शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०२४

२०२७: मातृभाषा आणि तंत्रशिक्षण


'नविन राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०' हे २१ व्या शतकातील पहिले 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण' आहे. ह्या धोरणानुसार शैक्षणिक पातळीवर अनेक बदल झाले आहेत.  त्यातला एक मला भावलेला बदल म्हणजे मातृभाषेचा वापर. म्हणजे अगदी उच्च शिक्षणात सुद्धा मातृभाषा वापरावी, असा सल्ला दिला गेला आहे. ज्या काही महत्वाच्या घडामोडी असतील, किंवा शब्द असतील ते तसेच राखून पण समजावून सांगण्याचे काम मातृभाषेत करावे एवढेच. ते मला प्रचंड भावले आणि पराकोटीची इच्छा जागृत झाली मराठीतून तांत्रिक शिक्षण देण्याची. एका खूप दिग्गज प्राध्यापकांची ओळख देखील झाली त्याच दरम्यान जे हे धोरण येण्याआधीच मराठीतून शिकवत होते आणि त्याचा त्यांना फायदा पण दृश्य होता. मराठीतून समजावून सांगितल्यामुळे मुलांची प्रगती कुठेही खुंटली वगैरे नाहीच. त्यामुळे मला मनापासून वाटले कि मला अशी संधी मिळायला हवी. आणि असे एक महाविद्यालय आहे पुण्यात जेथे एक अख्खा वर्ग खास मातृभाषेतून शिकतो.  त्यांची हि चवथी बॅच / तुकडी आहे जी खूप व्यवस्थित मराठीत मोठी होते आहे, वाढते आहे आणि मज्जा येते आहे. त्यांना काही तास शिकवण्याची सुवर्ण नाही तर प्लॅटिनम संधी मला मिळाली. मराठीवरचं माझं नितांत प्रेम, माझी मातृभाषा, माझं बालपण ज्या भाषेत झालं, अश्या भाषेत शिकवायचं म्हणजे अत्यानंद आहे माझ्यासाठी.  आणि दुधात साखर म्हणजे, फक्त संशोधन कसे करायचं हे सांगायचं आहे विद्यार्थ्यांना, बास. मग काय सोन्याहून पिवळं असं झालाय मला. चार तास दिले होते, दोन पूर्ण झालेत. पुढील दोन तासात मी जागून घेणार आहे, कारण हे पहिल्यांदाच घडतंय. जे शिक्षक तेथे सातत्याने काम करतात त्यांना कित्ती समाधानी वाटत असणार. मुलांना किती सोप्प झालंय कारण मातृभाषेत समजावून सांगणार, कोणालाच उगाच इंग्लिश वापरायला नको आणि शिवाय प्रश्न पत्रिका देखील दोन्ही भाषेत छापली जाते, इंग्लिश मधला जर यदाकदाचित प्रश्न नाही उमगला तर पट्टाकिनी मराठी बघा आणि भन्नाट उत्तर द्या.  आमच्या वेळी का नव्हतं असं मराठमोळं वातावरण महाविद्यालयांत, विद्यापीठात? उगाच तोडकं मोडकं इंग्लिश वापरावं लागलं मला.  असो. आता आहे ना, बास, अजून काय हवंय? 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...