सध्या जी संपूर्ण पिढी किशोर वयात आहे, त्याच्या विशीकडे वाटचाल होत आहे त्यांच्या जडण घडणाबद्दल मला थोडंस बोलावसं वाटतंय. ह्या वयोगातील मुलं आणि मुली हे मोठे होत असतांना किंबहुना अगदी त्यांच्या लहानपणीपासूनच ते बहुतांशी आजी आजोबांशिवाय वाढले, विभक्त कुटुंबात वाढले. हे काय कमी होतं म्हणून घरचे पालक देखील संपूर्ण दिवस बाहेर होते त्यांचे. ह्या वयातील मुलांना त्यामुळे आईची, वडिलांची माया प्रेम नक्कीच मिळालं पण त्यांना "दुधाची तहान ताकावर" भागवावीच लागली. काही ठिकाणी तर आई इतकी वोर्कहोलिक, कामात प्रचंड व्यग्र होती, तिचे काम इतके वेगळ्या पातळीचे होते कि तिला मुलांसाठी हाती होता तेवढाच वेळ सदुपयोगी लावावा लागला. 'क्वालिटी टाइम' हि संकल्पना कदाचित ह्या पिढीपासून सुरु झाली असावी. हातात असलेल्या वेळेत भरभरून देणे, त्या सुक्ष्म वेळेत जगून घेणे, तो असलेला वेळ कसा उपयोगी आणायचा ह्याचे नियोजन करणे आणि सर्वार्थाने तो उपभोगणे, अगदी लक्षात राहिल असा, समाधान देऊन जाईल असा. तारेवरची कसरतच जणू. पण त्यामुळे हि पिढी फक्त जडण घडण होण्यासाठी आई वडिलांवर अवलंबून नव्हतेच कधी. त्यांनी इतरांकडून देखील खूप आत्मसात केलंय. अर्थात त्यात तंत्रज्ञाची भर आहेच. पण ते फक्त झापड लावल्यासारखे वाढले नाहीत, किंवा शारीरिक वाढ झाली नाही तर डोक्याचा वापर नक्की झाला. हि मुलं तशी त्यामुळे सर्वच शिकण्याची फार घाई असल्यासारखी पण मला भासली अनेकदा त्याची कारणं कदाचित हि असतील. त्यामुळे त्या आधीच्या किंवा १९७०-७५ ह्या दरम्यान वाढलेल्या व्यक्तींना जो प्रश्न नेहेमी विचारला जाई कि "आई वडिलांनी काही शिकवलं नाही का?" हे सध्या लागू नाही. कारण आई वडील तितकेसे नव्हतेच शिकवायला. ह्या मुलांना तितकसं शिकवावं लागलं नाहीच मुळी. त्यांना त्यांच्या बुद्धीचा आणि डोक्याचा, परिस्थितीचा वापर करणे जमले, त्यांची मते फार स्पष्ट तय्यार करता आली आणि त्यामुळे ते जास्त लवकर शहाणे झालेत. ह्या सर्व कारणांमुळे देखील कदाचित हि मुलं खूप कोणाच्या अध्यात मध्यात नसतात, किंवा कोणासाठी उगाच थांबत नाहीत, कुणाच्या परवानगीची वाट बघत नाहीत, मार्ग काढतात आणि पुढे जातात. अर्थात हि अशी मुलं जी मी बघितली आणि जाणली. बाकीच्यांचं मला ठाऊक नाही. मला आधी एक प्रचंड मोठा गैरसमज होता कि माझे समवयस्क जणांना असंख्य देश बघण्याची संधी मिळाली. ते ह्या सुवर्ण संधीचा फायदा घेऊन इतका सुंदर बदल घडवून आणतील स्वतः मधे
कि ते एक ढळढळीत उदाहरण म्हणून उभे ठाकतील सर्व स्तरावर. पण अगदी ०.१ % पण हवा असा बदल दृष्टिपथात नाही, ते अजून देखील तेच जुने बुरसटलेले विचार कुरवाळत बसले आहेत. जे कदाचित मूळ कारण आहे विसंवादाचं, हवी तशी प्रगती न होण्याचं, वैचारीक प्रगल्भता न मिळण्याचं आणि असे बरेच.
त्यामुळे सध्याचे किशोर वयीन मुलं सर्वार्थाने उत्तम आहेत. काही अंशी कमी जास्त असलेले तर सर्वत्रच आढळतात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा