मला अगदी व्यवस्थित आठवतंय कि माझ्या लहानपणी घरी कोठ्या असायच्या, धान्य साठवून ठेवायला. वर्षभराचं धान्य एकतर घरच्या शेतीतून यायचं किंवा विकत घेतलं जायचं. मग ते शिस्तीत उन्हात वाळवून, सुकवून, त्याला बोरिक पावडर किंवा तत्सम पर्याय करून मग साठवले जायचे. अर्थात हे असं साठवणं तेव्हा भाग होतं कारण एकत्र कुटुंब पद्धती होती, भरपूर प्रमाणात पाहुणे-राहुणे येत असतं अनपेक्षित आणि आले कि ते यथेच्छ जेवून-खाऊनच जात असतं. शिवाय घरची माणसं, गडी माणसं, शेजारपाजार, सणवार असा गोतावळा खूपच असायचा. अजून एक कारण म्हणजे त्यावेळी सगळेच जण घरचं खायचे. बाहेर खाण्याचे पर्याय एक तर नव्हते किंवा मर्यादित होते. आपली शिदोरी बरोबर असायचीच बहुतांशी सर्वांची. त्यामुळे पण धान्यसाठा लागायचाच.
ह्या सगळ्या मस्त दिवसांनंतर आले ते थोडेसे वेगळे दिसणारे, भासणारे असे पर्व. काळाप्रमाणे बदल होणारच. आणि ह्या दिवसांमधे महिन्याचा किराणा आणण्याची प्रथा रुजू झाली. कारणे अनेक होती. एक म्हणजे घराचा प्रमुख खांब, आधार आणि घरातली मुलगी / स्त्री / आई नोकरी साठी घराबाहेर पडली. त्यामुले तिला महिन्याचे सामान आणण्यात, किंवा मागवण्यास आणि ते सांभाळण्यास सोप्पे जाऊ लागले. वर्षभराचे धान्य सांभाळणे नोकरी सोबत हे एक आव्हान होते. शिवाय विभक्त कुटुंब पद्धती मुळे पण तेवढे सामान लागत नव्हते. शेती करणारे बरेचसे जण शहरात येऊन स्थायिक झाले होते ह्या दिवसांमधे त्यामुळे खूप कमी जण शेतात पिकलेले धान्य शहरातील छोट्याश्या घरी आणून ते वापरू लागले. कोठ्या ह्या आता फक्त किराणा मालाच्या दुकानात, जुन्या घरांमधे किंवा दुर्मिळ झाल्या आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही. एक महिन्याचे सामान मागवायला एक अजून सोप्पं मार्ग पण समोर उभा ठाकला होता आहे तो म्हणजे सोप्पे तंत्रज्ञान. घरबसल्या स्वच्छ, निवडलेले असे जिन्नस ऑनलाईन पद्धतीने मागवता येऊ लागले. मग काय विचारतां, थोडेसे काम हलके झाले नोकरदार चाकरमानी माउलीचे. अर्थात ह्या शिवाय अनेक ठिकाणं उदयास आली बाहेर खाण्याची, मग काय, सगळ्यांची उडी पडली म्हणून समजा. आयतं मिळतंय खायला ते देखील आंतरराष्ट्रीय स्तरावरच मग काय विचारता? सगळ्यांच्या उड्या पडल्या नाहीत तर आश्चर्यच. त्यामुळे देखील थोड्याश्या महिन्या भराच्या सामानात भागायचं.
हे सगळं घडत असतांना जरी घरी फक्त चार माणसं तरी देखील त्यांच्या चार तऱ्हा उदयास आल्या. ह्या तंत्रज्ञानामुळे सगळं जग मुठीत सामावलं आणि प्रत्येकाला काही तरी दररोज, प्रत्येक वेळी वेगळं खावंसं वाटू लागलं. त्यामुळे नेहेमी घरी होतो तोच स्वयंपाक पुरेसा नाही हे घरच्या गृहिणीच्या लवकर लक्षात आलं. त्यामुळे आताशा महिन्याचे सामान भरण्यापेक्षा एक दिवस किंवा दोन, जास्तीत जास्त ५ दिवसांचा आठवडा एवढंच बघितलं जातंय. वेगवेगळे पदार्थ खाण्याची इच्छा होणं हे काही चुकीचे नाहीच मुळी पण ते वर्षाच्या धान्य साठ्यात, महिन्याच्या किराणा सामानात बसत नाही. आणि दोन्ही करणं अवघड आहे दिवसभर नोकरी करून आल्यावर. शिवाय सध्याचे आधुनिक गुरु आहेत ते पण सांगतात च ना, कि जास्त डोक्याला ताण द्यायचा नाही, खूप दूरचा विचार करत बसायचे नाही, आजचा दिवस महत्वाचा. ह्यानुसार देखील आताशा अनेक छोटे छोटे दुकानं आहेत आजूबाजूला, असंख्य अँप आहेत, जे पापणी हालायच्या आत दारात सामान घेऊन हजर होतात, त्यामुळे तुम्हाला काय खायची तल्लफ आहे ती पूर्ण होऊ शकते घरच्या घरी, बाहेर जाऊन खायची गरज नाहीच. आताशा इतके सुंदर व्हिडिओज उपलब्ध आहेत ज्यात पट्टाकिनी पदार्थ कसे घरी तय्यार करायचे ह्याची कृती सांगितली जाते, शिवाय करून दाखविली जाते. ते बघून मस्त सगळं करून बघण्याचे दिवस आले आहे गेली काही वर्षे. त्यामुळे प्रवाहपतीत होणे आवश्यक आहेच, किंबहुना सगळेच झालेत. आता स्वयंपाकघर हि सगळ्यांची आवडीची जागा आहे. नेहेमीच्या कामातून रंगीत, खुमासदार, चविष्ट आणि सुगंधी / सुवासिक असा बदल सर्वांनाच हवा हवासा आहे.
वर्ष, महिना, आठवडा ते दिवस हा प्रवास वाखाणण्यासारखाच आहे. मस्त चाललंय आमचं असं काहीसं चित्र आहे सर्वत्र. काहीही करा, वर्षभराची साठवण करा, महिन्याचा किराणा आणा नाही तर दररोज सहज चक्कर म्हणून ऑनलाईन किंवा ऑफलाईन मागवा, "मस्त खा आणि स्वस्थ रहा".
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा