मी इतक्यात एका दूरच्या भागात पहिल्यांदा गेले कारण तिकडे जायचे कधीच काहीच कारण नव्हते. ते ठिकाण बरेच दूर आणि नवीन असल्यामुळे, किंबहुना आताशा मी टॅक्सिने प्रवास करण्याला प्राधान्य देते. त्यात चार डोळे आहेत, सगळीकडे बघण्याची, टिपण्याची आधीपासूनच सवय आहे, त्यात मी फार मोठी खवैयि आहे, ह्या सगळ्याचा परीणाम म्हणजे मला एक पाटी दिसली. खूप चविष्ट, चवदार, अनोखी पाटी होती ती. आणि त्या पाटीकडे लक्ष जाणार नाही हे तर अशक्यच. त्यावर असं काहीसं लिहिलं होतं "ठेचा वडापाव", अहाहा च. असं वाटलं ना कि ताबडतोब गाडी थांबवावी आणि चव घ्यावी, पण काम पुढे उभं ठाकलं होतं त्यामुळे स्वतःला कसबसं आवरलं त्यावेळी. पण मला कल्पना फार आवडली. एक तर तो वड्यात जास्त प्रमाणात, म्हणजे व्यवस्थित चव येईल इतपत ठेचा घालत असणार, किंवा हिरव्या / लाल मिरच्यांचा ठेचा पावला लावत असणार, चटणी सोबत किंवा ऐवजी. असं काहीसं असणार, घरी आता नक्की करून बघते लवकरच.
हे काय कमी होतं आज कधी नव्हे ते खूप दिवसांनी इंग्लिश वर्तमानपत्र हातात घेतले चाळायला आणि काय महद आश्चर्य, एक पान भर जाहिरात आहे, शाकाहारी मांसाहारी दोन्ही पद्धतीचे पदार्थ नव्या ढंगात सादर केलेत. अर्थात इतकी मोठी जाहिरात म्हणजे असं च काहीसं असणार नाहीतर लाखात कोण कशाला खर्च करेल उगाचच. म्हणून बघितले तर माझे चार डोळे मला खूप काही वेगळे सांगत होते, खुणावत होते. चक्क विदेशी पदार्थ जे भारतात विकले जातात, भली मोठी कंपनी आहे ती, त्यांनी पण ठेचा आवृत्ती काढली आहे, क्या बात है नाही, सहीच.
म्हणजे बघा, त्या ठेच्याची महती कुठवर पोचली आहे ते आणि ठेचा हा काय चीज आहे, अद्भुत, जगावेगळी आणि कित्तीतरी वेळ जिभेवर रेंगाळणारी. अगदी प्रत्येक समुदायाला, वयोगटाला, आणि दर दिवशी भुरळ घालणारी अशी. मी चाट पडले आणि निःशब्द झाले ती जाहिरात बघून आणि वाढता ठेच्याचा सदुपयोग बघून. मस्तच.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा