मंगळवार, १४ मार्च, २०२३

पौष्टिक गरम भेळ-उपमा

मी मागे अनेकदा उल्लेख केल्याप्रमाणे माझ्या घरी ज्या स्वयंपाक करणाऱ्या मावशी आहेत त्या माझ्या स्वयंपाक घरात उभ्या उभ्या हिंडून येतात, कुठे भटकून येतात कुणास ठाऊक?, दुबई का अमेरिका?, पण जातात हे खरं. किंबहुना, माझ्या स्वयंपाक घरात निश्चित नसतात हे खरं. आताशा माझा त्यांच्याबद्दलचा इतका गाढा अभ्यास झाला आहे कि त्यांच्या चालीवरून, घरात शिरण्याच्या पद्धतीनुसार, उत्तर देण्याच्या पद्धत / संभाषण ह्या वरून पट्टाकिनी समजतच. आज देखील दौऱ्यावर होत्या बहुदा, लांब पल्ल्याच्या, त्यामुळे त्यांनी फारच उच्च दर्जाची पौष्टिक न्याहारी करून मला खाऊ घातली. मला विचारल्यासारखं केलं, मी सांगितलं व्यवस्थित, त्यांनी केलं, मी खायला घेतलं आणि उडालेच. मस्त, भन्नाट, नाविन्यपूर्ण पदार्थ मी पट्टदिशी फस्त केला घड्याळाच्या काट्याकडे नजर ठेऊन. खाता खाता हे विचार आले, म्हटलं मांडव इथे, म्हणून हा पंक्ती प्रपंच हो. 

माझ्या पुढ्यात होता तो उपमा. त्याला खरं काय उपमा देऊ हेच समजायच्या आता मी तो संपवला देखील. आज उपवास असल्यामुळे बाकीच्यांसाठी खिचडी होती, हा जगविख्यात उपमा फक्त माझ्या साठी पेशल तय्यार केला गेला होता. त्यामुळे माझी ती नैतिक जबाबदारी होती संपवण्याची. घरी केलेला, गरमागरम, पहिल्या वाफेचा, किंचित तुपाची धार असलेला, कांदे, गाजर, उडीदडाळ, अर्थात मिरची कढीपत्ता सहित साग्रसंगीत असा तो. पोह्यावर, ते देखील घराबाहेर टपरीवर का माहित नाही पण कच्चा कांदा वरून पेरून देतात काही ठिकाणी. संध्याकाळी भेळेत कच्चा कांदा बरा वाटतो, पण सकाळी? खातात बरेच लोकं. असो. पण उपम्यावर कोणी वरून कच्चा कांदा वाढलेला, किंवा घेतलेला मी कधीच बघितला नव्हता. आज मला दुग्धशर्करा योग अनुभवता आला. गरम उपमा आणि ना शिजलेला ना कच्चा माल त्यात. वा, म्हणजे वा च. कोथिंबिरीत रवा होता का रव्यात कोथिंबीर हा पण यक्षप्रश्न पडला मला. पण मज्जा आली, काय ते प्रत्येक वेळी एकसारखं खायचं? विविधता पाहिजे कि नाही?, "एका दगडात दोन..." हो आज, भेळ पण आणि उपमा पण, गरम भेळ. सगळ्या भाज्यायुक्त, अर्ध कच्या, घरी केलेला म्हणजे मस्त पौष्टिक असा. अहाहा, माझ्या दिवसाची सुरवात अतिशय अप्रतिम पद्धतीने केल्यामुळे शतशः धन्यवाद मावशींना. भटकंतीला गेल्या होत्या तेथे शिकून आल्या कदाचित हा असा नवीन पदार्थ आणि ताबडतोब वेळ वाया न घालवता, विस्मरणात जाण्याआधी मला खाऊ घातला देखील. दिसतं होता तो आंतरराष्ट्रीय, परदेशी स्पर्श भारतीय उपम्याला. म्हणून म्हणाले मंडळी, बहुतांशी त्या भारताबाहेर गेल्या होत्या चक्कर मारायला हे सिद्ध झालं जे मला वाटलं होतं, आहे कि नाही मी हुशार?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...