ह्याची देही ह्याची डोळा, तो भव्य दिव्य असा, स्वप्नवत वाटणारा सोहोळा मी अनुभवाला. आत्तापर्यंत एक तर फक्त तो मोठ्या पडद्यावर बघितला होता किंवा त्या बद्दल फक्त ऐकलं होतं. मोठ्या पडद्यावर मोठ्यांच्या बाबी फक्त बघायच्या आणि आनंद मानायचा एवढंच माहित होतं, किंबहुना असं काही होतं हे एवढ्यातच समजायला लागलं. आधी गरोदरपण, बाळंतपण आणि त्याच्याशी संबंधित सगळे थोडेसे घरीच मर्यादित असायचे. जवळचे नातेवाईक, मित्र मैत्रिणी, घरचे ई. सगळे जमून डोहाळे जेवण साजरे होत असे. त्या होणाऱ्या आईच्या सर्व ईच्छा म्हणजे काय काय खायचं प्यायचं आहे तेच सगळे बहुतांशी उत्कृष्ट रीत्या मांडले जायी त्या दिवशी. विविध प्रकारच्या खिरींनी खेळ खेळून काय होणार ह्याची उत्तरे मिळवण्याचा गम्मत म्ह्णून प्रयत्न केला जात असे. त्या शेवया सुद्धा घरी, आजी, आई, मामी आणि इतर जणींनी अगदी आनंदाने, भरभरून आशीर्वाद देऊन तय्यार केले असे. खूप गवगवा केला जात नसे, कारण दोन जिवांचा प्रश्न असतो, नाजूक असते स्थिती त्यामुळे.
पण काळासोबत चालणे बरे नाही का? आता काय मुली सगळ्याच कामानिमित्य बाहेर पडतातच, त्यामुळे सर्वांच्या नजरेस पडतेच. शिवाय कचेरी म्हटली, गर्भधारणा म्हणजे सुट्टी घ्यावी लागतेच. शिवाय सोशल मीडिया आहेच प्रत्येक बारीकसारीक गोष्ट सांगायला. प्रत्येक क्षेत्रात तंत्रज्ञानामुळे खूप बदल झाले आहेत. माहितीचा अतिरेक झाला आहे. त्यात मग हे डोहाळे जेवण कसे सुटणार? इतक्यातच मी भव्य दिव्य प्रमाणात, म्हणजे अगदी मोठ्या पडद्यावर बघितले तसा कार्यक्रम बघितला, अनुभवला. त्यात नावीन्याने भरपूर, पारंपरिक पद्धतीने सजवलेले सगळे होते, नाच-गाणी होती, बाहेरची चमू आली होती, शिवाय घरच्यांचे, शेजारच्यांचे, लहान मुलांचे सर्वांचे भरभरून मनोरंजन आयोजित केले होते. सध्याचे चायनीज, पंजाबी, महाराष्ट्रियन असे सगळे साग्रसंगीत खाणे होते. पाश्चात्य पद्धत पण होतीच, ओवाळणे / ओटी भरणे + केक कापणे ई. लग्नाला किंवा अक्षता टाकतात तेव्हा असते तशी भलीमोठी रांग होती स्टेज वर जेथे भली मोठी चंद्रकोर आणि पाळणा होता, जगावेगळा सजवलेला, नटवलेला, काय वर्णू तव गूण अल्पमती नारायण, अशी स्थिती झाली माझी. पोत्याने नारळ, भेटवस्तू, पाकिटं आली जोडप्याला. आम्हा सर्वांना पण मनोरंजन, सुंदर मेजवानी आणि शिवाय भेटवस्तू देऊनच पाठवणी केली. अगदी उत्कृष्ट गाण्याच्या बोलांनी नटलेली, शब्दांनी सजलेली, फुलं पानांनी बहरलेली अशी ती पत्रिका बघूनच, "शितावरून भाताची परीक्षा" असं झालं. भल्यामोठ्या ढगांवर बसलेले बाळ, कृष्ण, राधा आणि मोरपीस ह्यांनी बहरलेली रांगोळीने स्वागत केले. मग काय विचारता पुढे उत्कृष्ट सजवलेला, काश्मीरच्या थंडीची अनुभूती देणारा भलामोठा हॉल, प्रत्येक कोपरा नटलेला गुलाबी आणि निळ्या रंगाने, रुखवत जे एका नजरेत सामावत नव्हते आणि मग झालेले सगळा आगळावेगळा सोहोळा. पण कधीच मनात आलं नाही "आमच्या वेळी नव्हतं असलं सगळं" ई. हि नावीन्यता प्रचंड उत्साहाने मला साजरी करता आली. खूप म्हणजे खूप मज्जा आली सर्वांनाच. आमंत्रित केल्याबद्दल धन्यवाद. हे माझ्या एका फार आवडत्या विद्यार्थ्याच्या बायकोचे डोहाळे जेवण होते. म्हणजे बघाच आम्ही कित्ती जवळचे आहोत ते. सगळ्याच पातळीवर मज्जा आली. जुन्या कचेरीतल्या सख्या आल्या होत्या त्यामुळे पोटभर गप्पा झाल्या आणि हास्याचे फवारे उडाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा