सोमवार, १४ ऑक्टोबर, २०२४

२०५८: अर्ली टू बेड ...


"लवकर निजे, लवकर उठे, त्यासी आरोग्य धनसंपदा लाभे.." हि एक प्रसिद्ध म्हण आहे माझ्या माय मराठी मधे आणि अश्या असंख्य म्हणी ऐकत मी मोठी झाले. कित्ती मतितार्थ आहे ह्या एका छोट्या आणि सरळ वाक्यात, काहीच कठीण नाही समजायला आणि पालन करायला. असं नाही कि हि म्हण फक्त मराठी भाषेपुरती मर्यादित आहे. आपल्या इंग्लिश भाषेत सुद्धा तत्सम आणि तितकीच बहुउपयोगी वाक्य आहेच. अनेकविध संशोधकांनी ह्यावर विचार, विनिमय करून हे सिद्ध केले आहे गेली अनेक वर्ष. हे वाक्य फक्त दोन पायांच्या आपल्या मित्रांनाच नाही तर चार पायांच्या, पंख धारण करणाऱ्या सर्वांसाठी आहे आणि त्याचा ते तंतोतंत उपयोग करतात, करतांना दिसतात. "अर्ली बर्ड कॅचेस द वर्म". आपल्या पक्षी मित्रांनी पहाटे उठून मेहेनत केली तर खाद्य सहज साध्य होतं. उशीर झाला कि सगळेच उपाशी, त्यामुळे ते कधीच आळस करत नसावे कारण त्यांना स्विग्गी हे ऑप्शन उपलब्ध नाही मुळी. स्विग्गी हे अँप आपल्याला पण हक्काने प्रत्येक वेळी, खिशा गरम आहे म्हणून उपलब्ध होईलच असे नाही, वीज, कनेक्शन पाहिजे, आणि बरीच कारणे आहेत. "सातच्या आत घरात", "विषाची परीक्षा का घ्यायची", अशा अजून काही म्हणी देखील आहेत. "शहाण्या माणसाने कोर्टाची आणि पोलीस ठाण्याची पायरी चढू नये", ह्या म्हणीला आपण थोडेसे वेगळ्या पद्धतीने पण वापरू शकतो, "शहाण्या माणसाने रात्री अपरात्री घराबाहेर पडू नये". असंख्य कारणे आहेत, मद्यधुंद, बाकी नशेत धुंद, काही ठसन मधे तर बाकी अहंकारात वाहून गेलेले असे निशाचर रस्त्यावर पडीक असतात. आपल्या आदरणीय जुन्या पिढीच्या लोकांनी घालून दिलेले आदर्श चुकीचे मुळीच नाहीत.  रात्रीच्या अंधारात, पाऊस पाण्यात रस्ता नीट नजरेस पडत नाही, खड्डे दृष्टीस पडत नाहीत, भल्या मोठ्या दिव्यांमुळे समोरचं कधी कधी दिसत नाही, आपण एक वेळेस व्यवस्थित गाडी चालवू पण पुढचा कसा चालवेल हे आपल्या सर्वस्वी हातात नाहीच. 


ह्या सर्व पार्शभूमीवरून एक विचारावंस वाटतं कि विविध कार्यक्रम सकाळी / दुपारी का नाही आयोजित करत? उशिरा रात्रीच का? कुठलाही कार्यक्रम म्हटला कि तो खूप दिवस आधी आयोजित केला जातो, कारण खाण्याचे ठिकाण, आमंत्रणं ई. आधीच दिली जातात, सगळ्यांची सोय बघून. मग इतक्या आधी माहित असतांना सकाळी यायला काय हरकत आहे, तसा दिवस आखणे सहज शक्य आहे. त्या दिवशीच्या सकाळी कामे आदल्या संध्याकाळी करून मोकळे व्हा नाहीतर त्या दिवशी संध्याकाळी करा.  पण रात्रीचं बाहेर जाणं टाळा. शिवाय असे म्हटले जाते कि दुपारचे जेवण जरा जास्त जड झाले तर सूर्यास्तापर्यंत ते पचते, सूर्याच्या ऊर्जेमुळे. आणि रात्रीचे जेवण हे अगदीच थोडेसे असावे ई. 


आपल्या भारतीय परंपरेनुसार अनेक धर्मात तर सूर्यास्ता आधीच जेवण केले जाते. बाहेरच्या देशाची गोष्ट निराळी. "जैसा देस वैसा भेस" त्या पद्धतीने वागायला काय हरकत आहे? आयुर्वेद शास्त्रानुसार देखील जेवणांनंतर दीड - दोन तासात झोपलेलं बरं म्हणजे दुसऱ्या दिवशीची सकाळ उत्कृष्ट सुरु होते आणि तो दिनक्रम तसाच आठवडाभर टिकून राहतो. 


"व्हेन यू ह्याव इनफ ऑफ स्क्रीन लुक ऍट ग्रीन", "अती तेथे माती". प्रत्येक इंद्रिय तुमच्यासाठी अविरत कार्यरत असते, त्यांना ठराविक वेळेला, ठराविक वेळेसाठी निसर्गनियमांनुसार विश्रांती द्यावी. एखाद दिवशी अपवाद ठीक आहे. एखाद दिवस नेहेमीच यायला नको. मानसिक, शारीरिक स्वास्थ्य जपा, वेळीच, कुठल्याही अवयवांना गृहीत धरू नका. जागे व्हा. पाश्त्यांकडून खूप काही चांगलं शिकण्यासारखं आहे, ते बघा. 


सकाळी उठा, वायुवेगाने कामे आटपा, तसे ठरवून करा, आणि मग दुपारच्या किंवा उशिरा सकाळी कार्यक्रम नियोजन करा, किंवा उपस्थित राहा. घरी जाऊन शांतपणे दुसऱ्या दिवशीची तय्यारी करा, व्यवस्थित वेळेवर जेव्हा, शतपाउली करा आणि वेळेत झोपा. एकत्र भेटून समारंभ साजरे करणे जास्त महत्वाचे, आणि त्याची वेळ जास्त महत्वाची, सर्वार्थाने.    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...