कालच्या वर्तमान पत्रात एक बातमी वाचून माझे डोळे उघडले आणि पाणावले देखील. अनेक विकलांगांनी आपल्या देशाची मान पुन्हा एकदा अभिमानाने उंच केली. अनेक खेळ गटात प्राविण्य मिळवले, पदकं पटकावली आणि हे सगळं अत्यंत चिकाटीने, कठिण परिस्थितीत, शारिरीक मर्यादा असतांना, प्रयत्नांची पराकाष्ठा करून. त्या सर्व खेळाडूंना, त्यांच्या स्व-प्रेरणेला, अपार कष्टांना, मेहेनतीला, त्यांच्या गुरुजनांना, कुटुंबाला माझा साष्टांग नमस्कार.
अंकुर धामा हा एक धावपटू आहे. लहानपणी काही वर्षांचा असतांना त्याची दृष्टी गेली. त्याने धावण्याच्या शर्यतीत भाग घ्यायला सुरवात केली, पदकं मिळवली आणि त्यामुळे त्याला एक दिशा मिळाली. आता आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील त्याला बरेच सन्मान मिळत आहेत. एवढ्यातच त्याने अजून भरपूर पदकाची कमाई केली आणि त्या बद्दलची बातमी छापून आली होती कालच्या वर्तमानपत्रात जी माझ्या वाचनात आली. अंकुरला एका डोळस धावपटूने ह्या शर्यतीत मदत केली असं त्या दोघांचं छायाचित्र छापून आलेलं आहे. दोघे त्यात काही तरी पकडून आहेत, नाहीतर त्याशिवाय एकत्र पळणे शक्य नाहीच. बातमीत लिहिल्या प्रमाणे कमीत कमी सलग दोन महिने एकत्र सराव करावा लागतो म्हणे दोघांना तेव्हा कुठे दोघांच्या पायांची लय सांभाळली जाते, कोणालाही इजा होत नाही, दुखापत होत नाही. तो अंकुर सोबत पळणारा, साथ देणारा दिशादर्शक असतो, सोबती असतो, मार्गदर्शक असतो आणि जाणिवांचे भान असणारा आणि जपणारा असतो. अंकुर पूर्णपणे त्याच्या सांगण्यावर अवलंबून असतो आणि तशी पाऊले टाकतो, जिंकण्याच्या दिशेने, दृढविश्वासाने.
मी ह्या आधी फक्त परीक्षेचे प्रश्नपत्रिका लिहायला मदतनीस एवढंच काय ते ऐकलं होतं, अंध व्यक्तींबद्दल.
पण एका धावपटूला निस्वार्थ पणे मदत करणे, त्याच्या एवढीच, किंबहुना कणभर जास्त मेहेनत घेणे, पळणे, नियमित व्यायाम करणे, खाण्यापिण्यावर प्रचंड बंधने पाळणे, ध्यान करणे, अंकुर ला त्याच्यापेक्षा जास्त समजावून घेणे, कुठे कधी कसे वळायचे, खाली वर रस्त्यावर पळतांना कसे सांगायचे ह्याचे भान राखणे, आणि हे सर्व कुठल्याही पदकाची अपेक्षा न ठेवता, बाप रे अहो हि याही तर न संपणारीच आहे... माझ्या शब्दकोशात ह्या बद्दल शब्द नाहीतच. आणि ह्या साथीदाराला एक प्रचंड समाधान नक्की मिळत असेल, किंवा तो देखील एक खेळाडू असेल पण पदक शेवटी अंकुरलाच मिळणार.
ह्या करता मला सुचलेला एक उपाय आणि एक तरणोपाय असा:
उपाय : (जो माझ्या हातात नाही किंवा सहज शक्य नाही) सरळ रस्ता / ट्रॅक बांधणे अश्या शर्यतींकरता
तरणोपाय : (सहज शक्य आणि सध्या वेगळ्या पद्धतीने वापरात असलेला, ओळखीचा असा) आपली सिरी ताई, किंवा अलेक्सा मावशी मग कधी कामाला येणार? त्यांना रस्ते कसे वाचायचे हे ठाऊक आहे, ते समोरच्याला वैविध्य भाषेत कसे कळवायचे ते पण माहित आहे आणि ईअर-फोन / हेड-फोन / एअर-पॉड्स अश्या तावून सुलाखून निघालेल्या अनुभवी वस्तू देखील आहे. अशी तंत्रज्ञाची साथ मिळाली किंवा घेतली तर जास्त सोईचं होईल असा माझा अंदाज आहे.
अर्थात मी ना धावते, ना मी कुठलीही क्रिडापटू आहे. पण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम केलं आहे, ह्या अश्या वैविध्यतेने नटलेल्या गोष्टी माणसाचे जीवन सुकर करण्यासाठीच आहेत ह्या वर दृढ विश्वास आहे आणि संभवनीय आहे ह्याची खात्री आहे म्हणून मांडले माझे विचार येथे. प्रयोग करून बघायला काय हरकत आहे? शेवटी ते पिटुकला श्रवण यंत्र फक्त वापरून बघायचे आहे, आणि त्याला संपूर्ण रस्ता आधीच कळवायचा / फीड करायचा आहे, बास.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा