"बाईपण भारी देवा" नावाचा सुप्रसिद्ध चित्रपट इतक्यातच येऊन गेला. फारच भन्नाट अश्या आशयाचा तो चित्रपट तय्यार केला होता. अतिशय सुंदर पटकथा, गाणी, दिग्गज कलाकार आणि एकंदरीत सर्वस्तरावरच्या प्रेक्षकांना भावणारा असा तो चित्रपट आहे.
आता असं ऐकिवात आहे कि त्याच चमूने एक नवीन चित्रपट तय्यार केला आहे, किंवा जय्यत तय्यारी सुरु आहे "आईपण भारी देवा". खात्री आहे कि हि पण अतिशय सुंदर कलाकृती असणारच. साधारण शीर्षक वाचले कि आणि आधीच्या कामावरून नक्कीच नाविन्यपूर्ण, माहितीपूर्ण, भावणारी निर्मिती असणारा ह्यात शंकाच नाही. आता फक्त तो प्रसारीत होण्याची वाट बघायची, मग जाऊन मोठ्या पडद्यावर आनंद उपभोगायचा.
हे सगळे स्त्रीप्रधान असे चित्रपट, किंवा कौटुंबिक पण म्हणता येईल असे खूप मनाला भावतात. दररोज चे विषय जरी असले तरी एक छाप सोडून जातात हे नक्की. नवीन पिढीला पण उत्सुकता नक्की असते सगळं जाणून घ्यायची. किंवा ह्या निमित्याने नवीन पिढीला त्यांच्या जुन्या आप्तस्वकीयांसोबत आठवणीत राहील असा वेळ पण घालवता येतो एकत्र जाऊन, मोठ्या पडद्याची मज्जा घेता घेता.
ह्या संपूर्ण पार्श्वभूमीवर ह्याच चमूला मला अजून एक नावीन्याने भरपूर असा विषय सुचवावासा वाटतोय, तो म्हणजे "आळशीपण भारी देवा". थोडीशी ह्या चित्रपटाच्या नावाची संकल्पना देते, जी मला सुचली आहे. प्रत्येक जण, म्हणजे अगदी नोकरदार महिला, किंवा जे अर्थार्जन करतात ते सर्व अगदी स्नातक पदवी मिळाली रे मिळाली कि कामाला लागतात. काही जण त्या आधी पण छोटी-मोठी कामे करत अर्थार्जनाला सुरवात करतात. आता जे निवृत्तीच्या वयाला पोचले आहेत त्यांनी अथक मेहेनत घेतली असणार कारण त्यावेळी गूगल नव्हता, कुठलेही स्मार्ट व्यंजन नव्हते, किंवा सुलभ मदत सहजी उपलब्ध नव्हती त्यामुळे सगळेच सुरवातीपासून विविध कामात जुंपले असणारच आणि ते त्यांनी अनेक वर्ष सातत्याने, आनंदाने पार पाडले असणार. आता थोडीशी विश्रांतीची वेळ आली आहे, मग ती नियमाप्रमाणे निवृत्ती असो नाहीतर स्वेच्छेने घेतलेली. रोजनिशी बदलली, बंधने थांबली, घड्याळाच्या काट्याप्रमाणे पळापळ संपली कि मग थोडीशी स्थिरता, किंवा स्तब्धता येते, यावी. आता ह्या ठिकाणी खूप धावपळ नको, सगळे थोडेशे हवे तसे करावे, तो सुद्धा आनंद वेगळाच असतो. ह्याच अर्थ असा नाही कि अगदी अंथरुणावर लोळत पडावे. पण धावू नये, घाई नको उगाचच. दररोजची कामे मागे पुढे करून तर बघा कशी मज्जा येते ते. शिस्त सांभाळून जरा सैल सोडून तर बघा काय त्यात गम्मत आहे ते. काही जण म्हणतात कि "जे केले नाही आत्तापर्यंत, किंवा वेळ मिळाला नाही असे सगळे आता करून बघा, हीच ती वेळ. त्यात मग सगळे छंद आले, मित्र मैत्रिणीशी भेटणे आले, गावी जाणे आले, शांतपणे आणि गरमागरम जेवणे आले, आणि असे बरेच काही." आज पर्यंत जो कधीच घरच्या किंवा दारच्या कामाबाबती चोखंदळ होता / होती, वेळेआधी कामे उत्कृष्ट पद्धतीने केली गेली, विविध उंची गाठली गेली कामाच्या बाबतीत, अनेक शिड्या चढल्या गेल्या, अनेक टप्पे पादाक्रांत केले, वेळ, तब्बेत, खाणं-पिणं, नाती सांभाळून आता त्याला स्वल्पविराम जरासा द्या. मी त्याला सध्या आळशी असे संबोधते. कमी वेग, अत्यल्प काम, मनाजोगे, हवे त्या वेळी केलेले काम ई. म्हणून आळशी. अजून काही नाही. संपूर्ण लक्ष देऊन केलेला व्यायाम, शांतपणे वाचलेले वर्तमानपत्र हातात घेऊन, जेवायच्या अगदी काही वेळ आधी लावलेला कुकर आणि गरमागरम तव्यावरची भाकरी पानात, म्हणजे सकाळी / पहाटे लवकर उठून सगळं उरकण्यापेक्षा वेळेवर (अर्थात खाणंपिणं तरी) करणे ह्यात जे सुख आहे ते वाखाणण्याजोगंच म्हणून आळशी.
तर अश्या पद्धतीने मस्त जगणे, तो भला मोठ्ठा बदल स्विकार करणे मग तो पैशाचा असो नाही तर कामाच्या डोंगराचा, रोजनिशी देखील बदल, असे सगळे मानाने निवृत्त होणे, ते टिकवणे, ई. मोठ्या पडद्यावर व्यावसायिक पातळीवर तय्यार करून दाखवले तर? खूप म्हणजे खूप लोकांना त्याचा फायदाच होईल. अगदी निवृत्तीचा पहिला विचार, मग त्या करता केलेली तालबद्ध तय्यारी जय्यत अशी, आणि त्यानंतर जे ठरवले आहे फक्त ते आणि बरेच काही अत्यानंदाने करणे म्हणजे ठराविक पेक्षा हटके, किंवा नकारात्मकता आळशी पेक्षा देखील वेगळे, असे दाखवले तर त्या टप्प्यावर असणाऱ्यांना, त्या टप्प्यानजीक असणाऱ्यांना, किंवा हा टप्पा येणार आहेच हे ठाऊक असणाऱ्यांना खूप मदत होतील, अनेक पिढ्यांना पोचेल खूप काही. निवृत्ती म्हणजे हात-पाय गाळून बसणे नाही तर संपूर्ण वेगळ्या पद्धतीने तेच हात-पाय चालवणे होय.
चला तर मग आशा करू या कि असा देखील मस्त चित्रपट तय्यार होईल मराठीत. आणि हो, हे सगळं फक्त पैशांसाठी अजिबात नाही बरं का? एक मनोरंजनात्मक पद्धतीने मांडलेले असे काही, त्या मस्त निवृत्ती नावाच्या नवीन आरंभासाठी फक्त. काही जणांना खरंच कळत नाही त्या नंतर काय करायचे ते, इतका मोठ्ठा अनुभव पाठीशी असून देखील, हि नवीन नाही तर नाविन्यपूर्ण सुरवात असून देखील. बरेच जण मनाला लावून घेतात, लोकांचे ऐकतात, नको ते वाचून उगाच उदास पण होतात त्या सर्वांसाठी. किंवा जे मदतनीस असतात ते फक्त तुम्ही तुमचे पैसे कसे सांभाळायचे हे सांगणे जास्त उपयुक्त मानतात त्यामुळे चित्रपट हा एक सुंदर पर्याय असेल ह्या भल्यामोठ्या समुदायापर्यंत पोचायला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा