हि माझ्या एका खास मैत्रिणीची कथा. आम्ही खूप जवळच्या मैत्रिणी. तिची रीतसर परवानगी घेऊनच मी हे येथे मांडते आहे, का मांडावस वाटलं हे मला ठाऊक नाही, पण मी लिहिती झाले, आपोआप.
अगदी लहानपणीपासूनच ह्या माझ्या सखीने जसे कि सगळं तिच्या हातात घेतलं होतं, म्हणजे घराचा कारभार. सणावारी रांगोळी काढण्यापासून ते घरची तिला जमेल तशी साफसफाई, स्वयंपाकात मदत ते सगळं म्हणजे सगळंच. हे करता करता तिने सगळ्याच जबाबदाऱ्या घ्यायला सुरवात केली, जसजशी ती मोठी होत गेली. तिला सगळं करण्यात अत्यानंद मिळत असे कारण तिच्या हातून सगळं खूप सुंदर पद्धतीने, अगदी वाखाणण्याजोगं घडत असे. उत्कृष्ट दारावरची तोरणं, भल्या मोठ्या रांगोळ्या, चविष्ट नैवेद्य, आणि त्या व्यतिरिक्त बाकी खूप काही. जसे कि दसऱ्याला सगळे सोने द्यायला येणार म्हणजे गोड तिखट करणे आलेच, ते देखील ती अगदी शिताफीने करत असे. तिच्या हातात कला होती. त्यामुळे प्रत्येक दसऱ्याला एक नवीन पैंटिंग किंवा भरतकाम करून ती घर सजवत असे. आणि हे सगळं महाविद्यालयीन शिक्षण सुरु असतांना आणि त्यानंतर नोकरी करत होती तेव्हा पण नाविन्यपूर्ण रीतीने सुरु होतं. शेजारी पाजारी खूप आश्चर्य करत असतं तिच्या ह्या सगळ्या धडपडीला बघून. खूपच व्यवस्थित सगळं होत असे आणि प्रत्येक सणाला जे हवे ते सगळे, भरभरून, यथोचित. त्यावेळी हे असे स्मार्ट फोन नव्हते त्यामुळे कुठेच कसलेच प्रूफ नाही आता दाखवता येणार. त्यावेळी ज्यांनी ते अनुभवले, बघितले तेच सांगू शकतील बास. पण तिचा उत्साह वाखाणण्यासारखाच होता. कुठेही कधीही अडले नाहीच, सगळे विकत आणण्यापासून ते करण्यापर्यंत सगळं ती ठरवत असे, त्याला मूर्त रूप देत असे. बैठा बंगला होता तिच्या वडिलांचा त्यावेळी. लोक रस्त्यावर उभे राहून तिच्या कलाकृती बघत असतं. घरी येणारे तर खुश व्हायचेच, पण बाहेरच्यांना पण मज्जा यायची.
अशी अनेक वर्षे स्वातंत्र्याची आणि उत्साहाने भरभरून गेली, आणि मग दोनाचे चार झाले. ती एकत्र कुटुंबात दिली. तेथे जेव्हा सणवार सुरु झाले तेव्हा हिला प्रचंड आराम मिळाला कारण हिच्या नावे फक्त स्वयंपाक आला. बाकी सगळे घरचे सांभाळून घेत होते. पण हळूहळू हे लक्षात आलं कि सांभाळून घेणं पण जरा वेगळ्या पद्धतीचे होते. खूप चिडचिड करून सगळी कामे केली जात. मग ह्यांची बदली झाली. हि पूर्णवेळ काम करणारी गृहिणी होती. सुट्ट्या मिळत नसायच्या. त्यामुळे फक्त सणादिवशी जर सुट्टी तर त्या दिवशी बायका सुट्टीवर. मग हिची खूप तारांबळ होत असे. मुलं, स्वयंपाक, पूजा आणि बाकी इतर सांभाळण्यात. त्यात तिला जमेल तेवढे जमेल तसे ती करण्याचा अथक प्रयत्न करायची पण प्रत्येक वेळी "पालथ्या घड्यावर पाणीच" फिरायचे. खूप ऐकून घ्यावं लागायचंच, प्रत्येक गोष्ट चुकायचीच. आजच्याच दिवशीचे उदाहरण घेऊ यात. आज प्रत्येक गाडीला हार घातला जातो. कधी छोटे पडायचे हार तिने आणलेले, तर वेळेवर तोरण होत नसे किंवा छोटेमोठे व्हायचे. तिने नैवेद्य केलेला गोड पदार्थ फारच अगोड लागायचा तर बाकी पदार्थ बेचव. असे तब्बल ३० वर्ष पार पडले. मागल्या वर्षीपासून हिला जरा शांतात अनुभवता आली आहे, मिळाली आहे कारण आता प्रत्येक जण पांगले आहे, वेगवेगळ्या ठिकाणी. त्यामुळे चुका काढण्यात तरबेज असलेले कुटुंबप्रमुख आहेत सध्या बदलीच्या ठिकाणी, त्यांच्या नोकरीचे ठिकाण / गाव वेगळे आहे सध्या, एक वर्षांपासून. त्यामुळे हिला आता श्वास घेता आला आहे. पुन्हा एकदा हिला जमेल तेवढे, हिला योग्य वाटेल असे, जमेल तसे करणे सुरु आहे, मनसोक्त असे. आता पंखात बळ नाही उरले, एक सण म्हणून आवश्यक ते नक्की करायचे तेवढेच आता तिने ठरवले आहे. पण बघा ना ३० वर्ष हा कालावधी अश्या नैपुण्य असलेल्या मुलीने कसा काय व्यतीत केला असेल कुणास ठाऊक. आणि खरंच, ३० वर्ष सलग कोणी कसे सारखे बोलू शकतो आणि ते देखील अश्या धडाडीच्या मुली करता? देवालाच ठाऊक, किंवा तिचे भोग, ते भोगल्याशिवाय संपत नाहीत. आता संपले आहेत हे महत्वाचे. सण इतके सुंदर असू शकतात हे पुन्हा एकदा तिला समजले, नव्याने. अगाध त्याची लिला अजून काय.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा