रविवार, ४ ऑगस्ट, २०२४

१९६९: फुलझाडं


अगदी शालेय दिवसांपासून किंवा त्या आधी सुद्धा एकच समीकरण ठाऊक होतं ते म्हणजे झाडाला फुलं येतात. म्हणजे एक रोपटं असतं, ते जमिनीत आपली मुळे पसरवतं, ते मजबूत होता होता त्याची उंची देखील वाढते आणि रुंदी पण. म्हणजे त्या झाडाचा जसा स्वभाव असेल, ते ज्या गटातील आहे त्या नुसार. पण हे निश्चित कि मुळं, झाड, फांद्या, पानं आणि मग कळ्यांची फुलं हाच क्रम आहे, असतो, असायला हवा. पण अहो काय सांगू एवढयात एक चमत्कार झाला. माझ्या खास मैत्रिणीने मला एक खूप सुंदर आणि विचारपूर्वक फुलांचं झाड बक्षीस दिलं. ते मी घरी आणलं, आणि मोठ्या कुंडीत लावलं. त्याला अधे मधे फुलं येत होती, डोकावत होती. पण गेले काही दिवस चमत्कार झाल्यासारखं समजतंच नाही आहे कि झाडांना फुलं येतात कि फक्त फुलांचे झाड असते आणि कुठेतरी अगदी शोधल्या तर एखाद दोन फांद्या आणि पानं नजरेस पडतात. हे म्हणजे ३६० अंश वेगळं चित्र उभं ठाकलं आहे. इतका बहर मी कधीच अनुभवाला नव्हता ह्या आधी.  इतकी उत्साहानी फुलं आली आहेत कि ते त्यांचा कुठला आनंद व्यक्त करत आहे हे समजण्या पल्याड आहे. कदाचित आज मैत्री दिन आहे त्यामुळे त्याची त्याने आधीपासूनच तय्यारी केली असणार. म्हणजे इतक्या प्रेमाने दिलेलं आहे कि मैत्रिणीची आठवण झालीच पाहिजे आणि ती प्रकर्षाने, वेगळ्या पद्धतीने, अनोख्या ढंगाने, म्हणून त्याची हि धडपड जी खूप काही दर्शवून गेली. आणि सर्वात महत्वाचे आणि दुर्मिळ म्हणजे त्या पिटुकल्या असंख्य गुलाबांना सुगंध आहे. अहाहा च. क्या बात है? असं दुसऱ्यासाठी शोधून आणणं म्हणजे खूप खास अशी बाब आहेच. 


आताशा गेले काही दिवस खूपच शहाण्यासारखा पाऊस पडतोय. म्हणजे संततधार आहे, पण बारीक, भुरभुर असाच आहे, उगाच विजांचा कडकडाट वगैरे नाही.  अगदी पुण्याचा ठराविक पद्धतीचा पाऊस. त्यामुळे सुर्यबाप्पाचं दर्शन दुर्मिळ झालं आहे, सर्वत्र फक्त अंधारलेलं असं वातावरण आहे. अर्थात हे खूप महत्वाचं आहे, पाणी साठा वाढण्यासाठी किंवा जमिनीत पाणी मुरण्यासाठी, शेती साठी ई. पण माणसाला थोडसं वेगळं वाटणं स्वाभाविक आहे. अश्या वेळी हे बहरलेले, फुलांनी झाकलेलं, वाकलेलं सुगंधी झाड खूप प्रोत्साहन देऊन जातंय, खूप काही शिकवून जातंय, मस्त रंग छटा पसरवून जातंय आणि खूप सुंदर दृश्य सातत्याने दाखवतंय. ते झाड फक्त फुलांनी नाही तर आश्चर्यकारक पद्धतीने तितक्याच किंबहुना जरा जास्तच प्रमाणात कळ्यांनी देखील बहरलं आहे. म्हणजे ह्या पुढे अनेक दिवस, आठवडे हा नजराणा टिकणार आहे हि खात्री आहेच. "काय वर्णू तव गूण अल्पमती नारायण". त्या झाडाला, फुलांना, कळ्यांना, त्यांच्या कष्टाला, माझ्या मैत्रिणीला श्रद्धाला मनःपूर्वक धन्यवाद.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...