आमच्या घरी टीव्ही चे शौकीन कोणीच फारसे नाही त्यामुळे आम्ही हवं ते यूट्यूब वर किंवा बाकी OTT प्लॅटफॉर्म्स वर बघतो, थोडक्यात गोडी. यूट्यूब देखील आम्हाला आणि आमच्या सवयीला चांगलेच जाणून आहे, त्यामुळे काहीही छान, नवीन आणि आम्हाला आवडेल असं आलं कि तो आमच्या पुढ्यात मांडतोच. आज देखील त्याने प्रकर्षाने तसं केलं. एक सुंदर व्हिडिओ सादर केला माझ्या समोर आणि मला तो खूप आवडला. त्यात एक आई आणि लेक एकसारखे ड्रेस घालून नृत्य सादर करत होते. अगदी मस्त नवीन गाण्यावर ठेका, ताल धरून मज्जा करत होत्या दोघी. मी माझ्या लेकीला ह्या बद्दल सांगितले तर म्हणते कशी कि ह्या दोघींचे असंख्य विडिओ आहेत, विविध प्लॅटफॉर्म्स वर. मला खरंच आश्चर्य वाटले. मग काय दुसरा पण त्यांचा विडिओ बघितला. ह्या गाण्यावर असेल का म्हणून शोधला आणि आमची वाढलेली, वृद्धिंगत झालेली त्यांच्या बद्दल ची आवड, उत्सुकता ह्या यूट्यूब नावाच्या हुषार पठ्याने हेरली कि ताबडतोब. आणि मग काय लांबच्या लांब यादी पेश केली आमच्या समोर. कित्ती म्हणजे कित्ती ते व्हिडिओ, अगणित.
मला सहज एक प्रश्न पडल्याशिवाय राहिला नाहीच. ती मुलगी साधारणतः ८-९ वर्षांची असावी. काही व्हिडिओत ६-७ वर्षांची पण आढळली. व्हिडिओ करणं म्हणजे आधी विचार, आचार, मांडणी, तसे ड्रेस, उजळणी, एका टप्प्यात व्यवस्थित रेकॉर्ड झालं तर ठीक नाहीतर पुन्हा ई. हे सगळं करत असतांना तिच्या शाळेचं काय, अभ्यास आणि खेळ ई. तिला कसा वेळ मिळत असेल, किंवा वेळेचे आयोजन त्यांनी कसे केले असेल? जितका नाच महत्वाचा कारण तो खूप सुंदर सादर होतोय, आईच आहे सोबत म्हटल्यावर बघायलाच नको, पण तरी देखील बाकी महत्वाच्या गोष्टींना वेळ द्यावा लागतो, तो कसा?
खूप प्रेक्षक म्हणे त्यांचे व्हिडिओ बघतात, एकदा, अनेकदा, मग ती जी लहान वयात मिळालेली प्रसिद्धी आहे ती पण सांभाळणे / हाताळणे अतिशय महत्वाचे. त्या साठी लागणार वेळ?
मल्टिटास्किंग ची कमाल वाटल्या त्या दोघी मला. भन्नाट व्यक्तिमत्व. साध्या पण भासल्या. असो. त्यांच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा. समतोल सांभाळत पुढे जाणार हे निश्चित, आज पर्यंतच्या वाटचाली कडे बघून. खूप शिकण्यासारखं आहे ह्या जोडगोळी कडून निश्चितपणे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा