रविवार, ११ फेब्रुवारी, २०२४

तो बहरलेला मोहोर


मी एवढ्यातच एका रस्त्यावरून जात होते आणि माझ्या चार डोळ्यांनी काही अद्भुत टिपलं. म्हटलं काही तरी वेगळं बघितलं, खात्री पटली नाही पहिल्यांदा. त्यानंतर दोन दिवस सलग त्याच रस्त्याने जाणं-येणं झालं आणि ते दृश्य बघून अचंबित व्हायला झालं. अगदी भर चौकात एक आंब्याचं मोहोराने बहरलेलं ते झाडं. त्याच्या आसपास फक्त सातत्याने वाहणारा रस्ता, किंबहुना आऊटर रिंगरोड, जो कधी म्हणजे कधीच शांत किंवा मोकळा नसतो असा. मागे भली मोठी इमारत आणि शेजारी भिंत. आता ह्या सगळ्यात कोठेही मानवी वसाहत नव्हती. त्यामुळे कोण खत पाणी देणार त्या झाडाला, कोण मशागत करणार? तर कोणी म्हणजे कोणीच नाही. चार प्रेमाचे शब्द कानावर पडत नाहीत, कोणीच अंगावरून हात फिरवत नाही. खाली बुंध्याशी माती पण नाही नो, आळ वगैरे तर सोडाच. कसे तरी ते झाडं ठेवलं आहे इमारत बांधते वेळी हे नशीब. तरी पण अश्या ठिकाणी असलेल्या झाडाला मग इतका प्रचंड बहर कसा काय आला? बरं त्याची फळं देखील दगडं मारून अवेळी सतत रस्त्यावरची लोकंच तोडणार, जखमा होणार, त्रास होणार. हे माहिती असून देखील झपाटल्यासारखा तो बहरलेला बघितला आणि फार वेगळं वाटलं मला. मुळे जाऊन जाऊन किती खोल जाणार आणि किती पाणी किंवा आवश्यक घटक शोषून घेणार? फार दुर्मिळ आहे ह्या मानवी सिमेंट च्या जंगलात. तरी देखील फुलांनी आणि सुगंधाने मुसमुसलेला तो बघून परमानंद झाला, खूप शिकवून गेला आणि वेगळी ऊर्जा  देखील तो मोहोरलेला बहर.


आपण मानव स्वतःला भयंकर आणि प्रचंड जगावेगळे हुशार बुद्धिवान समजतो सतत. सगळ्या सुख सोयी पायाशी लोळत असून, सगळे "त्याने" देऊन देखील सातत्याने तक्रारीचा च स्वर, जेथे बघावं तेथे. काय नाही, दुसऱ्याला काय मिळतंय ह्याची यादी तय्यारच असते नेहेमी. आणि हा पठ्या बघा, काहीही म्हणजे काहीही योग्य, उपयुक्त आणि गरजेचा  पुरवठा नसतांना (नैसर्गिक किंवा मानवी) बहरला आहे. प्रत्येकाला छाया, सावली आणि आंबट-गोड फळं देतोय आणि ते देखील निरपेक्ष, शांतचित्ताने, न बोलता. काय बोलावं ह्या बद्दल, मी तर निःशब्द झाले किंबहुना त्या अवलियाने मला निःशब्द केले असं म्हणावं लागेल. जागे व्हा लोकांनो, पुढे चला, देवाण घेवाण असते नेहेमी, मुक्त हस्ताने द्याल तरच मिळेल. इंग्लिश मध्ये सुद्धा गिव्ह अँड टेक आहे, हे कधीही विस्मरणात जाऊ देऊ नकाच.    

२ टिप्पण्या:

  1. अग प्रिती, तुझ्या माझ्या सारखी कितीतरी आणखीन माणसे असतीलच की, येता जाता त्या झाडाचे मनापासून कौतुक करणारी, त्या मोहराकडे बघून आनंदित होणारी. तेवढच त्या झाडाला खूष ठेवतं आणि ते मोहरतं. आपण बघून कौतुक करणे थांबवायचे नाही.

    उत्तर द्याहटवा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...