्गत अवयवाची नव्याने ओळख करत, अस्तित्व सिद्ध करत सुरु होतो किंवा जातो. मी काही शरीर विज्ञानाची विद्यार्थिनी नाही, त्यामुळे अंतर्गत अवयव कुठले हे फक्त ऐकलं आहे आणि ते हि अगदी थोडक्यात. त्यांचं अत्यंत महत्वाचं स्थान आताशा प्रकर्षाने जाणवायला लागलं आहे. एक वेगळी मज्जा येते आहे, तीच तीच दिनचर्या / उपक्रम न राहता प्रत्येक दिवस आव्हानात्मक उभा ठाकतो आहे. नवीन आव्हान म्हणजे नवे प्रयत्न, नवी उत्सुकता, नवी भरारी आणि नाविन्यपूर्ण समाधान कि अजून एक आव्हान पार पाडता आलं, अजून एक चाचणी परीक्षा उत्तीर्ण झाले. "आने दो" अश्या भूमिकेत शिरता आलं आहे मला आता सहज. शतशः धन्यवाद संपूर्ण शरीर संस्थेला, ओळख पटवून देण्यासाठी (आत्ता, नव्याने), इतकी वर्ष सातत्याने साथ देण्यासाठी कुठलीही कुरबुर न करता, अहाहा च. मला कधीही वाटलं नव्हतंच कि माझं लहानपण ज्यात अवयवांची ओळख होते ते मला पुन्हा एकदा जगता येईल म्हणून, पण बघा नवीन स्वरूपात घडतंय.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा