कोणीतरी म्हटलं आहे ना कि माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो, शिकत असतो किंबहुना शिकायलाच हवे सातत्याने. आज नकळत तसे घडले माझ्यासोबत. मी एक नवीन शब्द शिकले माझ्या मातृभाषेतला. आणि त्यामुळे फारच वेगळं मस्त वाटतंय आज.
बाकी देशातलं माहिती नाही पण आपल्या भारतीयांमधे बऱ्याचदा असं आढळून आलं आहे कि कामं पुढे ढकलली जातात. अर्थात असे करणारा वर्ग नगण्य असेल, पण अस्तित्वात आहेच. उद्या करू, नंतर बघू, आत्ता करायची काय गरज आहे, काही वेळाने केल्याने काय बिघडणार आहे ई. वाक्य ऐकायला मिळतात, कानावर पडतात. काहींच्या बाबतीत तर अशी ढकलाढकली प्रत्येक गोष्टीत नजरेस पडते. अगदी गळ्याशी आल्यावरचं पावलं उचलायची. असं का हे त्यांनाच ठाऊक. काही विद्यार्थी गृहपाठ किंवा कुठलेही शिक्षकांनी दिलेले काम, खूप आधी गृहपाठ देण्याची / सादर करण्याची तारीख कळवून देखील अगदी शेवटच्या घटकेला काम करायला सुरवात करतात. मग कधी इंटरनेट चालत नाही, नाही तर कधी डोकं / बोटं, ताप काय येतो आणि बरेच काही.
बरेच जण कचेरीसाठी, मिटिंग करता, महाविद्यालयात जाण्यास इतके उशिरा घराबाहेर पडतात, दररोज कि ज्याचं नाव ते. मग काय जोरात गाडी चालवणं, रस्त्यावर गडबड करणं, कटकट, दुसऱ्याला दोष देणं, उशिरा पोचल्यामुळे राग आणि कारणं सांगणं... काय हे आणि कश्यासाठी. दररोज ची रोजनिशी पाळली तर सगळं सुकर होतं. "उपचारांपेक्षा खबरदारी चांगली" नाही का?
मी अनेक वर्ष शिक्षण क्षेत्रात काम केल्यामुळे बघितलं आणि अनुभवलं आहे कि अगदी शेवटची भरपूर मोठ्या गुणांची परीक्षा असली तरी देखील उशिरा पोचायचं, आणि ते देखील कसे तरी, धापा टाकत, चुरगलेले कपडे, अव्यवस्थित केस, संगणक मग सुरु होत नाही, समूहात काम करत असून दुसऱ्याकडे टीम मेंबर कडे काहीही नसतं ई. अवघड आहे. अर्थात टापटीप येणारे बोटावर मोजण्या इतके असतात देखील.
हा काही उदाहरणावरून आणि काल झालेल्या चेंडू-बॉल + फळी-बॅट क्रिकेट च्या खेळात झालं तसं विलंबचीत होणं टाळणं सहज शक्य आहे, सर्वांच्या हातात आहे. वेळेला महत्व द्या. सगळी अवजारे तपासा आधीच, वेळेआधी हजर राहा नेहेमीच, तय्यारी ठेवा, शिस्त बाळगा सर्वांनी, प्रत्येक क्षेत्रात कितीही लहान किंवा मोठ्या पदावर गेलात तरी देखील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा