मंगळवार, १० सप्टेंबर, २०२४

२०१९: भागिले १२,१६,१७,१८...


काल परवाची गोष्ट. ऐकिव आणि प्रत्यक्ष ह्यातला फरक आणि फिकर मला जाणवली. तर त्याचं असं झालं कि माझ्या ऐच्छिक निवृत्ती नंतर मला "व्यावसायिक कर" भरावा लागणार आहे, माझा माझा, वेगळा. आधी हे पगारातूनच केलं जायचं, म्हणजे कचेरीतले लोक इतकी वर्षे हे सगळे निमूटपणे सांभाळत होते, मला अगदी खरं सांगते त्याची भनक पण नव्हती. हो माहिती होतं कि असा एक कर भरावा लागतो, भरला जातो, मी भरते ई. पण. हा पण इतका मोठा असेल हे समजले नाहीच कधी.  मी सध्या अगदी छोटी-मोठी सेशन घेते इकडे-तिकडे, जसे बोलावतील तसे. जास्त पळापळ नको होते, त्यामुळे ठरावीक तास द्यावे हाच तर खरा उद्देष होता निवृत्तीमागचा. 


एका विद्यापीठाच्या कर-सल्लागाराचा मला फोन आला ह्या "व्यावसायिक करा" संदर्भात. आणि त्याच वेळी त्याने एक साधा-सोप्पा प्रश्न केला मला, "मॅडम तुमचे वार्षिक उत्पन्न किती आहे सध्या?". अर्थातच माझ्याकडे त्याचे उत्तर तय्यार होते कारण मी बघितले होते कि मी ह्या एका वर्षात, नोकरदार ते व्यावसायिक हा बदल टिपतांना किती उत्पन्न मिळवले? तो आकडा सांगतांना अभिमान वाटला कारण तेवढे मला पुरेसे आहेत ह्या क्षणी, माझा महिन्याचा खर्च भागवण्याकरता. कारण देवाच्या आणि ह्यांच्या कृपेने डोक्यावर छत आहे, सर्व सोयी सुविधा आहेत, चारचाकी आहे, मग फक्त महिना उत्कृष्ट रीत्या सरण्यासाठी लागणारी पुंजी आहे. कुठलीही तुलना नाहीच, मीच हे सगळं मागून घेतलं होतं आणि ते मला मिळालं. मी पूर्णवेळ नोकरी करतांना जेवढा महिन्याचा पगार होता  त्याला आता भागिले १२,१४,१७,१८... असा तो आकडा आहे, त्यामुळे ती मीच का? हा एक छोटासा प्रश्न / विचार मात्र मनाला शिवून गेला. अर्थात घर-दार पेक्षाही महत्वाची अशी जबाबदारी पण नाही, त्या मुळे देखील गाडी सुरळीत सुरु आहे, आणि ती अशीच सुरु राहणार ह्याची खात्री आहेच, कारण "त्यांचा" आशीर्वाद आहे. पण तो आकडा सांगतांना जरा कडा ओल्या झाल्या आपसूकच. पण चढता क्रम हा टिकून राहिला आहे हे जास्त मनाला भावणारी बाब आहे.  आधी मी लहान वयाच्या मुलांकडूनच फक्त रोजच्या रोज शिकत होते. आता विविध वयाच्या, अनुभवाच्या आणि वेगळ्या विद्यालयांच्या मंडळींकडून आत्मसात करते आहे, बऱ्याचश्या गोष्टी. मला त्यांना काही क्लुप्ती कथन करता येत आहेत, अनुभवातून शिकलेल्या अश्या. त्यामुळे पैसे किंबहुना पॉकेट मनी तर मिळतो आहेच शिवाय पुणे दर्शन देखील घडतंय. अजून काय हवं? हे खूप आहे, समाधान आहे आणि एकाच कमाईवर दोनदा कर भरायचा का? ह्या प्रश्नाचे उत्तर देखील आता शोधणे सुरु आहे.  एक म्हणजे मिळकत कर आणि दुसरा आता हा व्यावसायिक? एकच माणूस, मिळणारी एकच रक्कम पण कर मात्र दोन. असेल काही त्यावर तरणोपाय, शोधावा लागेल निश्चितच. 


आनंद, समाधान, पायांना आराम, कुठलेही वेळापत्रक नाही, सर्वांशी भेट, कार्यक्रमांना हजेरी निवांतपणे दिलेली असे आणि अनेक विविध गुणाकार पण आहेत हो.  थांबले नाही मी, पण गती कमी केली आहे, प्रचंड प्रमाणात. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...