आज मला माझी भेट झाली पुन्हा एकदा, अनेक वर्षांनी. जशी एखादी सावली गवसावी असं काहीसं झालं माझं, ती इतकी माझी होती, किंबहुना मीच होते ती. क्या बात है? असं पण होऊ शकतं हे मला माहितच नव्हते. त्यामुळे पण मग जरा जास्त वेगळं वाटलं, आश्चर्य वाटलं कि असं कसं होऊ शकतं? इतकं साम्य?
तर त्याचं असं झालं कि आज मी हून एकांच्या गाडीतून अगदी घराच्या जवळ पर्यंत आले, लिफ्ट मिळाली अनायस्या. एक तर मस्तच होती गाडी, त्यात चालवणारी माझ्या साठी नवीन ओळखी झालेली म्हणण्यापेक्षा अनेक वर्षांची ओळख आहे अश्या गप्पांना सुरवात झाली. बोलता बोलता इतक्या सहज पणे गाडी चालवणे सुरु होते कि ज्याचं नाव ते. त्यात मस्तच गाणी मोठ्याने लावलेली, गर्दी म्हणते मी पण छे त्याला न जुमानता आपलाच रस्ता आहे अश्या थाटात हे दाखव, ते बघ, करत भन्नाट वेगाने गाडी चालवणे सुरु होते. टॅक्सी चालवणारे कसे जबरी असतात बघा, अगदी तसेच काहीसे, बाई-माणूस उगाच नाही म्हणत मुलींना. अगदी मी मंत्रमुग्ध झाले.
"सोन्याहून पिवळे" म्हणजे मग एका नेहेमीच्या अड्ड्यावर विसावली गाडी झकास पद्धतीने एका क्षणात पार्क झाली देखील, पट्टाकिनी धावत पळत जाऊन गरमा गरम जिन्नस घेऊन, आणून, त्याच उत्कृष्ट पद्धतीने चालवत चालवत, उगाचच न हॉर्न वाजवता संपूर्ण कंट्रोल ठेवून खाणे पण बिनधास्त चालू होते. कारण घरी पोचणे जितके महत्वाचे होते तितकीच पेटपूजा पण हो. त्यामुळे गती पण आणि पोटोबा पण.
मला अनेक वर्षांपूर्वीची मी आठवले. अगदी अशीच होते मी. मलाच माझी पुन्हा झलक दाखवल्या बद्दल मुक्ता मॅडम ना शतशः धन्यवाद.
शेजारी महामार्गावर भली मोठी पोलिसांची गाडी जात होती, भले मोठे ट्रक होते, विविध मालवाहतूक करणाऱ्या गाड्या होत्या आणि ह्या बिनधास्त गाडी काढत होत्या. जे बात. शाब्बास. तरी देखील पोटातले पाणी हालले नाही आमच्या. हा हा म्हणता घराजवळचा रस्ता कधी आला हे समजलं पण नाही. मुक्ता मॅडम ची अशीच उत्तरोत्तर प्रगती होवो, त्या वाऱ्याशी गप्पा मारत त्यांच्या उगम-निगम स्थानी अश्याच जावोत हि सदिच्छा. वेग, संपूर्ण गाडीवर नियंत्रण, चतुरस्त नजर, खाणं, गाणी, सगळे कंट्रोल्स शिताफीने वापरतं, गप्पा मारत बिनधास्त गाडी चालवणे शिस्तीत हि एक वाखाणण्याजोगी कलाच आहे, ह्यात तिळमात्र शंका नाहीच. मी नेहेमी वर्गात म्हणत असते विद्यार्थ्यांना, "कि तरुण कोण आहे? ते मस्तपैकी वेगाने आणि उत्कृष्टरीत्या कामे करून सिद्ध करा", अगदी ते सळसळत तारुण्य, स्वतःच्या पिल्लूला खूप तासांनी भेटण्याची ओढ, एकंदरीत घर गाठण्याची आस दिवसभराची कामे यथोचित आटोपल्यावर मग हे सगळं पदोपदी जाणवतं होतं. कमाल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा