शुक्रवार, १४ जून, २०२४

कलियुग


माझा जनसंपर्क खूप मोठा आहे अगदी आधीपासूनच. कसा? ते ठाऊक नाही. आई वडिलांनी, असंख्य गुरुजनांनी, अनुभवांनी शिकवलेले कित्ती खोटे आहे ह्याचा का कुणास ठाऊक पण पदोपदी प्रत्यय येतोय. काही पोथी मधे पण नमूद केलेले वाचनात आले कि अभक्तांना साहाय्य का करतो "तो" नेहेमी? भक्तांची काळजी घेतो, पदोपदी साथ देतो, पण कधी कधी असा वागतो कि उकल होत नाही. 


कलियुग कित्ती वर्ष चालणार आहे कारण जवळपास ६० वर्ष आधी किंवा गेले ६० वर्ष सलग जे चुकांवर चुका करत आहेत, घोड चुकां पेक्षा हि कित्तीतरी पटीने मोठे अपराध करत आहेत सातत्याने ते अत्यंत सुखी आहेत, पैसा अडका आहे, तब्बेत ठणठणीत आहे, म्हणजे इतकी कि साधी सर्दी पडसं पण शिवत नाही त्यांना. घर दार आहे, सगळं जग हिंडून आले आहेत, कुठेही वाकणं / झुकणं ठाऊक नाहीच. कशाचीही कमतरता नाहीच. कधीच काहीच बोचत नाही कि चुकलं आहे. त्यांच्या मुळे दोन माणसांचा जीव गेला किंवा घेतला म्हणायला हरकत नाही. त्यांची पोरं बाळं, अख्ख कुटुंब उघड्यावर पडलं पण ह्यांच्यात यत्किंचित बदल नाहीच.  

ह्याच्या विरुद्ध एक व्यक्ती म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वर. संपूर्ण आयुष्य दुसऱ्यांसाठी घालवलेला, पेशाने डॉक्टर आणि एक नया पैसा न घेता औषादोपचार करणारा. देवाचा परम भक्त. त्याच्या पायी सतत नतमस्तक. अविरत साधना,न चुकता केलेली आयुष्यभर, कमीतकमी ५५ वर्ष वगैरे. मितभाषी, मौन व्रत धारण करून, फक्त घराचे साधे अन्न सेवन करून राहणारा. सर्वांशी मैत्री, सतत मदतीचा हात पुढे. इतके यश लाभून सुद्धा कुठे म्हणजे कुठंही गवगवा नाहीच. आणि आता अचानक कर्करोग झाला आहे. हा कसला त्याचा न्याय? इतकी वर्षे विविध गुरूजांनी सांगितलेले सगळे सपशेल खोटे ठरले आहे. एक असे उदाहरण पुरेसे आहे.  काय हा कलियुगाचा महिमा? आणि ह्या अश्या देवासम व्यक्तीलाच का हा त्रास? आणि दुसरा व्यक्ती का सुटला? म्हणजे मला असं अजिबात म्हणायचं नाही कि  शिक्षा व्हायला हवी.  पण काडीमात्र फरक नाही. असं ऐकलं होतं कि एकतर चाळीशी पार केली कि, किंवा निवृत्त झालो कि कृतज्ञता अंगी येते, नतमस्तक होतो माणूस, पण येथे तसे तिळमात्र नाहीच. सतत ताठ मान. 

मागल्या जन्मीचे प्रारब्ध / भोग ई. जरी म्हटलं तरी ५५ वर्षांची पूजा, अर्चा, तपश्चर्या आणि इतर सगळे पुण्य पुरेसे नाही का ते सरून जायला? 

पहिले वर्णन केलेले महानुभाव ह्यांच्या तोंडी सतत शिव्या, सारखं दुसऱ्यांबद्दल उणे दुणे काढणे, तक्रारी, नावं ठेवणे, स्वतः किती महान फक्त हेच मिरवणे, अन्नदान नाही, श्रम नाहीत, सर्व सुखसोईंनी युक्त प्रत्येक क्षण. 

काकांचे फक्त सुमधुर बोलणे, आचरण, बोलणं, कृती, वागणं काहीही म्हणावं सगळ्यात मेळ, शिवी माहिती देखील नाही, अहो अगदी मोजून तर शब्द वापरतात. विविध भागातून अनेक वर्ष दिग्गज सल्ले घ्यायला येतात, भेटीला येतात कारण कीर्ती आहेच मोठी. 

मला त्याचा हा असला हिशोब अगदीच पटला नाही. दोघे व्यक्ती अगदीच माझ्या जवळचे त्यामुळे खूप व्यवस्थित ओळखते मी त्यांना. म्हणून अस्वस्थ व्हायला झाले हि बातमी समजली तेव्हा. कर्करोग मुक्त ते पट्टाकिनी होऊ देत हि ईश चरणी प्रार्थना, अगदी मनापासून. 

२ टिप्पण्या:

  1. आपली श्रद्धा कायम ठेवली, कायम चांगलीच वागणूक ठेवली. तरी असा एखादा भोग येतोच पण त्या साठी त्या देवाला दोष न देता. प्रारब्धाला स्विकारणे एवढेच हातात असते. आणि जे वाईट वृत्ती चे लोक आहेत, ते पण काही ना काही भोगतच असतात.

    उत्तर द्याहटवा
  2. धन्यवाद काकू. मनापासून आवडले तुमचे साधे सोप्पे उत्तर. मला पटतंय. पण वाईट प्रवृत्तीचे लोकं आणि भोग हे समीकरण नाहीच माझ्या दृष्टीने, किंवा ह्या दोन दिलेल्या उदाहरणात तर अजिबात नाहीच, काहीच भोगत नाहीत. किंवा भोगणे काय हे माहित नाहीत. ते दुसऱ्याला भोगायला लावतात.

    उत्तर द्याहटवा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...