मी अगदी लहानपणापासून "चोर" नावाचा शब्द अनेकदा घरी, स्वयंपाकघरात ऐकला, किंबहुना कानावर पडला. मला खूप जास्त उत्सुकता त्यामुळे मग मी त्याचा अर्थ शोधून काढलाच. मटकीशी मर्यादित अशी ती गोष्ट होती, जास्तीत जास्त मुगाला लागू पडत होती. मटकीची उसळ करायची म्हणजे चोराचा जप सुरु व्हायचाच. कारण आईला ते दोन-चार दा रोळून घ्यावे लागत असे, निवडावे लागत असे अगदी व्यवस्थित पद्धतीने, मागे पुढे करून. तरी देखील एखादा चोर सापडायचाच, दाताखाली यायचाच. अर्थात हे अगदी क्वचित होत असे, पण खात्री नसायची. तर चोर म्हणजे न भिजलेले, फुगलेले असे दाणे मटकीचे. त्या वेळी सगळं घरीच करावे लागत असे, त्यामुळे भिजवणे, बांधून ठेवणे, मोड आले कि मग उसळ, किंवा वडे होत असतं. आणि अनेक पदार्थ जसे कि भेळ, मिसळ ई.
आताशा तर सगळेच आयते मिळते मोड आलेली कडधान्य त्याला उपवाद नाहीत. एक टप्पा कमी झाला असला तरी देखील ते कडधान्य नीट निवडावे लागतातच, ह्या चोरांच्या पायी. मुगात माझ्या अनुभवाप्रमाणे जास्त आढळतात लपलेले चोर आणि हे दोन्ही दाणे इतके बारीक असतात कि बराच वेळ लागतो निवडायला.
आज मी उडालेच. जरा हटके बदल म्हणून चवळी भिजवली. आताशा बारीक आकाराची चवळी मिळायला लागली आहे. जसा बारीक / इन्स्टंट साबुदाणा म्हणे पोटाला त्रासदायक ठरत नाही तशीच हि बारीक चवळी. बारीक म्हणजे नेहेमीच्या आकारापेक्षा थोडा कमी आकार, भिजवल्यावर बऱ्यापैकी मोठा होतो तो दाणा. ह्या पठ्ठीला इंग्लिश भाषेत "ब्लॅक आय बिन" म्हणजे "डोळा असलेली" ती, असा काहीसा शब्दशः अर्थ. म्हणजे जिला डोळा आहे, सदृश सगळं मटकी किंवा मुगासारखे नाही, अगदी बारीक आणि एक आकार, एक रंग ई. त्यामुळे डोळा आहे, आकार मोठा आहे, मोड येण्याची जरूर नाही, पट्टाकिनी भिजते आणि शिजते देखील. थोडेसे खोबरे घातलेले वाटण-साटंण घातलं कि भलतीच चविष्ट होते. इतकी वर्ष मी ह्या डोळस मैत्रिणीसोबत आहे, तिला वापरते आहे. पण आज अचानक काय वाटलं कुणास ठाऊक पण म्हटलं एक शिट्टी घेण्याआधी, मस्त धुतल्यावर एकदा नजर फिरवावी आणि बघते तर काय, भला मोठ्ठा प्रश्न उभा ठाकला ना माझ्या पुढ्यात, आणि मी विचारलं "अगं चवळी, तू सुद्धा?" हे असं कधीच पहिले झालं नव्हतंच कधीही. चवळीत चोर? बाप रे, अशक्य आणि अवघड. एक नाही, दोन नाही तर चक्क तीन. हे माझ्या दृष्टीने अशक्यच आहे. ह्या ब्लॅक आय बिन ला, ठळक आणि मोठ्या आकाराच्या डोळस जिन्नसाला विनंती आहे कि जरा अजून मोठे करा डोळे पण चोर शिरू देऊ नका, ते तसेच पडिक राहू देऊ नका तळाशी, करा काही तरी हालचाल. तुम्ही इतर कडधान्यासारख्या नाही आहेत हे लक्षात ठेवा आणि वागा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा