शनिवार, १८ मे, २०२४

मुंजीची आवृत्ती


एक मजेशीर आवृत्ती बद्दल सहज आज डोक्यात आले आहे, म्हटलं टिपून ठेवावं. 

अनेक पिढयांपासून मुंज हि संकल्पना आणि एक पारंपरिक विधी संपन्न होत आला आहे. खूपच लहान वयात होणारे हे संस्कार त्या मुंज्याच्या, मुलाच्या शैक्षणिक प्रगतीसाठी, एकंदरीत वाढी साठी आणि एक उपयुक्त व्यक्तिमत्व उभे करण्यासाठी फारच अत्यावश्यक आहे. हे सगळं म्हणजे सातत्याने वैविध्य अंगाने शिकत राहणं, ते शिकलेलं आत्मसात करणं आणि वेळोवेळी उपयोगात आणणं. 


अजून एक फार महत्वाची म्हण आहे ती अशी कि "आयुष्यभर माणूस सातत्याने शिकतच राहतो". किंबहुना शिकत राहिलेच पाहिजे मग ते पारंपरिक पद्धतीने असो किंवा आधुनिक, कळत - नकळत, निरीक्षणातून आणि इतर अश्या अनेक मार्गांनी. फक्त त्या मुंजीच्या कोवळ्या वयातच, आई आणि कुटुंबापासून, किंवा कौतुक होण्यापासून, जे मागितले ते ताबडतोब मिळण्यापासून दूर तो मुलगा शिकतो असे नाही, शिकावं पण नाही, ते अविरत असे कार्य आहे, बघणे, शिकणे, उपयोगी आणणे, आणि असे हे चक्र चालूच राहिले पाहिजे. "थांबला तो संपला". 


ह्या अत्याधुनिक काळात फक्त मुलंच नाही तर हिरीरीने मुली देखील फार लवकर घराबाहेर पडायला लागल्या आहेत. जिथे योग्य संधी असेल तेथे नोकरी करण्याकरता जाणे पण आवश्यक असते अनेक वेळा. प्रत्येकवेळी कुटुंब बरोबर राहिलाच हे निश्चित नाहीच. त्यामुळे एकटं राहणं आलंच. पर्यायाने मग हवं ते घरचं खायला मिळणं, कौतुक ई. पासून दूर होतोच व्यक्ती. 


अनेक वर्षांचा संसार झाल्यावर एखादी सुवर्णसंधी चालून आली ज्यात सन्मानाने त्या व्यक्तीला आमंत्रित केले जाते सल्लागार म्हणून तर देखील दूर जाणे होऊ शकते.  "कंफर्ट झोन" च्या बाहेर राहणे म्हणजे मुंजी नंतरची संकल्पना आहे, माझ्या दृष्टीने, मग ती कुठल्याही वयात का होईना. लहानपणीच आपण सर्व शिकत नसतोच. वयोमानाप्रमाणे, उठ-बस होते त्या नुसार, प्रसंगानुरूप शिक्षण होत राहते. 


शिक्षण, नोकरी, सल्लागार ह्या वर हि गोष्ट थांबत नाहीच मंडळी. आताशा स्वतः किंवा ठेवले तर जेष्ठ नागरिक संपूर्ण सोईंनीयुक्त अश्या ठिकाणी जाऊन राहणे पसंत करतात.  ते देखील बाकींसारखे आवाहनात्मकच आहे. प्रत्येक पाऊल तसे पहिले गेले तर आव्हानपूर्वक आहेच. आणि त्यातच खरे शिक्षण आहे. कारण मुंज हि संकल्पनाच मुळी सर्वार्थाने शिक्षण, घडण ह्या वर बेतली आहे. त्यामुळे चला तर मग अनेक वेळा मुंजी नंतरचे वास्तव्य अत्यानंदाने अनुभवूयात आणि सर्वांनीच हो, मुलामुलींनीही. 

२ टिप्पण्या:

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...