शनिवार, २८ सप्टेंबर, २०२४

२०३९: नो फरक / समान


मला निश्चित आठवत नाही पण गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या कानावर हे एक वाक्य पडतं आहे कि मुलामुलींमध्ये काहीही फरक नाही. मुलांचे प्रत्येक क्षेत्र आता म्हणजे गेली अनेक वर्ष मुलींनी पादाक्रांत केले आहेच. वादच नाही त्यात. फार हिम्मत वाल्या आहेत मुली. शिक्षण क्षेत्र म्हणा, नोकरी म्हणा, गाडी चालवणे, पैसे सांभाळणे आणि उभे करणे, मोठ्या पदांवर काम करणे, देश सांभाळणे अगदी सर्वच कामे त्या शिताफीने करतात, असंख्य उदाहरणे आहेत ज्याने हे सिद्ध झाले आहे. आणि फक्त भारतात नाही तर सगळ्याच देशांमधे, जगभरात हे दिसून येतं, सातत्याने. कुठलीही गोष्ट मुलींना जमत नाही अशी नाहीच. किंबहुना अनेक बाबतीत त्या सरस आहेत, जे मुलांना कधीच शक्य होणार नाही ते ह्या सहजी करून जातात. असे सगळे वाक्य आपल्या सातत्याने कानावर पडतात, वाचायला आणि अनुभवायला देखील मिळतात. 


काल त्यात एक सहज भर पडली आणि मला खुद्कन  हसू आले, आवारात आले नाहीच मुळी, म्हणून खरं तर हा पंक्ती प्रपंच.  तर माझी हि एक सवय आहे कि मी जर स्वयंपाक घरात उदाहरणार्थ चहा करत असले तर काय आधण येई पर्यंत फक्त त्या भांड्याकडे एकटक बघत बसू, का उभी राहू? छे छे, अशक्य कोटीची गोष्ट आहे हि. आधण ठेवलं कि मी इतर अनेक कामे उरकते, आटोपते, करते, भांडी लावते, ओटा आवरते गरज असेल तर, ओटा पुसून घेते, आजूबाजूला जे असेल ते स्वच्छ करण्याचा प्रयत्न करते, पुढे काय भाजी वगैरे करायची आहे, ती सर्व काढून ठेवते, तेवढ्यात फ्रिज वर हात फिरवला जातोच. पण  मी मुलगी, माझ्या ऐवजी हे सगळं अनुभवलेला मुलगा जेव्हा त्याच स्वयंपाक घरात जातो तेव्हा तो शिस्तीत फक्त उभा राहतो, बास. त्याला आजूबाजूचे काहीही म्हणजे काहीही दिसत नाहीच, काही म्हणजे काहीच नाही, त्याला कामे म्हणतात, ती करायची असतात हे खिजगणतीतच नाही, अजिबात ते शिवत देखील नाही. "हे सगळं करायलाच हवं का? आत्ताच? मी सध्या चहा करतो आहे ना?" वरून हे सगळं ऐकावं लागतं जर मी चुकून काही म्हटलं तर. आणि हे दोघांच्या बाबतीत सारखंच आहे, सारख्या वयाच्या मुला आणि मुलीच्या बाबतीत. का असू नये? सध्याचा काळ वेगळा आहे, फक्त मुलींनीच कामे करायची हे कुठे नमूद केलेलं आहे? आणि का? ती काय बिनपगारी मोलकरीण नाही ना तुमच्या घरची. अश्या सगळ्या विचारांची भजी झाली आहे डोक्यात अनेकांच्या. त्यामुळे मी थोडीशी बावळट वाटते अनेकदा अनेकांना. पण असो. मस्त वाटलं मला हा विचार मनात आला तेव्हा. भन्नाट आहे सगळं.     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...