बुधवार, ८ मार्च, २०२३

मिडल नेम

भारतात तर नाव आणि आडनावांमधे मिडल नेम लिहिण्याची प्रथा आहे, अर्थात महाराष्ट्रात तरी. मुलगा असला तर त्याचे नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव. मुलगी असली तर लग्नानंतर तिचे नाव, नवऱ्याचे नाव आणि नवीन आडनाव. आताशा बऱ्याच जणी पहिले नाव, माहेरचे आडनाव आणि सासरचे आडनाव असे पण लिहितांना दिसतात / आढळतात. काही अगदी हाताच्या बोटांवर मोजण्या इतके जण मधले नाव आईचे पण लावतांना बघायला मिळते आहे इतक्यात. पण ढोबळ मानाने आधी वडिलांचे आणि मग नवऱ्याचे नाव लावण्याची परंपरा आहे आणि ती निभावली जाते आहे, मुलीच्या नावासोबत.  कचेरीत उच्च पदावर काम करणाऱ्या महिला / मुली, संशोधन करणाऱ्या मुली देखील प्रत्येक वेळी त्यांचं नाव सांगतांना नवऱ्याचं नाव आणि लग्नानंतरचं आडनाव  ठळकपणे सांगतातच. नोकरी किंवा संशोधन ह्या करतात आणि ठळकपणा कोणा दुसऱ्याचाच?. मग असंच नवऱ्याच्या कचेरीत घडतं का? काम करणार नवरा नाव आणि आडनाव बायकोचं? अशक्यच. 

पिढ्यांपिढ्या भारतात आणि खास करून महाराष्ट्रात असं आढळलंय कि नवऱ्याचं नाव जास्त वर्ष राहतं सोबत कारण आधी तर मुलींची लग्न फार कोवळ्या वयात होत होती. 

आज एका मिटिंग च्या उपस्थितीचा कागद सही करतांना मला हे जाणवलं प्रकर्षाने कि अगदी प्रत्येक ठिकाणी मुली लग्नाआधी त्यांच्या वडिलांचं आणि नंतर नवऱ्याचं नाव सोबत घेऊन जातात, जेथे जातील तेथे. कचेरीतल्या किंवा संपर्कातल्या सर्वांना नवऱ्याचं नाव काही दिवसात अगदी तोंडपाठ होतं, कारण ते प्रत्येक यादीत ठळकपणे असतंच. त्यामुळे मिडिल नेम ची पण ओळख होते, टिकते, ते त्या कचेरीचा एक भाग होतात, काहीही न करता, प्रत्यक्ष काम न करता. त्यांना एक स्थान मिळतं सहज. किती जणांना नवऱ्याच्या कचेरीत किंवा मित्रमंडळात प्रत्येकाच्या बायकोच नाव तोंडपाठ असतं? सांगा पाहू, अशक्य, एखाद्याला ठाऊक असेल. अगदी इंग्लिश स्पेलिंग मधे सुद्धा जेव्हा केव्हा ते म्हणजे शब्द त्याच्या स्पेलिंग सहित जन्मले त्यावेळपासून SHE मधेच HE आहे, MAN हा WOMAN चा अविभाज्य भाग आहेच, पण उलटं कदापी शक्य नाहीच.

कमीत कमी दोन नावं, काही वेळा दोन आडनावं, मुलांच्या नावात स्थान नाही, घर-दार-गाडी ई. वर सहसा नाव नाही तरी देखील जेथे जाऊ तेथे संपूर्ण नाव चं उच्चारलं जातं हि शिस्त, हा बाणा, हि सवय, हा आदरभाव ई. मुली गेले अनेक दशकं सांभाळत आल्या आहेत. स्वतः सर्वार्थाने अलिप्त, कुठेही एकटी अशी दृश्य नाहीच, आणि शिवाय एवढं करून प्रत्येकीला हवा तो मान सन्मान मिळतोच असं नाही. तर अशी हि मिडल नेम ची कहाणी थोडक्यात. सर्वांना माहित असलेली पण पुन्हा एकदा सांगावीशी वाटली. आता एक पाऊल पुढे पडले आहे, पदवी साठी, बँकेच्या व्यवहारासाठी काय ते आईचं नाव विचारलं / वापरलं जातं. प्रत्येकीला मिडिल नेम ची कल्पना आहेच, सवय आहे, सगळं मान्य आहे, फक्त बाकी सर्वांनी हे ध्यानात ठेवा आणि वागा एवढीच नम्र विनंती. "पेराल ते उगवेल", मान द्या, देत राहा, मान आपोआप मिळेल. साधं, सोप्प आणि सरळ समीकरण आहे हे.  मुलांचं बरं आहे जन्मापासून काहीही बदल नाहीच, संपूर्ण नाव तेच, कधीही. काय मज्जा आहे नाही. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...