मी अगदी लहान होते तेव्हापासून मला आठवतंय कि माझी आई घरी काम करणाऱ्या सर्वांनाच पोटभर फराळ खाऊ घालत असे, मग त्या मावशी असो, ड्राईव्हर, दररोजची भाजीवाली, फुलवाला आणि इतर बरेच जणं. ती खाऊ घालायची, घरच्यांसाठी द्यायची आणि सगळ्यांच्या चेहेऱ्यावर एक मस्त आनंद आणि समाधान असायचं. त्यावेळी ती माउली सगळं घरी करायची, अर्थात त्याच मावशींची मदत व्हायची. हे असं कित्येक वर्ष सुरु राहिलं अविरत.
मग माझी बारी आली, मी पण तेच करण्याचा प्रयत्न केला आणि हे विसरले कि मध्ये अनेक वर्षांचा कालावधी गेला आहे, ठिकाण वेगळे आहे, त्यामुळे मूळ पाणी, विचारसरणी पण फार वेगळी आहे, आता ते जुनं खाऊ घालणं तितकसं आवडत नाही आहे बायकांना. त्यामुळे मग मी थोडासा विचार केला, अवतीभोवती विचारले, ऐकले, वाचले आणि मग काय तो निर्णय घेतला. पगाराला पगार हा एक नवीन नियम होता माझ्यासाठी, अलिखित असा, तो पाळला, थोडेसे खाऊ घातले नाहीतर घेऊन जायला सांगितले. बास. त्यांना बोनस जास्त प्रिय आहे हे लक्षात आले. आणि त्या बोनस च्या पैशातून मग त्या त्यांच्या पद्धतीचे सगळे आणतात, किंवा करतात. असो. ह्या बायकांची एक नवीन खासियत पण समजली कि दिवाळीचा बोनस हातात पडला कि नवीन कामे बघायची. असो तो विषयच वेगळा आहे.
ह्या सगळ्या बदलत्या काळात मला मात्र चुटपुट लागून राहायची कि सणाच्या दिवशी आपण एकट्याने फराळ का करायचा, सर्वांना देऊन खाल्ला पाहिजे. सरंजाम वाटप सुरु झाले न्यू नॉर्मल दिवसांमधे कदाचित. कारण त्या वेळी ती मोठी गरज होती आणि त्या आधी होत असेल तर माझे लक्ष सगळे माझ्या मुलांना मोठं करण्यात, माझ्या नोकरीतच होते. पण २०१९-२० पासून आत्तापर्यंत सातत्याने मी बघते आहे कि सरंजाम वाटप सुरूच आहे. कोविड च्या काळात कदाचित त्या भागातले लोक फक्त त्याच राजकारण्यांच्या ठिकाणी जाऊन वस्तू / जिन्नस घेत होते, पण आता फिरण्यावर कुठलीही बंदी नसल्यामुळे म्हणे एका पेक्षा जास्त ठिकाणी जाऊन हे जिन्नस गोळा केले जातात, काही जण इतकं करून थांबत नाहीत तर गावी जाऊन पण काही वस्तू घेऊन येतात. खूप जास्त होतंय हे सगळं. पण अर्थात मला माहित नाही ते हे सगळं कसं काय उभं करतात, बहुतांशी तर टॅक्स च्या पैशातून होत असावं सगळं. जर हे खरं असेल तर मी माझ्याकडून माझ्या मावशींना भरपूर फराळ करण्याचे सामान देते आहेच अप्रत्यक्षरीत्या. कोणी तरी त्याची उत्कृष्ट काळजी घेतंय मग मला चुकल्यासारखं वाटण्याची काहीच गरज नाही. खूप म्हणजे खूप बदल झाला आहे, सर्वच स्थरावर. असो. काळाचा महिमा, अजून काय. माझं फक्त एवढंच म्हणणं आहे कि इतकं सगळं मिळतंय तर खूप आणि समाधानी राहावं अजून काही नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा