आपण अनेक वर्ष हे बघितलं आणि अनुभवलं आहे कि बहुतांशी कुठल्याही नवीन उद्योगाचं, कामाचं उदघाट्न हे फीत कापून केलं जातं. फीत कापण्या करता दिग्गज, अनुभुवी, प्रथितयश, जेष्ठ अश्या व्यक्तिमत्वानां आमंत्रित केलं जातं. फीत कापली कि त्या नव्या ठिकाणी प्रवेश, मग त्या नव्या उद्योगाची माहिती, दर्शन आणि भेटीगाठी ई. त्या कार्यक्रमात समाविष्ट केले असते, थोडक्यात गोडी. मग ते आमंत्रित चार शब्द बोलतात, आशीर्वाद देतात, संभाषण करतात आणि त्या नंतर इतर जणांना प्रवेश दिला जातो वगैरे. फीत कापणे ह्या पद्धतीची सुरवात म्हणे १८०० साली झाली, अमेरिकेत पहिले आगगाडीचे इंजिन सुरु होते वेळी. खात्रीशीर माहिती नाही, आणि त्यानंतर ती प्रथा सुरु राहिली.
भारतीय पद्धतीनुसार कुठलीही नवीन सुरवात म्हणजे एक बंधन असते. जसे कि लग्न, मुंज, राखी, मैत्र्य आणि इतर असे बरेच. लग्नात उपरणं आणि शाल ह्याची गाठ बांधली जाते, मान्यवरांना फेटा / पगडी बांधले जाते, हातात विशिष्ट मंत्रोच्चारात धागे + हळकुंड बांधले जाते, बोटात देखील काही तरी बांधतात. मुंजीच्या दरम्यान पक्की गाठ बांधून (काही ठिकाणी विविध छोट्या आकाराच्या गाठी बांधून) जानव्ह् गळ्यात घातलं जातं, एक बंधन म्हणून. राखी पण मनगटावर बांधली जाते, मंत्रवून अनेक पूजे दरम्यान (उदा. वास्तू) पवित्र धागे बांधले जातात, मैत्री दिवस सुद्धा रंगबिरंगी तरुण पद्धतीचा बँड बांधून साजरा करतात (नवीन झालेली मैत्री किंवा जुनी नावीन्याने भरपूर असावी + टिकावी म्हणून)... अशी अनेक उदाहरणे देता येतील.
भारतीय परंपरेनुसार जर नवीन सुरवात बंध निर्माण करून होते तर मग उदघाट्न फीत कापून का? हा मला पडलेला ज्वलंत प्रश्न आहे, का? कुणास ठाऊक. बरं, कापून झाल्यावर त्या फितीचं काय होतं? कदाचित फेकून दिली जाते. ते दोन तुकडे सांभाळून, व्यवस्थित फ्रेम करून, त्याच व्यवसायाचे दुसरे / तिसरे ठिकाण उघडतांना पुन्हा वापरले जाते का? तर नाही. मग जर हे फक्त १. फोटो पुरते, २. इतर सगळे करतात म्हणून, ३. जाहिराती साठी अशी कारणे असतील तर माझ्याकडे ह्या पेक्षा जास्त चांगले पर्याय आहेत, आणि ते असे:
- जेष्ठ, श्रेष्ठ, दिग्गज व्यक्तींना आमंत्रित करा आणि त्यांना एक बंद / धागा / बँड / राखी असे काहीतरी आणायला सांगा, त्यांच्या पद्धतीचे, आवडीचे असे
- उदघाटनाच्या प्रवेश द्वारात दिप प्रज्वलन करा, तोरण आधीच लावले असतेच
- मग एक सुंदर, शोभिवंत / सुशोभित असा खांब किंवा वस्तू ठेवा ज्याला आणलेले धागे / बँड बांधता येतील
- बांधतांना प्रत्येक दिग्गजाने त्या बँड बद्दल, रंगा बद्दल, पद्धती बद्दल, आणि नवीन वास्तू / उद्योग किंवा ज्याचं उदघाट्न आहे त्या बद्दल बोलावे
- अश्या पद्धतीचा बँड / बांधण्याची वस्तू का निवडली, त्याचा काय संबंध ह्या नवीन उद्योगाशी असे काहीसे सांगावे
- ती सर्वांनी भरभरून आशीर्वाद देत बांधलेला खांब / तत्सम गोष्ट प्रवेशद्वारात नेहेमी करता जतन करावी
- प्रत्येकजण बांधतांना, बोलतांना, समजावून सांगतांना फोटो काढावे
- हे फोटो जाहिराती साठी उपयोगी ठरतील, नक्कीच
- फीतच वापरायची असेल तर गणपती बाप्पांच्या मूर्ती भोवती मांडल्यासारखी ठेवावी, मनात प्रार्थना करावी, साकडं घालावं उद्योगाची भरभराट व्हावी म्हणून
असे असंख्य आणि मस्त वेगळे पर्याय आहेत, अजमावून बघायला काय हरकत आहे.
प्रत्येक जण जेव्हा हे असे बंध बांधेल तेव्हा टाळ्या पण वाजवाव्यात. उदघाट्नकाराला थोडासा जास्त अभ्यास निश्चित करावा लागेल, अगदी किंचित खर्च करावा लागेल ते बँड / धागा विकत आणायला, विचारपूर्वक शोधून बँड घ्यावा लागेल, त्या करता थोडीशी भटकंती होईल, पायपीट होईल पण ती मुल्यवान ठरेल हे निश्चित.
अगदी प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट कपडे, मोबाईल, घड्याळ, खायला, घरातल्या वस्तू, गाडी अगदी सगळं नावीन्याने भरपूर लागतं मग उदघाट्न नवीन भारतीय / आपल्या मूळ पद्धतीने का करायचं नाही? काही जणं होम-हवन, पूजा-अर्चा पण करतात उदघाट्न करते वेळी आधी, घरच्या, जवळच्या माणसांसोबत आणि मग फीत कापण्याचा कार्यक्रम होतो. (आधी ओवाळायचं, मग मेणबत्ती विझवून केक कापायचं, असं काहीसं).
रिबीन देखील मूळ उपयोगाची बांधण्याकरता असते, तेव्हा बांधा, कापू नका जमल्यास, नवीन सुरवात करतेवेळी. अनेक वर्ष उद्घटनाच्या वेळी एकचं एक समारंभ बघून कदाचित वेगळं करावं असं मनात आलं असेल माझ्या. अजमावून बघा, आवडलं तर कृतीत आणा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा