खरं तर फेब्रुवारीतच उन्हाळ्याची चाहूल लागली आणि आता मार्च मधे तर उन्हाळा व्यवस्थित सुरु झाला आहे असं वाटतं. अचानक खूप वर्षांनी गुलकंद दररोज सेवन करण्याचा भाव दाटून आला मनात, गेले दुकानात आणि आणला विकत, सेवन केला देखील आणि कडा झर्रर्रकिनी ओल्या झाल्या. काय हे? हि मीच का? गुलकंद विकत आणणारी माझी पिढी नाहीच मुळी. गुलकंद दुकानात मिळतो इथपासून मनाला पटत नव्हतंच पण मी थोडीशी धडपड केली आणि हात टेकले. मला समजायला लागण्या आधीपासून आईचा नित्य नियम गुलकंद सेवनाचा, दररोज, ठरलेलं, कधीही म्हणजे कधीही चुकलं नाहीच. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ती खाऊ घालणार ठरलेलं माप, त्यात बदल नाहीच. स्वतःच्या हाताने घरी केलेला असला तरी हू म्हणून फस्त करायचा नाहीच. आमच्या घराच्या आकारापेक्षा कित्येक पटीने मोठी आमची बाग होती, चहू बाजूनी बहरलेली अशी. अगदी मनापासून, विचारपूर्वक लावलेली आणि जपलेली बाग. देशी गुलाब तो अंगणातला, आजोबांच्या गुऱ्हाळातला गूळ आणि साखर, प्रचंड मोठं समोर आणि मागे आंगण, ऊन बेताचं पण हवं तेवढं. बास, काही मिनिटात गुलकंद जेरबंद व्हायचा काचेचा बाटलीत. काही दिवसात खायला तय्यार. गुलाबाचा तो जगावेगळा अप्रतिम हलकासा सुगंध इतका मोहक असायचा, जपला जायचा गुलकंद तय्यार झाला तरी, ऊन खाल्ली तरी, आणि त्या पाकळ्यांची स्वतःची गोडी वाखाणण्या पल्याड अशी. त्यामुळे साखर फार कमी लागायची. चवी बद्दल बोलण्यासाठी माझ्या शब्दकोशात तरी उपमा नाहीच.
कुठलीही तुलना नाही, पण आज त्यातल्यातात पौष्टीक अशी मनाची समजूत काढून मी एक घास घेतला आणि लक्षात आलं कि अजिबात गरज नसतांना साखरेचा पाक करून त्यात पाकळ्या घातल्या आहेत किंवा ह्या गुलकंदाने कधी नव्हे ते सुर्यबाप्पा शिवाय गॅस चे चटके सहन केले आहेत. आवेष्टन अक्का पॅकिंग पण प्लास्टिक चे आहे ह्या विकतच्या बाटलीचे. मला काहीच गंध नाही प्लास्टिक संबंधी, पण प्लास्टिक च्या बाटलीत उन्हात गुलकंद पौष्टीक होणार नाही कदाचित किंवा चव पण बदलेल.
मी देशी गुलाबाच्या पाकळ्या कोठे मिळतात का हे शोधलं, मला मिळाल्या देखील पण ना चव ना सुगंध. आणि जरी चांगल्या दर्जाच्या मिळाल्या तरी मी दिवसभर घराबाहेर, त्यामुळे अगदी मोजूनमापून ऊन देणं हे समीकरण जमण्यासारखं नव्हतं. आई बारकाईने ह्या सगळ्याकडे लक्ष द्यायची, गुगल-बाबा, यूट्यूब वैगैरे नसतांनाच्या काळात. साग्रसंगीत ती चव, तो पौष्टिकपणा, तो उपयोग, ते उन्हापासून सौंरक्षण प्राप्त व्हायचं तेव्हा.
तिच्या पेशल गुलकंदाला राजहंसाची उपमा द्यावीशी वाटली मला अगदी मनापासून, कारण राजहंस = अतिशय दुर्मिळ चव, पौष्टिक, मायेने ओतप्रोत, प्रिझर्व्हेटिव्ह्ज = परिरक्षक स्पर्श न झालेले, वर्षानुवर्षे मिळालेले असे म्हणून.
A tale of changing times; changing life styles and differing experiences so difficult to accept and adapt to. Yet, memories remain the glue that binds the past ever so tightly, preserving the cauldron of special memories of the days bygone; memories that rejuvenate spirits and reinvigorate the passion to relive times gone by...
उत्तर द्याहटवा