मंगळवार, १२ नोव्हेंबर, २०२४

२०८६: श्वास


इतक्यातच मी एका आधुनिक गुरूंचे निरूपण ऐकत होते तेव्हा आणि त्या नंतर बऱ्याच बाकी जणांकडून सुद्धा एक वाक्य कानावर पडले. "शेवटचा श्वास आपण घेतो हे आपल्याला माहित देखील नसते", किंबहुना केव्हा घेतो हे कळत देखील नाहीच. 


अगदी तसेच काहीसे मग डोक्यात आले कि पहिला श्वास घेतो तेव्हा तरी काय ठाऊक असते, काहीच नाही, श्वास अस्तित्वात येतो ते खूप वर्षांनी, ते देखील जेव्हा एखाद्या योगाच्या वर्गाला जातो तेव्हा  आणि योग गुरूंनी सांगितले कि श्वासाकडे लक्ष केंद्रित करा अगदी फक्त तेव्हाच, किंवा काही जण तेव्हा पासून ह्या असामान्य विदुषीला अनन्य साधारण महत्व द्यायला लागतात. एखाद्या सुंदर, देखण्या तरुण / तरुणीला बघितल्यावर कदाचित लक्षात येतं आपल्या श्वासाची वाढलेली गती. त्या नंतर अनेक छोटे प्रसंग आहेत ज्यात हे लक्षात येतं  पण तो वर आपण बऱ्यापैकी मोठे झालेलो असतो. 


शेवटचा श्वासच कशाला, आपल्याला अनेक गोष्टी कळत नाहीतच ना? त्यात मग बाप्पाचे आपल्या जीवनात असलेले अनन्य साधारण महत्व, आपली माणसे, आपल्यातला कण अन कण, अणुरेणू जे आपल्यासाठी सातत्याने, अथक कार्य करत असतात. बाह्य जग पण मदत देत असते, शृष्टी तर फक्त द्यायलाच आहे, पण लक्ष नाहीच. केवळ "मी", माझं हे आणि माझे ते, ह्या पल्याड जातंच नाही मग श्वासासारख्या अदृश्य घडामोडीला कोण बघणार, समजणार? सगळेच गृहीत धरले जाते, किंबहुना त्यांचे ते कार्यच आहे, त्यात काय मोठंसं? असं देखील वरून बोलले जातेच. त्यांचं कार्य आखून दिलेले आहे आणि ते करत आहेत, करायलाच पाहिजे वगैरे आणखीन जोड दिली जाते. आता अश्या व्यक्तिमत्वाला काय म्हणायचे बरे? 


तसं पाहायला गेलो तर आपण प्रत्येक जण फक्त नाममात्र आहोत, एक मीडिया, माध्यम, काही गोष्टी साध्य करण्यासाठी, नेमून दिलेल्या कार्यासाठी आहोत, आणि ते घडतंय. अर्थात प्रत्येक गोष्टीला व्यावहारिक दृष्ट्या एक नाव द्यावे लागते म्हणून तुमचे एक नाव आहे, घराला नाव आहे आणि मग फक्त आणि फक्त व्यावहारिक भाषेत प्रयोग करण्यासाठी हे वापरावं बाकी नाही हेच त्रिवार सत्य आहे, कारण गुरुत्वाकर्षण आहे म्हणून आपण चालतो, उभे राहतो, बसतो, गाडी चालवतो ई. हवा आहे म्हणून वायरलेस सिग्नल्स पोचतात इथून तिथे, ऐकू येतं, सगळी इंद्रिय काम करत आहेत म्हणून बोलता, ऐकता येतं. पचन क्रिया, विचार करण्याची ताकद कशी दिली जाते हे मानवाच्या हातात नाही, ते घडतं, आपोआप, कुठलाही मानवनिर्मित अल्गोरिदम न लिहिता. तरी देखील "मी" सारखा एक तर पुढे नाही तर मागे असतोच. का? "त्याच्या" पायी नतमस्तक व्हा आणि बघा तरी एकदा. अनुभव घ्या. "सगळं तुझंच" असं म्हणून तर बघा. "स्वानुभवातून आत्मप्रचीती" घेऊन बघा. मग उमजेल सत्य. अर्थात प्रचंड फायदेशीर होणार मग सर्वच.   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

2459: Freshly Ground Nostalgia

The last time I visited a flour mill, I think I was in 5th standard or somewhere around that age. I had gone along with my father, mostly fo...