मी लहान होते तेव्हा, म्हणजे घरीच असायचे तेव्हा सोन्याचं पाणी अंगावरून जायचं, कारण कानात डूल, हातात पिटुकल्या बांगड्या (म्हणजे तत्सम), गळ्यात चेन, पायात छुमछुम असा लवाजमा होताच. मग काय थोडीशी मोठी झाले, शाळेसाठी घराबाहेर पडावं लागलं सगळं सुंदर सुख सोडून, पण पर्याय नव्हता त्यामुळे मग कानातले तेवढे राहिले बाकी नाही. सुरक्षिततेच्या दृष्टीने, सांभाळता नसतं आलं मला म्हणून कानातले फक्त घालून शाळेत वावरायचे मी. अजून मोठ्या वर्गात जाणं झालं तरी माझा सखा फक्त कानातलेच. मग काय पंखच फुटले आणि कानातल्यांची पण साथ गेली, कारण अंगात आल्यासारखे विविध प्रकार परिधान करण्यात आले, महाविद्यालयात आले होते ना मी. त्यामुळे कपड्यांच्या रंगसंगतीनुसार खोटं सगळं घातलं गेलं आणि हातात आईचं जुनं घड्याळ परीक्षेच्या वेळी, दररोज नाहीच.
नोकरी करण्याचा टप्पा आला तसे माझे घड्याळ एका हातात रोज आणि वैविध्य रंगी खोट्यांची खेळी सुरूच राहिली.
मी सगळे टप्पे पार करत होते, पण आईचे एक वाक्य जवळ बाळगूनच, न चुकता दररोज ती अनेकदा म्हणायचीच, न कंटाळता, हातात दोन तरी बांगड्या घालाव्यात, छोट्या, हव्या तश्या, गळ्यात एक बारीक चेन असावीच, काय हरकत आहे. तिच्या सातत्याची दाद द्यायला हवी. पण ते कधीच शक्य झाले नाही, सणसमारंभात, किंवा काही कार्य असतील तरच मी अगदी थोड्या वेळा करता सगळं सोन्याचं घालून आनंद घ्यायची.
लग्न झाल्यावर अगदी मोजून काही दिवस सोन्याचं घालणं झालं पण त्यानंतर पुनश्य हरीओम. खरं सगळं असून सुद्धा खोट्यांची वरचढ जास्त होती, कारण फक्त विविधता आणि अर्थात त्या सोबत येणारी सुरक्षितता. एकच एक तीच बांगडी कोण घालतंय? आणि रोज किंवा अधेमधे बदलायला इतक्या पद्धतीच्या खऱ्या बांगड्या किंवा इतर दागिने कोण करतंय, प्रॅक्टिकली शक्य नाही ते, इतकी गुंतवणूक? छे छे. दररोज विविध ड्रेस, साडी नेसायची तर मग त्याला शोभेसे, कचेरीत जातांना भावतील तसे दागिने, घड्याळं घालून मिरवायचं. अर्थात एका हातात विविध प्रकारचे घड्याळ आणि दुसऱ्या हातात पट्टाकिनी चढवलेली एक बांगडी, टिकली लावली कि निघाली सवारी, असा तो घाईचा दररोजचा कार्यक्रम.
पण आताशा माझ्यातला बदल म्हणजे बांगडीची जागा तरुण ब्रेसलेट ने कधी घेतली हे समजलंच नाही. इतके सहज झाले ते बदल कि ज्याचं नाव ते. अहाहा च. ब्रेसलेट म्हणजे तरी काय बांगडीचाच भाऊ, पण तरुण पण जपलेला. उगाचच तरुण झाल्यासारखं वाटतं ते घातल्यावर. मग बांगडी म्हणजे म्हातारी का? आपण ठरवू ते समीकरण, नाही का? पण असो, मी आता ह्या आव आणलेल्या तरुण पद्धतीची पण सवय केली आहे आणि ते मला भावतं आहे. त्या वेळी असे कडे प्रकार होते का नव्हते ते ठाऊक नाही कारण इतक्या बारकाईने कधी बघितलेच नाही, किंवा आजूबाजूला पण कधी कोणी सतत घातलेले पण बघण्यात आले नाही. नाही तर नक्कीच कुतूहल जागे झाले असते आणि आधीच असे विविध कडे, रंग ढंगात माझ्या कपाटात, हातात स्थानापन्न झाले असते. बांगडीची मज्जा वेगळी आणि ब्रेसलेटचे सौंदर्य अनोखेच. "बदल हाच सतत एकसारखा कॉन्स्टन्ट असतो" हे अगदी खरं आहे. बांगडीचे नवीन रूप, स्वरूप भावले मला. आणि आता काय सर्वत्र तेच नजरेस पडते, फॅशन किंवा हवा म्हणा तर.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा