एखादी गोष्ट चांगल्या अवस्थेत ठेवणारे एक द्रव्य, अनुकूलक. माझ्या लहानपणीपासून ते स्नातक पदवी मिळेपर्यन्त शिकेकाई हाच एक प्रकार होता, शाम्पू उदयास आला नव्हता, मग तर कंडिशनर ह्याची गोष्ट सोडाच. पण हो आमच्या केसांना, लांबसडक, कात्री न पहिल्या अश्या सहज सुंदर केसांचे कंडिशनींग नक्की होत असे. कसे? सांगते. मस्त कडत्त पाण्याने (म्हणजे अर्थात सोसेल आमच्या तापमानाचे हो) जेव्हा केस धुतले जातात तेव्हा शांतपणे ते जाडसर टॉवेल ने बांधून ठेवण्याची पद्धत असायची. अगदी अनिवार्य, अपरिहार्य असे होते ते. त्याची कारणे देखील आहेत. एक म्हणजे तेव्हा फक्त आठवड्याच्या आठवड्याला पुरेसे व्हायचे केस धुणे. आणि तो बहुतांशी रविवार असायचा, म्हणजे केस धुवून बाहेर पडल्या पडल्या गाडीवर हवेत, वाऱ्यात जायला नको, सुट्टीचा हक्काचा दिवस असल्यामुळे. त्यामुळे बांधलेले केस सोडायची घाई नसायची. मला अजूनही आठवतंय कि आई कधी कधी सगळं काम झाल्यावरच केस मोकळे करायची, कारण तेव्हाच तीचा हात रिकामा व्हायचा आणि अर्थात केस चुकून इकडे तिकडे पडू नयेत हे एक कारण शिवाय असावं. तेव्हा तसेही केस नेहेमीच बांधून ठेवायची प्रथा होती. म्हणजे बघा ना ती वाफ, केस धुतल्या नंतरची कित्ती वेळ मुरायची, ते केस त्या मस्त वातावरणात कसे पहुडायचे अगदी अनुकूलक परीणाम साधेल तसे किंबहुना कणभर जास्तच मस्त, अर्थात माझ्यामते.
आपण अनेकवेळा ऐकले आहे, किंवा आपल्या कानावर पडले आहे कि मितभाषी असावे, त्याचे पण खूप फायदे आहेत, अर्थात नेहेमी करता नाही पण अगदीच गरजेचे असेल तर बोलावे. दोन उदाहरणे घेऊ या, म्हणजे मग मुद्दा नीट समजेल. एक म्हणजे खाता पितांना चूप, त्या खाण्यावर लक्ष केंद्रित करा, मग गप्पा मारा. आपल्या भारतात बहुतांशी गरम पदार्थांना जास्त महत्व आहे, पहिल्या वाफेचे हे फार जगावेगळे चविष्ट लागतेच ह्यात दुमत नाहीच. आधी चहा चे उदाहरण घेऊयात. चहा घेते वेळी, घेतल्यानंतर एक प्रयोग हमखास करून बघा. तेव्हा गप्पा नकोच. काही जणांना चहा प्यायला रे प्यायला कि घोटभर का होईना पाणी प्यायची सवय असते. ते पण टाळा, एक प्रयोग म्हणून. आणि मग बघा कसा अनुकूलक परिणाम साधता येतो ते. तो परिणाम फक्त घश्यापुरता मर्यादित न राहता तो संपूर्ण पचन संस्थेपर्यंत लागू पडतो. सगळ्या अंतर्गत भागांना धन्य वाटतेच. एकदा मस्त वाफाळता चहा सेवन केला कि एकटे असतांना डोळे बंद करा, कानांवर हात ठेवा एखाद दोन मिनिटं आणि परिणाम बघाच, अनुभव घ्या. अगदी नाक-कान-घसा ते पोटापर्यंत मस्त वाटतं. हेच जेवतांना सुद्धा होते गरमागरम आमटी ओरपली कि, रस्सा भाजी वर ताव मारला कि ई. बघा तर एकदा अनुभव घेऊन.
नवीन जन्मलेल्या बाळांना देखील बघा ना मस्त मालिश आणि त्या नंतर आंघोळ झाली कि घट्ट गुंडाळून झोपवतात. थंडी चा मौसम असेल तर धुरी देतात, ई. हे सगळं पण अनुकूलक प्रभावी ठरण्यासाठीच. एवढंच कशाला, मोठ्यांची मालिश झाल्यावर, कडक पाण्याने आंघोळ केल्यावर देखील मस्त पांघरुणात घुसून झोपण्याचा उपदेश दिला जातोच.
आता नवनवीन औषध उपलब्ध आहेत तरी देखील अगदी लहान बाळांना जर सर्दी झालीच तर न्हाणी घरात सगळीकडे खूपच गरम पाणी, त्यात विक्स घालून अनुकूलक असा उपयोग होतो, चोंदलेले नाक मोकळे होते आणि आई हातात घेऊन उभी राहिलेली असते तिला पण एक संरक्षक असा प्रभावी उपचार सहज घडतो.
जिभेला जमेल तेवढं गरम दूध हळद घेऊन (अर्थात औषध म्हणून, अर्धा छोटा कप) लगेच डोक्यावरून पांघरुण घेऊन झोपल्यावर अनुकूलक परिणाम साधला जातोच, सर्दी पडसं झालं कि.
असे अनेक मस्त मस्त रोजच्या रोज बघायला, अनुभवायला मिळणारे किस्से सांगता / मांडता येतील जे अनुकूलक आहेत, कंडिशनर आहेत. त्यामुळे तो कृत्रिम असा थंडावा सोडा, गारेगार सतत सेवन नकोच, आपले पदार्थ आपल्याला जास्त योग्य आहेत हे लक्षात घ्या आणि अनुकूलक हा फक्त केसांना उपयोगी नसतो हे देखील ध्यानात ठेवा.
अनेकांचा दिवस गरम पाणी+मध आणि बऱ्याचदा लिंबू असा होतो. मी एका पणजीशी बोलले, संवाद साधला, कुठल्याही बाजूने त्या पणजी वाटल्या नाहीत. त्याचं खास रहस्य म्हणजे त्या कधीच गरम पाण्याशिवाय कुठलेही पेय घेत नाहीत. थंड तर सोडाच, पण साधे पाणी / माठातले ई. पण नाहीच, कटाक्षाने त्यांनी ते पाळले घरच्या जेवणासहित. त्याच पद्धतीने अनेक जणांचा दिवस गरम पाण्याने, हळद-दूध घेऊन संपतो. त्यामुळे कंडिशनींग कसे करायचे मुळतः हे ठरवा जे संपूर्ण स्वास्थ्य बहाल करेल प्रत्येकाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा