हा नंबर माझ्यासाठी फारच मौल्यवान आहे. अनेकांसाठी सुद्धा. कारण आपली नकळत ओळख होते ह्या आकड्याशी आपल्या लहानपणी, साधारण ९-१० महिन्यांचे असतो तेव्हापासून. "स्वतःच्या पायांवर उभे राहणे", त्यानंतर एक एक पाऊल टाकत पुढे जाणे, अनेक प्रयोग करून बघणे आणि अत्यानंदाचा आस्वाद घेणे सुरु होते. त्या पायात शक्ती असतेच पण ती अजून छान बळावते, सुधृढ होते जसे जसे आपण मोठे होतो तसे. माझ्या देखील बाबतीत हेच झाले. खूप म्हणजे खूप लवकर मी चालायला आणि बोलायला शिकले आणि खरंच खूप आधीच पायावर पण उभी राहिले. मग त्याच पायांचा एक प्रयोग म्हणून एक दुचाकी नावाचे प्रकरण उभे ठाकते, आधी सायकल मग मोटर लावलेली दुचाकी शिताफीने बाळगायला तेच आकडे साथ देतात. हिम्मत वाढवतात आणि आपली पोच पण मग वाढते. हे सगळं होत होतं तेव्हा अनेक चारचाकी देवाच्या कृपेने, बाबांच्या कष्टाने, सरकारच्या कामासाठी म्हणून दारात उभ्या असायच्या, पण त्या बाबांच्या आणि बाबांसाठी आहेत हे माहित होते. त्याचा कधीच गर्व केला नाही, किंवा दुरुपयोग तर नाहीच नाही. "दोनाचे चार झाले" आणि मग हक्काची, स्वतःची म्हणावी अशी गियरयुक्त दुचाकी वापरता आली, वाऱ्याची वेगळ्या पद्धतीने गप्पा मारता आल्या. मग काय चार चाकी अर्थात सेकंड-हॅन्ड पण दारात दिमाखात उभी राहिली. मग चाराचे आठ झाले त्यामुळे चारचाकीची व्याख्या आणि व्याप्ती वाढली, भली मोठी गरज असल्यामुळे नवीन सेकंड-हॅण्डच पण चालवायला मिळाली, आणि हो ह्या दोघी तेव्हा, २२ एक वर्षा पूर्वीच गियर नसलेल्या अश्या अत्याधुनिक श्रेणीतल्या होत्या. नवीन कोरी, उंच बांधा असलेली त्या वेळची
सर्वोत्कृष्ट कार मग दाराची शान झाली. आम्ही दोघे दिवसभर घराबाहेर, दोन वेगळ्या दिशेला जाणारे, त्यामुळे मग अजून एक कुटुंबीय लवकरच सामील झाला नकळत. थोडी मोठी, आणि अनेक वर्षांपासून मनात दडवून ठेवलेल्या ब्रँड ची चारचाकी हवी असं होतं त्यामुळे मग १५ वर्षांपूर्वी थोडी मोठी आणि आधुनिक अशी राणी आली, जुनी देऊन नवीन घेतली. आता मी, मुलं सगळेच एक छान वेगळ्या आणि जास्त आनंद घेण्याच्या वयात पोचलो होतो. त्यामुळे हि गाडी अगदी बघितल्यापासून एक वेगळं नातं निर्माण करून गेलीच. अनेक दूरचे प्रवास झाले, कचेरीत मला ने आण करणं झालं, त्या करता मला अभिमानाने कमवता आलेलं स्टिकर ह्या माझ्या राणीने मिरवलं १०+ वर्ष. पाऊस, पाणी, ऊन, वारा आणि सगळ्यापासून तिने आमचं सौरक्षण केलं, अनेक प्रसंग आले पण ती डगमगली नाहीच कधी. मला तर कधीच तिला पंक्चर च्या दुकानात नेलेलं आठवत नाहीच. माझं सगळं बोलणं ती गपगुमान ऐकून घ्यायची, तक्रार न करता, मध्ये मध्ये न बोलता किंवा चुका न दाखवता. फारच साथ दिला तिने मला गरज असतांना. खूप म्हणजे खूप आठवणी आहेत तिच्या सोबतच्या. पण आता ती मला / आम्हाला सांभाळणं अवघड होत होतं, कारण निवृत्तीनंतर दररोजची देखभाल होत नव्हती. त्यामुळे तिला काल परवाच म्हटलं "दिल्या घरी तू सुखी राहा" आणि तिची मांडव परतणी झाली.
त्यामुळे आता पुन्हा एकदा मी ११ नंबर वर आले. जमेल तिथे ह्या ११ नंबरच्या बसने जायचे, नाही तर जवळपास जायला तीन चाकी भाड्याने घ्यायची, कामासाठी भाड्याने चारचाकी मिळतेच कि, मग आता हे सगळं पोटभर अनुभवायचं. कसं असतं नाही? 'पुन:श्च हरी ओम!', इथेच वर्तुळ तय्यार होतं, पूर्ण होतं. अगदी सगळे अनुभव आणि आनंद घेत घेत पुढील वाटचाल करायची. वाईट न वाटू देता, कठोर होऊन काही निर्णय घ्यावे लागतात त्यातलाच हा एक. अवघड आहे पण पर्याय नाही. प्रेमात पडलं कि कदाचित असं होतं वाटतं?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा