जास्त मागे जात नाही कारण तितक्या मागचं मी अनुभवलं नाही. एक पिढी फक्त मागे, म्हणजे माझ्या आईची. आज मला एक गुपीत नाही तर रहस्य म्हणा नाहीतर अजून काही. मी लहान होते, आईच्या पाठिमागे पालुपद असे सतत, आणि तिच्या अनेक नित्यक्रमांपैकी एक म्हणजे तिन्ही सांजेला देवापाशी, तुळशीपाशी दिवा लावायचा, शुभंकरोती आणि इतर स्तोत्रे म्हणायची. मी फक्त हे टिपत होते, अनुभवत होते आणि हे असं का करतात? ह्याच वेळी का करतात? ई. च्या फंदात कधीच पडले नाही. नकळत सर्व स्तोत्रे मुखोद्गत झाली आणि मी तिच्या संगतीने म्हणू लागले इतकंच. आज अचानक का कुणास ठाऊक पण काही तरी जाणीव झाली, इतक्या वर्षांनी, ध्यानी-मनी नसतांना, कुठलाही प्रकर्षाने विचार करत नसतांना. मोठी झाले तशी तिन्ही सांजेची वेळ महत्वाची का असते हे शास्त्रोक्त कारण समजलं, तुळशीपाशी दिवा का लावायचा, घरच्या स्त्रीने / मुलीने हे सर्व का करायचं ई. सगळंच हळूहळू समजलं. पण आज काही वेगळं उभं ठाकलं माझ्या पुढ्यात आणि म्हणून हि अनुकथा.
सर्वसाधारण मध्यमवर्गीय कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर चौकोनी कुटुंब, एकत्र परिवार, त्यातले मुलं शाळकरी आणि बाकी इतर मंडळी कचेरीत जाणारी अशी. सगळेच संध्याकाळी दमून भागून येणार, मग दूध, चहा, पाणी, किंचित खाणं / अल्पोपहार ई. झालं कि मग आईच्या जिवाला किंचित थोड्यावेळाची स्थिरता, हात मोकळा. सगळ्यांची पोटं भरली असली कि, घरची महत्वाची कामं आटोपली असली कि, मोठी मंडळी पाय मोकळे करायला देवळात नाही तर फिरायला गेले, मुलं खेळायला कि मग शांत चित्ताने "त्याचं" नामस्मरण. काही क्षण देवघरासमोर मनःपूर्वक बसायला मिळणार, मानसपूजा / देवपूजा ई. मुळे मनःस्वास्थ्य तर लाभणाराच शिवाय वेगळं बळ सर्वांना एकत्र गरमागरम जेवण करून वाढायला. ह्या छोट्याश्या कारणामुळे कदाचित "ती वेळ" नेमण्यात आली होती घरच्या मुली / स्त्रियांसाठी दिवेलावणीची, स्तोत्र पठाणांची असं मला वाटतं.
ह्या विचारानंतर लगेच अजून काही सह-विचार देखील सुचले. त्यात काकड आरतीची वेळ, माध्यानाची वेळ देखील अपूर्व पर्वणीची का हे उमगलं. तेव्हा देखील आई थोडीशी मोकळी असते. काकड आरतीच्या वेळी घरचे साखर झोपेत असतात, माध्यानाला शाळेत किंवा कचेरीत, पुन्हा "त्याच्या" कडे मनःपूर्वक लक्ष देऊन खूप काही साधलं जातं म्हणून. अर्थात ह्या दोन सर्वोत्कृष्ट वेळा सर्वांसाठीच महद फायदेशीर आहेत स्वतःशी, "त्याच्याशी" संवाद साधण्यासाठी, एकरूप होण्यासाठी, मानसपूजा करण्यासाठी.
आपले शास्त्र आणि त्यात सुचवलेले अगदी विज्ञानाला धरून तर आहेच पण सर्वांच्या भुमिकेला अनुसरून देखील.
आमच्या पिढीपासून बहुतांशी सर्वच मुली, स्त्रिया, आया घराबाहेर देखील आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत सहजी. अश्या वर्गाने मग जमेल तेव्हा, जमेल तेवढे, आवडीनुसार हे सगळं किंवा काही अंशी करण्याचा प्रयत्न जरूर करावा, नाहीतर हक्काची निवृत्तीनंतर ची वेळ आहेच तेव्हा करा. ज्या भारतीय मुली / स्त्रिया परदेशी आपला ठसा उमटवत आहेत तेथे वर्षातून १-२ महिने रजा घ्यायची सोय आहे, अश्या वेळी किंवा शनिवार रविवारी, सुट्टीच्या दिवशी काही मिनिटे निश्चित करून स्वानुभव नक्की घ्यावा. ह्या सगळ्याला कदाचित तुम्ही "मी टाईम" अशी नाविन्यपूर्ण संज्ञा देऊ शकता. काहीही चालेल, देव म्हणून नाही तर उत्कृष्ट लहरी निर्माण करणारे साधन म्हणून, श्वासोश्वास वेगळ्या लयींनी होतो म्हणून, किंवा अजून काही छोटासा आधुनिकतेचा साज चढवून बघितलं, आजमावलं तरी देखील चालेल. "ती वेळ" ह्या बाबतीत तुमचे अनुभव ऐकण्यास मी नक्कीच उत्सुक आहेच. कळवा नक्की. स्वतःचीच वेगळी ओळख नक्की होईल आणि पटेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा