रविवार, ८ ऑक्टोबर, २०२३

मस्त बदल

माझी राणी, माझी प्रिय गाडी सध्या फक्त एकाजागी उभी असते. मी इतक्यातच स्वेच्छानिवृत्ती घेतल्यामुळे तिचा पण दिनक्रम बदलला पूर्णपणे. पण तरी देखील मी माझ्या पायांना व्यायाम म्हणून, गाडी चालवायची सवय राहावी म्हणून, गाडी चालवत ठेवावी म्हणून आणि ताजी हवा खाण्यासाठी जमेल तेव्हा तिला बाहेर काढतेच, बहुतांशी सकाळी, कारण रहदारी जराशी कमी असते. कधी देवळात तर कधी बाजारात तर कधी विनाकारण चक्कर असे माझे प्रकार सध्या सुरु आहेत. त्यात मला सर्वांशी पोटभर गप्पा मारायला प्रचंड आवडतात आणि हि माझी राणी तर माझं कित्येक वर्ष ऊन, वारा, पाऊस, थंडी ह्या सर्वांपासून फक्त रक्षणच करत नाही तर मला हवं तेथे हवं तेव्हा नीट ने आण करते आहे सातत्याने गेली कित्येक वर्ष. मग अश्या माझ्या राणीशी मी नाही बोलणार हे अशक्यच ना. सुरवातीला मी फक्त गाडी चालवणं ह्याचा उपभोग घेतला. मग विविध रस्ते न्याहाळले. अनोळखी रस्ते पादाक्रांत केले, नवीन दुकाने, त्यांचे फलक ई. बघण्यात मज्जा आली आणि तदनंतर मग राणीशी संवाद साधणारच इतक्यात जणू काही तिचाच मला फोन आला हो. तिला बोलायचं होतं म्हणे. म्हणते कशी, इतकी वर्ष सतत एकाच मार्गावर आपण जात-येत होतो. तोच रास्ता अगदी क्वचित बदलत होता. पण आता नवनवीन रस्ते, सावकाश आनंदाने आणि कुठलीही घाई न करता चालवणे / चालणे मी पण खूप म्हणजे खूप एन्जॉय करते आहे, थँक यू. 

अगदी तस्सेच आज पुन्हा एकदा घडले. माझी एक मैत्रीण आहे तिने मला एक योगाच्या व्हिडीओ ची लिंक काल पाठवली आणि हक्कने म्हणाली कि बघ आणि कर पण. सलग चौदा दिवसांचे आव्हान आहे, ते नक्की कर. म्हटलं काय हरकत आहे, फायद्याचं आहे, घर बसल्या करायचं आहे आणि इतक्या प्रेमाने सांगितलं आहे, तो शिक्षक प्रचंड लोकप्रिय आहे, मग चला. आणि आज बरोबर साडे सहा ला सकाळी मी योग करायला सुरवात केली. तो म्हणेल तसे पण मला मानवेल तसे देखील, म्हणजे माझ्या पायांना साजेसे बहुतांशी सगळेच प्रकार मी केले. आणि महद आश्चर्य घडलं. पायांचा ताबडतोब फोन आलाच. रोज तेच तेच व्यायाम प्रकार करून आम्ही बदलाची वाटच बघत होतो आणि तो आज तू दिलास, अहाहा च. मज्जा आली. 

तर असे हे माझे सगळे, प्रेमाने आणि ताबडतोब निरोप देतात किंवा धाडतात हो, आणि ते मला ऐकू पण येतात, फ्रिक्वेन्सी किंवा कंप्रता कसली जुळली आहे म्हणून सांगते आमची. 

त्या माझ्या मैत्रिणीला, त्या योग गुरूला, यू ट्यूब ला, इंटरनेट ला, मोबाईल ला सर्वांना शतशः मनापासून धन्यवाद. बदल मस्त आहे.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...