एक संतवाणी जी आपण सर्व अनेक वर्ष, पिढ्यांपासून ऐकतो, गुणगुणतो आणि गातो आहे. संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर माउली रचित अशी हि शब्दसुमने आहेत. खुप सुंदर अर्थ, संथ पण भावपूर्ण चाल आणि सहज गुणगुणता येईल अशी. त्यामुळे खूप प्रचलित असे हे भावगीत, भक्तीगीत, अभंग आहे. आज अनेक सन्मान विजेते श्री. राहुल देशपांडे ह्यांच्या कार्यक्रमाला जायचा योग आला आणि त्यांनी हे गीत त्यांच्या यादीत सामील केलं होतं. हे गीत अचानक सुरु झालं एका बंदिशी नंतर. जसे हि सुरु झाले गायला, तसे सगळेच प्रेक्षक हळुवार आवाजात गायला लागले. एक तर संपूर्ण छोटेखानी गीत सर्वांनाच पाठ आहे आणि त्यामुळे एक वेगळी साथ मिळाली, सगळेच सहभागी झाले अचानक न ठरवता आणि एक माहोल तय्यार झालाच.
हा अनुभव घेतल्यावर ह्या गाण्याविषयीच्या खास आठवणी जाग्या झाल्याशिवाय राहिल्या नाहीत. बहुतेक वर्ष होते १९८९ किंवा कालावधी होता १९८९-१९९३ चा. साधा काळा फोन पण पोचला नव्हता आमच्याकडे, तरी देखील आम्ही सर्व मित्र-मैत्रिणी सर्वांच्या वाढदिवसाला भेटत असू, आवर्जून. कसे काय जमत होते मोबाईल शिवाय तेव्हा कुणास ठाऊक पण जमलेच नाही तर खूप मस्त निभावले, मज्जेत, अत्यानंदात असे. वाढदिवस म्हणजे एकत्र जमणे कुठेतरी, साध्या दुचाकींवर मग आधी एक मोठे कार्ड विकत घेणे, सह्या करणे, काही मजकूर लिहिणे आणि मग यथेच्छ ताव मारणे खाण्यावर, गप्पांवर सुद्धा. प्रचंड गप्पा, हश्या आणि मौजमस्ती होत होती. सर्वच बहुतेक खवैये होते, सगळं चालायचं, घरचंच मस्त केलेलं मग काय विचारता?, "आण दो" असे काहीसे. त्यात आवर्जून गाणी होतीच, अविभाज्य घटकांसारखी. एक्का दुक्का म्हटली जायची पण त्यात मोगरा फुलाला होते बरं का, आणि हे सगळं माझ्या आठवणीत होतेच पण जेव्हा आज प्रकर्षाने त्या सर्व मैफिलींची आठवण आली ते थेट मी नागपूरलाच पोचले अगदी सर्वांच्या घरी जाणून फेरी मारूनच आले. "आजी सोनियाचा दिनू" म्हटल्यासारखे जगलो आम्ही सगळे ते दिवस उत्कृष्टपणे. टीव्ही होते बऱ्याच जणांकडे पण तो लावण्याची गरजच पडली नाही. आम्ही, आमच्या गप्पा, रस्सीखेच, मधेच एखादे तज्ञा सारखे कोपरखळी मारलेले वाक्य यायचे, घरचे पण थोडक्यात आमच्यात त्या वेळेपुरते सामील व्हायचे आणि कार्यक्रमाची सांगता व्हायची.
आजच्या "दिवाळी पहाट" आयोजकांना अनेक धन्यवाद मला माझ्या माहेरची सफर घडवून आणल्याबद्दल. तो मैत्रीचा मोगरा फुलला त्या वेळी, सदैव बहरलेला राहिला, सर्वांना सुगंध देत, आणि बुद्धिमतेच्या, जिद्दीच्या, मेहेनतीच्या बळावर, जोरावर प्रत्येकाचा वेलू गगनावर त्यांच्या प्रतीने पोचला. इतके प्रथितयश झालेत सर्वजण ह्या इतक्या वर्षात पण अजूनही आमची मैत्री कायम आहे, टिकून आहे. संपर्कात आहेत सर्व ह्या तंत्रज्ञानामुळे, म्हणजे बघा ना "क्या बात है". आमचा मोगरा वर्षभर, वर्षानुवर्षे असाच फुललेला असतो, फक्त एका ऋतू पुरता मर्यादित नाहीच. तो असाच बहरलेला आणि सुगंधित राहू दे हि प्रार्थना.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा