मंगळवार, २७ फेब्रुवारी, २०२४

एक नियम


एखाद्याला सकाळी किंवा पहाटे जाग आली, त्याची झोप झाली निवांत ह्याचा अर्थ सगळ्याच प्राणिमात्रांची झाली असे होते का? तर स्पष्ट नाही. मग जर बाकीचे काही कारणास्तव अजून झोपले असतील तर त्यांना आवाज करून त्रास द्यायचा अधिकार कोणी दिला? कोणी रात्री जागं राहून अभ्यास करतं, काम करतं, बाळांना, आजी आजोबांना कदाचित अजून थोडसं निजावंस वाटत, कोणालाही. तेव्हा आजूबाजूचा अंदाज घ्या आणि शांततेत स्वतःची कामे करा हा अलिखित नियम आहे जो सर्वांनी पाळलाच पाहिजे, नेहेमी. मग ते कोणीही असो. एक छोटेसे उदाहरण देते, मी माझ्या मुलांना लहान असतांनाच हे सांगितले होते आणि ते अजून देखील हे कटाक्षाने पाळतात. रात्री अपरात्री जर गॅस वर काही करून घ्यायचे असेल, कॉफी किंवा मॅग्गी असे तर लायटर च्या ऐवजी काडेपेटी वापर म्हणजे दुसऱ्याला, खालच्या वरच्याला अजिबात त्रास होत नाही, त्याची झोप चालवत नाही, चिडचिड होत नाही आणि शिवाय तुमचे काम होते. 


अगदी तसेच काहीसे आताशा मी टिपते आहे. पहाटे किंवा अगदी सकाळी लवकर काही मिनिटे हि कावळ्यांची असतात, मग पोपट आणि त्या नंतरचा वेळ हा बाकी पक्षांचा. पोपट वावरत असतात आणि गुणगुणत देखील पण सकाळचा तो स्लॉट / ठराविक वेळ हि मात्र कावळ्यांचीच. उजाडलं पण नसतं नीटसं आणि ह्यांची तारसप्तकात काव काव सुरु होते. काय म्हणणं असतं त्यांचं कुणास ठाऊक. बरं त्यांना माणसांची  इतकी हालचाल नाही दिसतं त्यावेळी, बाकी पक्षी देखील अजून साखर झोपेत असतात आणि हे मात्र सुरु करतात दररोज न चुकता. करा कि राव आप आपली कामे शांतपणे. धीम्या आवाजात कोकला, एक मेकांना इशारे करा, माहिती द्या, कोण नाही म्हणतंय, पण एकसंघ असल्यासारखे सगळेच सुरु झाले कि नैसर्गिक गजर होतो. ते काही अंशी ठीक आहे म्हणावं, पण कधी कधी नको वाटतं. सगळेच पक्षी हुषार असतात, नैसर्गिक सेन्सर्स त्यांना बहाल झाले असतात, मग त्याचा सदुपयोग करावा ना. "वसुधैव कुटुंबकम" म्हणायचं आणि दररोज त्रास द्यायचा हे कुठले समीकरण. उठल्यावर अगदी आवश्यक तेवढाच आवाज करतं हवं ते खा, व्यायाम करा, उडा, शाळेत जा, मदत करा जेष्ठांना, पिल्लांना खाऊ घाला. असो. आता मला त्यांची रोजनिशी पाठ झाली आहे त्यामुळे मीच आळस झटकून त्यांच्या सोबत कामाला लागायला हवं लगबगीने दररोज. दोघे एकत्र लागू या कामाला उद्यापासून. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...