शनिवार, ११ मार्च, २०२३

ध्वनी आणि वायुप्रदूषण

माहित नाही का पण एकाच व्यक्तीची जयंती एका पाठोपाठ एक, म्हणजे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कशी काय साजरी होते? कसं शक्य आहे ते? दिवस आणि तिथीनुसार असेल कदाचित, आणि काही जण तारखेनुसार तर बाकी तिथीनुसार साजरा करत असतील. माननीय, आदरणीय शिवाजी महाराजांसारखा राजा, त्याची जयंती हि एवढ्यात माझ्या डोळ्यादेखत दोनदा लागोपाठ काही दिवसांच्या अंतराने साजरी झाली. फेब्रुवारीत साजरी झाली ती ढोल पथक, शिवाजी राजांची मूर्ती किंवा पुतळा ह्यांची मिरवणूक, ते देखील शिस्तीत सजवलेल्या पालखीतून, अनवाणी पायांनी चालून, भारतीय वेशभूषा करून, मूर्ती स्थापना, पूजा, आरती ई. करून. काही प्रमाणात तरी साधं सोज्वळ होता हा सोहोळा. 

मार्चमधे / इतक्यातच कचेरीतुन परततांना सहज लक्ष वेधलं गेलंच कारण संपूर्ण भला मोठा रस्ता व्यापणारा केशरी झेंडा लावला गेला होता. संपूर्ण रस्ता केशरी झेंड्यांनी सजला होता. म्हटलं आता काय हे नवीन आणि संध्याकाळी कान फाटतील इतक्या मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरु झाला. सगळेच हादरले कि नक्की काय होतंय किंवा काय झालंय? नीट कान देऊन ऐकलं तेव्हा काही क्षणातच उमगलं कि ह्या गोळ्यांचा कर्कश्य आणि सलग आवाज येतोय तो आधुनिक दुचाकीतून, रूपभेद केलेल्या सायलेन्सर मधून येणारा. शेकडोने होत्या गाड्या, ३-४ तास सलग चाललेला होता तो सोहोळा आवाजाचा,  ध्वनी आणि वायुप्रदूषण. पहिल्या दिवशी संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी तेच. हे असं केल्याने काय साध्य होते? इथे शिवाजी महाराज आणि त्यांची जयंती कुठून आली? अशी जयंती का साजरी करायची? शिवाजी महाराज तर पायी, घोड्यावरुन जायचे-यायचे, मग मोटार सायकल का? आणि त्या देखील शेकडोंनी? ह्या सगळ्यांना काही धरबंध नाहीत का? शेजारी पाजारी जेष्ठ नागरीक, नवीन जन्मलेले आणि रुग्ण, रुग्णालय, शाळा असतात. त्यांना त्रास होतोच पण ह्या अश्या मिरवणुकीत सामील झालेल्यांच्या कानांच्या नाजूक पडद्याचं काय? इतकं पेट्रोल महाग झालंय ह्यांना कसं काय परवडतं आणि हा असा अपव्यय का त्या ठरावीक साठा असलेल्या इंधनाचा. कोण परवानगी देतं ह्याला? बरं हे सगळं झालं माणसंच, मुक्या जनावरांचं, प्राण्यांचं, पक्षांचं, किटाणूंचं काय? धरतीमातेला प्रचंड, भयानक आणि असह्य असे हादरे बसतात त्याचं काय? काहीच घेणं देणं नाही का कोणालाच? शिवाजी महाराज ह्या पैकी कुठलीही गोष्ट कधीच सांगून गेले नाही, त्यांच्या कृतीने दाखवून गेले नाहीत. त्यांनी घडवलेल्या आदर्शांपैकी एक कण तरी का नाही आत्मसात करायचा? त्यांचे गड किल्ले का नाही जपायचे ह्या मोटरसायकलीत खर्च करण्यापेक्षा? दररोज, दरवेळी न चुकता मानसपूजा तरी हे मोटरसायकल चालवणारे तरुण करतात का? नतमस्तक होतात का? सर्व गावातल्या मोठ्या लोकांनी, राजकारणी व्यक्तींनी एकत्र येण्याची गरज आहे आणि ह्या तरुण पिढीला समजावून सांगायची, ते ऐकतील अश्या भाषेत किंवा पद्धतीने. हे सर्वार्थाने थांबणे अत्यावश्यकच आहे, ताबडतोब, सुष्टीची सहन शक्ती संपण्याच्या आत. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...