माझे सर्व स्तरावरचे शिक्षक नेहेमी सांगायचे कि अन्नदान म्हणजे श्रेष्ठ दान. आणि त्या मागची महत्वाची भुमिका, का ते श्रेष्ठ आहे ह्या बद्दल पण बरेचदा ऐकलं, वाचलं आणि समजलं देखील. अनेक पद्धतीचे दानधर्म लोक करत असतात, अनेक जण डाव्या हाताचे उजव्या हाताला न समजता करतात. श्रेष्ठ असे दान हे प्रत्येकाच्या प्रमाणे असायला हवे माझ्या दृष्टिने, ज्याचे त्याला ठरवू द्यावे. यथाशक्ती करणे योग्य.
एक आधुनिक प्रकार आहे ह्या मधला असे मला वाटते म्हणून हा शब्द प्रपंच.
यूट्यूब वर असंख्य व्हिडीओ उपलब्ध आहेत, हवे त्या विषयांवर, आवडेल त्या भाषेत, हवे तेवढी माहिती देणारे, खिळवून ठेवणारे आणि ते एक नवीन विश्वच निर्माण झाले आहे. एक भला मोठा प्लॅटफॉर्म / रंगमंच उपलब्ध झाला आहे सर्वांकरता. आणि जेव्हा पासून हे असे मैदान मिळाले आहे, खूप नवनवीन कलाकार, दडून बसलेले रथी महारथी समोर आले आहेत, उदयास आले आहेत आणि त्यांना खूप काही लाभ झाला आहे. त्यांचा उत्साह शिगेला पोचला आहे, खूप मानसिक समाधान मिळाले आहे, धैर्य पण मिळाले आहे कि मी जे सांगतो आहे, करून दाखवतो आहे ते खूप जणांना आवडते आहे, भावले आहे, लाभ झाला आहे, फायदा झाला आहे, सोप्प्या पद्धतीने समजले आहे, बाऊ निघून गेला आहे. यूट्यूब वर व्हिडिओ करून टाकणे हे एक आव्हान आहे, कष्ट पडतात आणि धमक देखील हवी. ते कोण्या एकट्याचे काम नाहीच, किंवा सोप्पे नाही, काय बोलायचं, सांगायचं, ह्या पेक्षा काय नाही हे जास्त महत्वाचे. खूप अद्भुत रीत्या मांडणी झाली पाहिजे. खूप मोठा, लांबलचक आणि समजायला अवघड असं काही नको,आवाज सुस्पष्ट यायला हवा, उजेड उत्कृष्ट हवा, केश आणि वेशभूषा पण साजेशी हवी ई. असं तय्यार झालेला व्हिडिओ फक्त अपलोड करून संपत नाही तर तेथून एक वेगळे काम सुरु होते. तो व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवणे हे फार महत्वाचे आहे. ते करण्यासाठी पण मग वेगळं डोकं लावत राहावं लागतं, मेहेनत करत राहावी लागते आणि वेळ द्यावा लागतो. अर्थात एकदा का लोकांना तुमचे सादरीकरण आवडले, भावले तर मग यूट्यूब हे एक कमाईचे साधन होते.
तर आपल्याला माहित नसलेल्या, अनोळखी व्यक्ती, त्या मग कुठल्याही ठिकाणी स्थायिक असलेल्या, अश्यांचे व्हिडिओ आपण बघतो, कारण शोधल्यावर ते समोर उभे ठाकतात. कधी पूर्ण बघतो, कधी हवा तेवढा, कधी वारंवार, कधी तो पुढे अनेकांना पाठवतो आवडला तर ई. पण त्यामुळे आपण त्यांचे कमाईचे साधन होतो, किंबहुना कळत न कळत त्याला हातभार लावतोच, अप्रत्यक्षरीत्या. हे पण एका आधुनिक पद्धतीचे दानच म्हणावे लागेल. पाहणारे पण शोधण्यात वेळ घालवतात, हवा तसा विडिओ सापडला कि मग बघणे, मागे पुढे करणे, समजून घेणे, कधी स्वतःलाच फॉरवर्ड करून ठेवणे, सेव्ह करणे ई. मेहेनत घेतोच. हळूहळू मग प्रेक्षक संख्या वाढली कि यूट्यूब त्या व्हिडिओ घडवण्याराला नियमानुसार पैसे देते.
आपल्या हातून घडलेले हे दानचं समजावे. फक्त दान हा अँगल लाभला म्हणून यूट्यूब वर उगाचच पडीक राहणे टाळावे. कामापुरते वापरावे, जमल्यास आपण पण काही व्हिडिओ सिरीज तय्यार करता आली तर करावी, आणि माहिती पुरवावी योग्य पद्धतीने, वेगळ्या ढंगात, जे उपलब्ध नाही ते देण्याचा प्रयत्न करावा, पण ओढूनताणून नाहीच.
मलाच भावली हि दानाची नवीन परिभाषा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा