गुरुवार, २३ फेब्रुवारी, २०२३

मोठे+छोटे मुळाक्षर+टिम्ब

तपश्चर्या नावाचा एक शब्द मी माझ्या लहानपणी पासून कानावर पडला आहे. त्या शब्दाभोवती एक वलय आहे, होतं किंबहुना कारण तपश्चर्या हि फक्त देव देवतांची, ऋषीमुनींची, काही तरी जगावेगळं साध्य करणाऱ्यांसाठीची अशी. जगावेगळं ह्या साठी कि तप म्हणजे अनेक वर्ष, माझ्या दृष्टीने आचर्य म्हणजे सातत्याने आचरणात आणणे पुढे जाण्याकरता, ध्येय साधण्या करता, आचार्यांनी नमूद केलेले असे काही प्रचंड आव्हानात्मक आणि हो अर्थात आश्चर्य वाटण्यासमान देखील. फार मोठी संज्ञा आहे, त्यामुळे भली मोठी शब्दफोड देखील संभव आहेच ह्या शब्दाची. लहानहोते  त्यामुळे असेल कदाचित पण मोठी होईस्तोवर मी ह्या शब्दापासून एक तर दूर राहिले किंवा तो शब्द फक्त माहिती खातीर होता असं मला वाटलं. मला काय करायचं आहे, एक शब्द आहे,त्याचा हा अर्थ आहे आणि तो अमलात आणणारे हे होते किंवा एका हाताच्या बोटावर मोजता येणारे असे एवढेच आहेत, बास. विषय संपला.

 पण नाही मंडळी, काल मला प्रकर्षाने ह्या शब्दाचा आधुनिक अर्थ उमगला अचानक. त्याचं असं झालं, माझी एक सहपाठी काल विद्यावाचस्पती झाली. "Dr." हि उच्च पदवी तिला प्राप्त झाली. मला आता पुसटसं सगळं आठवतं, साधारण २०१५-१६ च्या दरम्यान सुरु झाली हि घौडदौड, तेव्हा एक मूळचे मार्गदर्शक होते, मग तिसऱ्याची भर पडली आणि काळजी घ्यावी लागली, वेळ द्यावा लागला, स्वतःची तब्बेत खाली-वर झाली, ते पुरलं काही महिने सलग आणि वेदनादायक असं, मग माझ्यामते मार्गदर्शक बदलले, त्यामुळे विचार देखील, ह्या सगळ्या प्रवासात प्रचंड वाचन-मनन-चिंतन, संगणकिय भाषेत अंमलबजावणी, लिखाण, जीवघेणी वाट बघणे निकालाची, विविध पद्धतीचं कस लागणारं लिखाण, शिवाय घरचं-दारचं काम . आता मला सांगा हि एक प्रकारची फारच मोठी आणि जगावेगळी तपश्चर्या नाही का? जी फक्त एक मोठे+छोटे मुळाक्षर+टिम्ब हे मिळवण्यासाठी हो. देव प्रत्यक्ष दर्शन देत नाही, वरदान नाही,  प्रगट होत नाही त्या ऐकलेल्या तपश्चर्येसारखा पण

         . वैविध्य रूपात आढळतो तो (गुरु, गुरुसमान, समीक्षक, परीक्षक .)

. दर्शनही देतो (प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रूपात, जेव्हा गरज भासेल तेव्हा, मित्र, मैत्रीण, स्वतःची ऊर्जा, प्रेरणा देतो .)

. वरदान पण (तुमच्या हातून नवीन ज्ञानात भर पडते, जगाला नवीन दृष्टिकोन कळतो .)

. प्रगट होतो (नाव होतं, बढती मिळते, वाढीव पगार देखील . )

हे फक्त एक उदाहरणं झालं. प्रत्येकजण आपाआपल्या परीने तपश्चर्या करत असतोच, कळत / नकळत.

अजाणतेपणी कोणालाही त्यांच्या तपश्चर्येत भंग पडणार नाही ह्याची काळजी घ्या, जमेल तेवढी मदत नक्की करा, ती तुमच्या तपश्र्चयेंत काही अंशी कामी येईल कदाचित. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...